सुसंतती हीच खरी संपत्ती!

    दिनांक  09-Oct-2019 20:58:07पित्याने सत्यव्रतांचे दृढतेने पालन केले पाहिजे आणि मातेने आपल्या मनाला पवित्र व शुद्ध बनविले पाहिजे. वडील व्रतहीन व आई दुर्मनाची असेल, तर सुसंस्कारशील मुले-मुली निपजतील? याची काहीच शाश्वती नसते! म्हणूनच मुलाबाळांच्या सर्वांगीण प्रगतीत सद्व्रती पिता आणि सुमनाची माता असणे फारच गरजेचे आहे. मगच 'शुद्ध बीजांपोटी फळे रसाळ गोमटी!' हे संतवचन लागू पडते.


आपले 'घर' म्हणजे सुखाचे नंदनवन. कारण, घरातूनच संस्कारशील पिढी उदयास येते आणि अशा आदर्श संततीमुळे समाज व राष्ट्राची सर्वांगीण उन्नती होण्यास मदत मिळते. कुटुंबातील मुले-मुली ही आपली खरी संपत्ती आणि त्यांना घडविणारे पती-पत्नी म्हणजेच त्या घराचे आधारस्तंभ! म्हणूनच या सर्वांनी आपआपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडली, तर त्या कुटुंबात आनंदाची व सुखाची सरिता वाहू लागते. सर्व सदस्य हे सद्विचारांनी व सुसंस्कारांनी परिपूर्ण असले की, ते घर 'स्वर्ग' समजले जाते. वेदांनी कुटुंबांच्या निर्मितीसाठी मौलिक विचार मांडले आहेत. परिवारातील सर्व घटकांचे संबंध हे स्नेहशील, प्रेममय आणि एक दुसऱ्यांकरिता त्याग व समर्पणाच्या भावनेने परिपूर्ण असल्यास निश्चितच त्या घरामध्ये सर्व प्रकारची समृद्धी नांदते. मुले ही आई-वडिलांच्या विचारानुसार चालणारी आणि पती-पत्नी हे दोघेही परस्परांशी मधुर व स्नेहसंबंधाने दृढ असावेत, असा अत्यंत कालौचित व प्रेरणादायी उपदेश खालील मंत्रातून विशद होतो. या मंत्राशयाचा अंकार कुटुंबातील सर्व घटकांनी केल्यास निश्चितच आपले घर आनंदाचे माहेर बनल्याशिवाय राहणार नाही.

 

अनुव्रत: पितु: पुत्रो मात्रा भवतु संमना:।

जाया पत्ये मधुमतीं

वाचं वदतु शन्तिवाम्॥

(अथर्ववेद-३.३०.२)

 

अन्वयार्थ

 

(पुत्र:) मुलगा, पुत्र हा (पितु:) वडिलांच्या, पित्याच्या (अनुव्रत:) व्रतांचे, पवित्र उद्देशांचे, सच्चरित्रांचे अनुकरण करणारा असावा. तसेच तो (मात्रा) आईसोबत (संमना:) प्रेम, स्नेह व पवित्र मनाचा (भवतु) होवो. (जाया) पत्नीने (पत्ये) आपल्या पतीसाठी नेहमीच (मधुमतीम्) गोड, मधुर व (शन्तिवाम्)शांतता प्रदान करणारी (वाचं) वाणी (वदतु) बोलत राहो! (त्याचबरोबर पतीनेही पत्नीकरिता मधुर व गोड वचने बोलावीत.)

 

विवेचन

 

वेदज्ञान समग्र विश्वामध्ये सर्वाग्रणी, ज्ञानाचे आदिमूळ आणि प्रमाणभूत असण्याचे कारणच हे आहे की, वेदांनी अखिल ब्रह्मांडात वसणाऱ्या प्राणिमात्रांकरिता विविध विषयांवर अद्वितीय असे प्रबोधन केले आहे. मानवाची प्रगती साधण्याकरिता त्याचे कुटुंब हे सुखी, समृद्ध व आनंदी असावे. यावर ही अतिशय मार्मिक असा प्रकाश टाकला आहे. घरातील सदस्य विशेष करून मुले-मुली आणि पती-पत्नी यांचे परस्परांतील व्यवहार बरोबर नसतील, तर मानवाची व्यक्तिगत व पारिवारिक उन्नती कशी साधली जाईल आणि मग देश व समाजाला चांगले नागरिककसे मिळतील? अशामुळे एक आदर्श समाज घडण्यास व सामाजिक विकास साधण्यास मोलाची मदत तरी कशी मिळेल. वरील मंत्रात कौटुंबिक संस्कार संवर्धनाचे रहस्य दडले आहे. गोष्ट साधीच, पण मार्मिक आहे. मुला-बाळांनी आणि नवरा-बायकोंनी एकदुसऱ्याशी कसे वागावे, याची मीमांसा इथे केली आहे. ही सांप्रत युगाकरिता हा उपदेश अतिशय प्रासंगिक आहे. विवाहाचा उद्देश असतो, समाज व राष्ट्राकरिता आदर्श संतती देण्याचा! केवळ हाडामांसाची आकृती म्हणजे पुत्र नव्हेत, तर सभ्य, सुसंस्कृत आणि चारित्र्यसंपन्न संतती(प्रजा) माता-पित्यांकडून समाजाला लाभणे, हा विवाह संस्कारामागचा हेतू आहे. म्हणूनच याची तयारी पती-पत्नींनी गर्भाधारणेच्या अगोदरपासून केली पाहिजे, तरच 'मातृ-पितृ' ही दोन पदे सार्थक ठरू शकतात.

 

पित्याने सत्यव्रतांचे दृढतेने पालन केले पाहिजे आणि मातेने आपल्या मनाला पवित्र व शुद्ध बनविले पाहिजे. वडील व्रतहीन व आई दुर्मनाची असेल, तर सुसंस्कारशील मुले-मुली निपजतील? याची काहीच शाश्वती नसते! म्हणूनच मुलाबाळांच्या सर्वांगीण प्रगतीत सद्व्रती पिता आणि सुमनाची माता असणे फारच गरजेचे आहे. मगच 'शुद्ध बीजांपोटी फळे रसाळ गोमटी!' हे संतवचन लागू पडते. 'व्रत' हे सत्याचे, शुद्ध आचरणाचे, सद्व्यवहाराचे आणि ईश्वरीय मूल्यांच्या पालनाचे असते. आयुष्यभर पित्याने त्यांचे पालन करणे इष्ट! कारण, मुलांसमोर वडिलांचे आदर्शांचे चित्र नेहमीच रेखाटलेले असते...! मुलगा वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकतो किंवा त्याच्याही पुढे त्याची मजल असते. 'बाप से बेटा सवाई!' अशी म्हणही प्रसिद्ध आहे. वेदमंत्र सांगतो - आपल्या वडिलांचे जे व्रताचरण आहे, तेच मुला-मुलींनीही आचरणात आणावे. याचा अर्थ वडिलांचे जे कार्यक्षेत्र (शिक्षक, नोकरी, शेती, व्यापार, उद्योग वगैरे) तेच मुलांचेही असे नव्हे! क्षेत्र बदलले तरी चालेल, पण त्यांची सत्य, प्रामाणिकपणा आणि सच्चारित्र्य, धार्मिकता अशी जी नैतिक मूल्ये पित्याने जीवनभर काटेकोरपणे पाळली, त्यांचे अनुकरण व पालन मुला-मुलींनी मोठ्या निष्ठेने करावे. असे आचरण संततीकडून झाले तर वडील सदैव आनंदी व प्रसन्नचित्त राहतील आणि पिता-पुत्रांची आदर्श विचारांची परंपरा ही टिकून राहील. 'पुत्र' शब्दातील अर्थ 'पु' व 'त्र' या शब्दांचे अर्थ 'पुनाति त्रायते च' असे होतात, म्हणजेच जो संपूर्ण कुटुंबाला पवित्र करतो आणि वृद्धापकाळापर्यंत आई-वडिलांचे रक्षण करतो, तो 'पुत्र' होय!

 

मनुस्मृतीत 'पुत्र' शब्दाची व्याख्या करताना महर्षी मनू म्हणतात-

 

"पुन्नाम्नो नरकात् यस्मात् त्रायते पितरं सुत:।"

 

'पुत्' म्हणजेच दु:खरुपी नरक होय. या नरकापासून पित्याचे 'त्रायते' म्हणजे रक्षण करतो, तो 'पुत्र' किंवा 'पुत्री' होय. जेव्हा पुत्र व पुत्री आपल्या आई-वडिलांच्या पवित्र आज्ञेत राहून त्यांनी सांगितलेल्या व आचरलेल्या सत्यतत्त्वांचे (व्रतांचे) जीवनभर पालन करीत राहतील, तेव्हा वडिलांना किंबहुना सर्वच पालनकर्त्या पितरांना आनंद होईल. अनुव्रती पुत्रांची उदाहरणे इतिहासात मोठ्या प्रमाणात आढळतात. भारतीय संस्कृती, आदर्श आज्ञाधारक मुला-मुलींच्या सच्चरित्रांनी नटलेली आहे. मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांची पितृभक्ती सर्वश्रुत आहे. वडिलांच्या आज्ञेपोटी १४ वर्षांचा घोर वनवास पत्करणारा आदर्श पुत्र म्हणून श्रीराम हजारो वर्षानंतर वंदनीय ठरतात. ते म्हणतात-

 

अहं हि वचनाद् राज्ञ: पतेयमपि पावके

भक्षयेयं विषं तीक्ष्णं मज्जेयमपि चार्णवे॥(वा.रा.१८-२८)

 

वडिलांची आज्ञा शिरोधार्य मानून मी अग्नीतदेखील उडी घेईल, हलाहल असे विष प्राशन करेन आणि समुद्रातही बुडेन! पाहा किती ही महान पितृभक्ती! त्यांचा आदर-सन्मान करावा! अशा प्रकारे मुले पित्यांचे अनुव्रती बनतील, तेव्हा खऱ्या अर्थाने ते त्यांचे जीवंत श्राद्ध ठरेल. वेदांनी सांगितलेली ही अशी पितृभक्ती भारताचा अनमोल ठेवा आहे. आई ही वात्सल्याची आगर! म्हणूनच आईची सहृदयता अंगीकारावी. आईप्रमाणे नि:स्वार्थ प्रेम करायला शिकावे आणि आपल्या मनाला पवित्र व शुद्ध बनवावे. मंत्रातील उत्तरार्ध पती-पत्नीच्या व्यवहारावर प्रकाश टाकतो. पत्नीने आपल्या पतीकरिता मधुर वाणीचा प्रयोग करावा. घरात भांडणतंटा वाढतो तो अभद्र शब्दामुळेच! म्हणून पत्नीचे गोड शब्द पतीकरिता उत्साह वाढविण्याचे काम करतात. कारण ती गृहलक्ष्मी म्हणजेच घराची शोभा आहे. याचबरोबर पतीकडूनही पत्नीकरिता अशाच समधुर व्यवहाराची अपेक्षा आहे.

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य