राफेलपूजन : राष्ट्रश्रद्धेचे निदर्शक

    दिनांक  09-Oct-2019 21:02:26धर्मनिरपेक्षता वा अंधश्रद्धा निर्मूलनाचा अर्थ नास्तिकअसा होत नाही, हेही समजून घेतले पाहिजे. उलट राजनाथ सिंह यांच्या राफेलपूजनाच्या कृतीतून राष्ट्रश्रद्धेचीच ओळख भारतासह अवघ्या जगाला झाली. ही राष्ट्रश्रद्धाच विद्यमान सरकारचे बळ, शक्ती, निष्ठा सर्वकाही आहे. पण, हे राष्ट्रसंकल्पना न मानणार्‍यांनाही समजणार नाही


विजयादशमीच्या सुमुहूर्तावर भारतीय वायुसेनेला राफेल विमानाच्या रूपात अत्याधुनिक सोयी
-सुविधा व अस्त्र-शस्त्रसज्ज लढाऊ विमान मिळाले. योगायोगाने यंदाच्या विजयादशमीलाच भारतीय वायुसेना दिनही होता आणि त्यामुळे तर राफेलभेटीचा आनंद द्विगुणित झाला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये जात औपचारिकपणे भारतीय वायुसेनेच्या आवश्यकतांनुसार तयार केलेले राफेल विमान ताब्यात घेतले. राजनाथ सिंह यांनी पहिले राफेल विमान स्वीकारल्यानंतर हेही स्पष्ट केले की, फेब्रुवारी २०२१ पर्यंत आणखी १८ तर मे २०२२ पर्यंत सर्वच्या सर्व ३६ राफेल विमाने भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होतील. तथापि, राफेल विमानांच्या वायुसेनेतील समावेशाकडे कोणी भारताची आक्रमकता म्हणून नव्हे, तर आत्मरक्षेचा उपाय म्हणून पाहावे, असे आवाहनही राजनाथ सिंह यांनी यावेळी केले. २०१४ साली नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून केंद्र सरकार देशाच्या सुरक्षेवर अधिकाधिक भर देत असल्याचे आपण पाहिले.त्यातलाच एक मुद्दा म्हणजे फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमानांची खरेदी
. विशेष म्हणजे, पूर्वाश्रमीच्या मनमोहन सिंग सरकारने केलेल्या राफेल विमान खरेदी करारापेक्षाही उत्तम, किफायतशीर व फायदेशीर करार मोदी सरकारने केला. परंतु, हाती कोणताही सकारात्मक कार्यक्रम नसल्याने तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमानांच्या खरेदी करारावरून मोदी सरकारवर आरोपांचा चिखल उडवण्यालाच शहाणपणा समजले. थेट सर्वोच्च न्यायालयानेही राफेल करारात कुठेही घोटाळा न झाल्याचा निर्वाळा दिला, तरी राहुल गांधींनी त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. इतकेच नव्हे तर पंतप्रधानपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या घराण्याच्या चिरागने मोदी सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या नावाने ‘चौकीदार चोर है’ ची घोषणादेखील दिली. अखेरीस, ‘उचलली जीभ लावली टाळ्यालाही म्हण सार्थ ठरवणार्‍या राहुल गांधींना त्यावरून सर्वोच्च न्यायालयाची माफीही मागावी लागली. पण, इतके सर्व करूनही राहुल गांधींचे राफेल काही उडाले नाहीच, उलट ते स्वतः व त्यांचा पक्षही निवडणुकीत ‘फेल’ झाला. आताही काँग्रेससह, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वतःला पुरोगामी-धर्मनिरपेक्ष समजणार्‍या पक्ष, बुद्धीजीवी, विचारवंतांनी राफेल आगमनावेळीच तारस्वरात टीकाराग आळवायला सुरुवात केली.हजारो वर्षांपासून हिंदू संस्कृतीत विजयादशमीला अखंड भारतात पारंपरिक पद्धतीने अस्त्र
-शस्त्रपूजन केले जाते. महाभारतकालीन पांडवकथेचा तसेच इतरही अनेक घटना-प्रसंगांचा त्याला आधार असून त्यात काही वावगेही नाही. उलट ही प्रत्येक भारतीयाकडून केली जाणारी सहज, नित्य व अकृत्रिम कृती आहे. परंतु, आपल्या मेंदूच्या आकाराएवढेच जग असल्याचा ग्रह करून घेतलेल्यांना हे समजत नाही. ते प्रतिगामी, अंधश्रद्ध, मागासलेली पद्धती म्हणून शस्त्रपूजनाची हेटाळणी करण्यातच धन्यता मानतात. असे करून आपण आधुनिकतेच्या, पुरोगामित्वाच्या, धर्मनिरपेक्षतेच्या नावाने फार मोठा तीर मारल्याचा भासही अशा लोकांना होत असतो. पण, यामागचा त्यांचा उद्देश बहुसंख्य हिंदूंचा मानभंग करण्याचा, त्यांच्या श्रद्धा-प्रतिकांना कमी लेखण्याचा, हिणवण्याचाच असतो. आताही राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये गेल्यानंतर विजयादशमीचे औचित्य साधून राफेल विमानांची नारळ वाढवून, फुले अर्पण करून, ओम्चे चिन्ह रेखाटून पूजा केली, तसेच विमानांच्या चाकाखाली दोन लिंबंही ठेवली.मात्र
, हिंदू संस्कृतीनुसार राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये केलेली राफेल विमानांची शस्त्रपूजा भारतातल्या शहाण्यांना जाचली, डाचली, खुपली. निषेधाचे, विरोधाचे फुत्कार अशा लोकांच्या तोंडातून बाहेर पडून ते कागदावर, ट्विटरवर किंवा अन्यत्र उमटू लागले. काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापासून सलमान खुर्शीद, संदीप दीक्षित वगैरे वगैरे नेत्यांनी राफेलपूजनाला नौटंकी, तमाशा म्हटले, हिंदू धर्मानुसार पूजा का केली, म्हणून जाब विचारला. तसेच यामागे भगवेकरणाचा डाव असल्याचेही त्यांनी म्हटले, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडेंसारख्यांनी माध्यमात चमकण्यासाठी बाष्कळ बडबड चालू केली, तर कित्येकांनी संवैधानिक धर्मनिरपेक्षतेचा  जप करत राजनाथ सिंह यांच्यासह मोदी सरकारवर टीका केली. अर्थात ज्यांनी सहिष्णू हिंदू समाजाला दहशतवादी ठरवले, बदनामीचे षड्यंत्र चालवले, ते लोक असेच करणार. मात्र, इथेच जर शॅम्पेन उडवून वा रंगीबिरंगी मद्याचे प्याले एकमेकाला भिडवून, ‘गॉड ब्लेस इंडिया’ म्हणत राफेलप्राप्तीचा आनंद साजरा केला असता, तर तो प्रकार घटनेच्या कैवार्‍यांना ‘सेक्युलर’ वाटला असता!दरम्यान
, आताच्या राफेलपूजनाच्या निमित्ताने इथे काही गोष्टी लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. पहिला मुद्दा म्हणजे, हिंदू बहुसंख्या असलेल्या देशाची संस्कृती, प्रतीके, वर्तन, आचार-विचार हिंदूच असणार, ते पूर्वापार चालत आलेल्या वारशालाच वर्तमानातही प्रतिबिंबित करणार. पण, ज्यांचा इथल्या मातीशीच संबंध तुटलेला आहे, ज्यांची इथल्या समाजाशीच नाळ तुटलेली आहे, त्यांना हे सगळे खटकणारच, ते वाट्टेल ते बरळणारच. दुसरा मुद्दा म्हणजे भगवेकरणाचा. हिंदू समाजाची अस्मिता जागृत होऊन देशावर वर्षानुवर्षे राज्य केलेल्या एका पक्षाचे आणि त्यांनी पोसलेल्या अभ्यासक-विचारवंतांचे साम्राज्य २०१४ पासून रसातळाला गेले. संपूर्ण देश हिंदुत्वाच्या विचाराने एकवटला व २०१९ सालीही पुन्हा एकदा भाजपनेच केंद्रसत्ता प्राप्त केली. आतापर्यंत हिंदूंच्या नावाने खडे फोडणार्‍यांना बसलेला हा मोठा धक्का होता व आता आपले काय होणारची चिंता त्यांना सतावू लागली. त्यातूनच त्यांच्याकडून हिंदूंना दुखावणारी विधाने, कृत्ये केली गेली. कदाचित मनातल्या नैराश्याला, हताशेला वाट मोकळी करून देण्याचाही हा प्रकार असावा.तसेच देशातील अल्पसंख्य किंवा मुस्लीम समुदायाला भीती घालण्याचाही त्यांचा नेहमीसारखा कावा असावा
, पण या सर्वांनीच हे लक्षात घ्यावे की, आता तो जमाना राहिला नाही, आता तुमच्या शब्दांना कोणी भुलणार नाही, तर आता विकास आणि हिंदुत्व हातात हात घालून चालेल व हिंदूंविरोधी बोलणार्‍यांना त्यांची जागा कुठे आहे, तेही समजेल. तिसरा मुद्दा म्हणजे अंधश्रद्धा व धर्मनिरपेक्षतेचा. धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्म सरकारवर वर्चस्व गाजवणार नाही, असा असून सरकारमध्ये धर्माचा सहभाग नसेल, हा नव्हे. धर्मनिरपेक्षता सरकारमधील सहभागी व्यक्तींवर धार्मिक विधी न करण्याची बंदी घालू शकत नाही, तर ‘अंधश्रद्धा अंधश्रद्धा’ करत समाजाला किंवा देशाला हानी न पोहोचवणार्‍या परंपरा टाकून देण्याची आवश्यकता नसते, तशी अनिवार्यताही नसते. तसेच धर्मनिरपेक्षता वा अंधश्रद्धा निर्मूलनाचा अर्थ नास्तिक असा होत नाही, हेही समजून घेतले पाहिजे. उलट राजनाथ सिंह यांच्या राफेलपूजनाच्या कृतीतून राष्ट्रश्रद्धेचीच ओळख भारतासह अवघ्या जगाला झाली. ही राष्ट्रश्रद्धाच विद्यमान सरकारचे बळ, शक्ती, निष्ठा सर्वकाही आहे. पण, हे ‘राष्ट्र’ संकल्पना न मानणार्‍यांनाही जसे समजणार नाही, तसेच राष्ट्ररक्षेचा विचार कृतीत न आणणार्‍यांनाही समजणार नाहीच.