पालघरमधील 'या' गावाने टाकला निवडणुकीवर बहिष्कार

    दिनांक  09-Oct-2019 18:01:41


 


पालघर : पालघर तालुक्यतील केळवे रोड परिसरातील ग्रामस्थांनी आगामी २०१९च्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची ठाम भूमिका केळवेरोड येथील धोंदलपाडा येथे दि. २ ऑक्टोबर रोजी घेतली होती. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाबाबत जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केळवे रोड परिसर कृती समितीबरोबर दि. ७ ऑक्टोबर रोजी कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीत कृती समितीकडून केळवेरोड भागातील अनेक समस्या जाणून घेत जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र, तरीही कृती समितीने निवडणुकीवरील बहिष्कार कायम ठेवला असून याबाबत ग्रामस्थांशी बैठक घेऊन पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती समितीकडून देण्यात आली आहे.

 

केळवेरोड पूर्व-पश्चिम उड्डाण पुलाकरिता मंजुरी तसेच केळवेरोड पूर्व ते केळवेरोड बंधारा रस्ता दुरुस्ती या बैठकीमधले महत्वाचे विषय होते. या विषयांना अनुसरून सर्व तांत्रिक व भौगोलिक माहिती जिल्हाधिकारी यांना सविस्तर सादर केली. केळवेरोड परिसरातील पूर्व पश्चिम जोडणारा रेल्वे पुलाखालील परंपरागत मार्ग उपनगरीय चौपदरीकरणाच्या प्रस्तावित कामांकरिता कायमचा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील गावांचा तसेच वनवासी पाड्यांचा संपर्क तुटून ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. केळवेरोड स्टेशन पूर्व ते बंदाठे धरण रस्ता नामशेष होण्याच्या मार्गावर असून २००३नंतर या रस्त्याची कुठलीही डागडुजी करण्यात आलेली नाही. ह्या प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेऊन नागरिकांचे प्रश्न कसे सुटतील ह्याबाबत चर्चा केली, तसेच निवडणुकीनंतर प्रत्यक्ष केळवेरोड येथे भेट देऊन ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन समितीला दिले. ह्या भेटीदरम्यान ह्या प्रश्नांशी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनाही समक्ष बोलावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कबुल केले आहे. सध्या आचारसंहितेचा काळ असल्यामुळे समितीने दिलेल्या निवेदनाला जिल्हाधिकारी लेखी उत्तर देऊ शकले नाही. तरीही ह्या प्रश्नाकरिता संपूर्ण सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी घेतली.

 

"विधानसभा निवडणुकीनंतर केळवे परिसरातील समस्या सोडविण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी केवळ आश्वासन दिले. मात्र, गेल्या कित्येक वर्षापासून आम्हाला आश्वासनेच मिळाली असून निवडणुकीवरील बहिष्कार हा कायम राहणार आहे. यासंदर्भात दि. १३ ऑक्टोंबर रोजी कृती समिती सभेचे आयोजन करणार असून पुढील दिशा ठरवली जाईल."

 

- प्रकाश सावर, केळवे रोड कृती समिती, समन्वयक

 

केळवे रोड येथे पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा रेल्वेखालील भुयारी मार्ग बंद झाल्यास परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. पूर्वेकडील जनतेस पश्चिमेस बाजार, शाळा व रूग्णालयासाठी जाण्याकरीता कुठलाही वाहतुकीचा रस्ता उपलब्ध राहणार नाही. पूर आल्यास पूर्व विभागाचा संपर्क तुटतो. रुग्ण, महिला, विद्यार्थी तसेच इतर नागरिकांचे अतोनात हाल होतात. पूर्व विभागतील आदिवासी बांधव उपजिविकेकरिता या रस्त्यावर अवलंबून आहेत. तालुक्यातील झंझारोळी बंधाऱ्याचे पाणी २७ गावांना पुरविले जाते. या बंधाऱ्याच्या डागडुजीकरिता तसेच पूरपस्थिती मध्ये आपतकालीन रस्ता उपलब्ध आहे.