नाशिक पूर्वमध्ये दुरंगी सामना : मनसेचे इंजिन यार्डात

    दिनांक  09-Oct-2019 13:02:30   


यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वात जास्त चर्चिला गेलेला मतदारसंघ म्हणजेनाशिक पूर्व’ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या मतदारसंघातून इच्छुक असणारे भाजपचे आमदार बाळासाहेब सानप यांना तिसर्‍या यादीपर्यंत तिकिटाची प्रतीक्षा करावी लागली. शेवटी अटकळ बांधण्यात आल्याप्रमाणे त्यांना संधी नाकारत अ‍ॅड. राहुल ढिकले यांना भाजपचे तिकीट देण्यात आले. पूर्वाश्रमीचे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष असणारे ढिकले आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आपले नशीब आजमविणारे बाळासाहेब सानप यांच्यात या मतदारसंघात मुख्यत्वे लढत होणार आहे. सोबतीला काँग्रेसचे गणेश उन्हवणे असणार आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी या मतदारसंघातून मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक यांनी माघार घेतल्याने या मतदारसंघातून मनसेचे ‘इंजिन’ न लढताच यार्डमध्ये दाखल झाले आहे. ज्या मतदारसंघातून मनसेला नाशिकचा महापौर मुर्तडक यांच्या रूपाने, तर ढिकले यांच्या रुपाने राज्याचा प्रदेश उपाध्यक्ष लाभला होता. त्याच मतदारसंघातून माघार घेण्याची नामुष्की मनसेवर ओढवली आहे.

 

यामागे या मतदारसंघातील जातीय समीकरणे असण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. सानप व मुर्तडक हे वंजारी समाजाचे प्रतिनिधित्व करत असल्याने या समाजाचे एकगठ्ठा मतदान सानप यांना व्हावे आणि मतविभाजनाचा फटका बसू नये, यासाठी मुर्तडक यांनी माघार घेतली असण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी छगन भुजबळ यांच्याशी थेट चर्चा झाल्यानंतर तसेच माजी आमदार जयवंत जाधव यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनाही मध्यस्थी करण्यासाठी सांगितल्यानंतर मुर्तडक यांची माघार घेतली असल्याचे या मतदारसंघात बोलले जात आहे. एक प्रकारे, मनसेने राष्ट्रवादीला या मतदारसंघात चाल दिल्याचे दिसून येत आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून आ. बाळासाहेब सानप यांनी भाजपच्यावतीने निवडणूक लढवत विजयश्री संपादित केली होती. तसेच, नाशिकमधील मध्य आणि पश्चिम मतदारसंघात ‘कमळ’ फुलविण्यातदेखील सानप यांची मोलाची भूमिका असल्याचे बोलले जात होते.

 

२०१९च्या लोकसभा निवडणुकीतदेखील या मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात २०१४ पासून भाजपचाच वरचष्मा असल्याचे दिसून येते. मात्र, असे असले तरी यंदा ऐनवेळी अ‍ॅड. राहुल ढिकले यांना उमेदवारी दिल्याने व त्याच वेळी सानप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याने मतदार नेमका कौल कोणाला देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि मनसे या दोन्ही पक्षांची छुपी आघाडी चर्चेत आली आहे. त्यामुळे याचा फटका काँग्रेस उमेदवार गणेश उन्हवणे यांनादेखील बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे दोन्ही पक्षांचे उमेदवार या मतदारसंघात उभे असल्याने येथे आघाडीत बिघाड झाल्याचे दिसून येत आहे.

 

राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार उमेदवारीतून माघार घेतली असून पक्षाच्या प्रचारासाठी काम करणार असल्याचे मुर्तडक येथे सध्या सांगत आहेत. मात्र, ढिकले यांना घेरण्यासाठी मुर्तडक यांना माघार घ्यायला लावले असण्याची शक्यता मतदार व्यक्त करत आहे. त्यामुळे या मतदारसंघातील राजकारण हे पक्षीय न राहता वैयक्तिक स्वरूप धारण करणारे झाले आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे. या मतदारसंघात रस्ते, पाणी आदी कामे झाली असली तरी खराब रस्ते, तपोवनाची झालेली दुर्दशा, काळाराम मंदिर दुरुस्तीचे अपूर्ण काम, गोदावरी स्वच्छता आदी कामे कळीचा मुद्दा म्हणून समोर आहेत. सत्तेच्या सारीपटावर सोंगट्यापेक्षा फिरण्याऐवजी समाजसेवेचे व्रत घेतलेल्या लोकप्रतिनिधींनी सत्तेत असो वा नसो जनतेची कामे करावीत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. एकंदरीत २०१४ची विधानसभा आणि २०१९चा लोकसभा निवडणूक या दरम्यान झालेले नेत्यांचे पक्षांतरण यामुळे येथे भाजप पुन्हा विजयश्री खेचून आणेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.