अंबरनाथमध्ये चौरंगी लढत

    दिनांक  09-Oct-2019 13:17:56
|
मागील सलग दोन वेळा विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवणारे शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यावेळी विजयाची हॅट्ट्रीक साधणार की नाही याकडे सध्या अंबरनाथकरांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, या विधानसभा निवडणुकीत महायुतीपुढे महाआघाडी, मनसे आणि वंचितचे उमेदवारही रिंगणात असल्याने येथे चौरंगी लढत रंगणार आहे.

 

गेल्या सुमारे २० ते २५ वर्षांपासून अंबरनाथमध्ये (राष्ट्रवादीचा पाच वर्षांचा अपवाद वगळता) शिवसेनेचे वर्चस्व आहे. १९९५ ला शिवसेना-भाजप युतीच्या राजवटीपासून नगरपालिका ते लोकसभा आणि विधानसभेमध्ये शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे. तो २०१९च्या लोकसभा निवडणुकीतही खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयानंतर कायम आहे. मागील वेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असतानाही शिवसेनेतर्फे आ. डॉ. किणीकर यांनी जागा कायम राखली होती. नगरपालिकेत निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप यांची युती झाली आहे. शिवसेनेचे २४, तर भाजपचे ११ नगरसेवक निवडून आले होते. भाजपची ताकदही शहरात वाढल्याचे चित्र आहे.

 

प्राचीन शिवमंदिर आणि एकेकाळी मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र असल्यानेकामगारांचे शहर’ अशी अंबरनाथची जुनी ओळख. काळाच्या ओघात ‘विमको,’ ‘धरमसी मोरारजी,’ ‘स्वस्तिक गार्लिक’सारख्या जुन्या कंपन्या बंद पडल्या. आता त्यांची जागा विदेशी कंपन्यांनी घेतली. आज आनंदनगर आणि चिखलोली एमआयडीसीमध्ये दररोज हजारो हातांना रोजगार उपलब्ध होत आहेत. साडेतीन लाखांच्या घरात लोकसंख्या असलेल्या अंबरनाथमध्ये संमिश्र लोकवस्ती आहे. मुंबईपासून दीड तासांच्या अंतरावर असलेल्या अंबरनाथवासीयांना लोकलवर अवलंबून राहावे लागते. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत लोकल्सची संख्या वाढली तरी त्यामानाने ती अपुरी पडत आहे. अंबरनाथ रेल्वेस्थानकामध्ये नूतनीकरणाची कामे सुरू आहेत. पूर्वी अंबरनाथ ते कल्याण मार्गावर बसची असलेली सोय बंद पडली आहे. तालुक्याचे ठिकाण असूनही बससेवेकडे लक्ष दिले गेलेले नाही. बसस्थानकाच्या राखीव जागेवर वाहनतळ सुरू आहे. शिधावाटप कार्यालयाची दुरवस्था झाली आहे.

 

अंबरनाथची लोकसंख्या साडेतीन लाखांच्या घरात गेली आहे, पण काही ठिकाणी अद्याप पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. यासाठी आ. किणीकर यांनी पाठपुरावा करून नव्या योजनांद्वारे शहराचा पाणीपुरवठा सुधारण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. नगरपालिका असतानाही शहरात सिमेंटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र, अजूनही काही ठिकाणी डांबरी रस्त्यांची पावसाळ्यात निर्माण होणार्या बिकट परिस्थितीमुळे नागरिकांचे हाल होतात. रस्त्याच्या दुरवस्थेला ‘एमएमआरडीए’ आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप केला जातो. औद्योगिक वसाहतीमध्ये आणि त्या ठिकाणांहून मुंबईकडे जाणार्या खराब रस्त्यांचा फटका कारखानदारांना बसला आहे. त्यामुळे उद्योग अंबरनाथ बाहेर स्थलांतरित होत आहेत, अशी खंत कारखानदारांनी बोलून दाखवली.

 

२०१४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी चौरंगी लढत झाल्याचे पाहायला मिळाले होते. या लढतीमध्ये शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर यांनी बाजी मारली होती. युती न झाल्याने मतांचे विभाजन झाले आणि त्याचा फटका डॉ. किणीकर यांना बसला आणि त्यांचा निसटता विजय झाला. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीतर्फे आ. डॉ. बालाजी किणीकर, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे रोहित साळवे, मनसेतर्फे सुमेध भवार आणि वंचिततर्फे उमेदवार धनंजय सुर्वे यांच्यासह अन्य १६ जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या रणधुमाळीत आ. डॉ. किणीकर विजयाची हॅट्ट्रीक साधणार का, याबाबत उत्सुकता आहे.

 

गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत आ. डॉ. किणीकर यांनी अनेक वर्षांपासून रेंगाळलेली सूर्योदय सोसायटीमधील समस्या सोडवली. शहरात वन विभागाच्या नोंदी हटवल्या. नगरपालिकेच्या डॉ. बी. जी. छाया रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा, त्यातील कामगारांचा शासनाच्या सेवेत समावेश, शहरात विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण यासारखी कामे झाली. अंबरनाथ शहराला मिळणारे अतिरिक्त पाणी, पोलीस वसाहत आणि नवे पोलीस ठाणे, महत्त्वाचे रस्ते, कल्याण-बदलापूर महामार्गाचे रेंगाळलेले काम पूर्ण करणे आदी कामे प्रलंबित आहेत.

 

मतदार संख्या

पुरुष मतदार : १, ६८, ३१५

स्त्री मतदार : १, ४४, २३०

एकूण : ३,१२,५६१,२०१४ ची

मतदानाची आकडेवारी

डॉ. बालाजी किणीकर ४७, ००० (शिवसेना)

राजेश वानखेडे ४४, ९५९ (भाजप)

कमलाकर सूर्यवंशी १५, ७४० (काँग्रेस)

महेश तपासे ०८, ७२२ (राष्ट्रवादी)


- श्रीकांत खाडे