एकनाथ आणि समर्थ रामदास

    दिनांक  09-Oct-2019 22:33:07


 

सुसंस्कृत, धाडसी, विवेकी, स्वामीनिष्ठ समाज घडवण्याच्या कामात रामदासांनी मोलाचे कार्य केले आहे. त्यामुळे शिवरायांच्या स्वराज्यास अनुकूल असा मराठी भाषिक समाज तयार होत गेला. क्षात्रवृत्तीने तो परकीय सत्तेच्या जुलमी कारभाराच्या विरोधात ठामपणे उभा राहिला. शिवरायांचे ध्येय राजकीय स्वातंत्र्य हे धर्म, देश व स्वराज्य रक्षणार्थ होते.


संत एकनाथांच्या काळापासून सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या कार्यास सुरुवात झाली होती आणि ते त्या कार्याचे प्रतिनिधी होते असे म्हणायला काही हरकत नाही. एकनाथांना वंशपरंपरागत भागवत धर्माचा वारसा मिळाला होता. गुरुपरंपरेने ते दत्तसंप्रदायी होते. तरी धर्माचरणातील कट्टरता त्यांनी स्वीकारली नाही. प्रेमळपणा, सौजन्य आणि शांती त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पुरेपूर पाहायला मिळते. हे त्यांचे गुरू जनार्दनस्वामी यांनी ओळखल्याने एकनाथांना त्यांनी ज्ञानेश्वरीचा व भागवतधर्माचा अभ्यास करण्यास सुचवले. एकनाथांनी आपल्या विशुद्ध चारित्र्याच्या स्नेहपूर्ण वागणुकीच्या जोरावर अलौकिक कार्य केल्याचे दिसून येते. एकनाथांनी वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान अंमलात आणून आदर्श जीवनाचे संपादन केले होते. एकनाथांचा काळ हा इ. स. १५३३ ते १५९९ असा आहे. आपल्या ६६ वर्षांच्या काळात एकनाथांनी प्रचंड वाङ्मयीन व सामाजिक कार्य करून ठेवले आहे. त्याचबरोबर त्यांनी सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचे कार्यही केले आहे. 'भावार्थ रामायण' हा त्यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ होय. तो ग्रंथ पूर्ण करण्याअगोदरच एकनाथ निजधामाला गेले. त्यामुळे युद्धकांडाच्या ४४व्या अध्यायापुढचा भाग त्यांचा शिष्य गावबा याने लिहून पूर्ण केला, अशी आख्यायिका आहे. परंतु, गावबाने केलेली रचना एकनाथांच्या रचनेबरहुकूम असल्याने हा सांधा बेमालूम जोडला गेला आहे. या एकनाथकृत 'भावार्थ रामायणा'चा विशेष म्हणजे त्यात आलेला राजकारणाचा भाग. राष्ट्रीय स्वरूपाचा हेतू मनात ठेवून अवतीभवती काय घडत आहे आणि ते बदलले पाहिजे, याची स्पष्ट जाणीव एकनाथांना होती. पण, तो काळ राजकीयदृष्ट्या कठीण असल्याने तत्कालीन राजकारण ध्वन्यार्थाने भावार्थ रामायणात आले आहे. ही फार मोठी राजकीयदृष्टी एकनाथांच्या जवळ होती. एकनाथांनी 'भावार्थ रामायणा'त रामचरित्रामागची जी भूमिका स्पष्ट केली आहे, त्यात दुर्जनांचा नायनाट करण्यासाठी सशस्त्र प्रतिकार केला पाहिजे, असे मत प्रतिपादित केले आहे. एकनाथ म्हणतात की, "या दुष्टांचा नाश करण्यासाठीच रामाचा अवतार झालेला आहे. रामाने त्याच्या चरित्रात दुष्ट राक्षसांचा, अनेक दुष्प्रवृत्त माणसांचा, पापी रावणाचा सशस्त्र प्रतिकार करून त्यांचा संहार केला आहे, असे रामायणात पाहायला मिळते." या संदर्भात एकनाथांच्या भावार्थ रामायणातील ओवी पाहा.

निजधर्माचे रक्षण ।

करावया साधूंचे पाळण ।

मारावया दुष्टजन ।

रघुनन्दन अवतरला ॥

 

एकनाथांनी सांगितलेले रामायणाचे हे प्रयोजन समर्थांनी पुरस्कारले आहे, यात शंका नाही. तथापि समर्थांनी दुराचारी, अन्यायी, परकीय राज्यकर्त्यांचे उल्लेख स्पष्ट भाषेत केलेले आहेत. 'बुडाला औरंग्या पापी । म्लेंच्छसंहार जाहला ॥' हे दिल्लीच्या मुघल सम्राटाबद्दल बोलताना समर्थांना यत्किंचितही भीती वाटत नाही. पण, हा काळ समर्थांच्या पूर्वी एकनाथकालीन परिस्थितीच्या वेळा नव्हता. तरीही एकनाथांनी 'भावार्थ रामायण' सांगताना रामचरित्राच्या मिषाने ध्वन्यार्थाने का होईना, पण परकीय सत्तेच्या अन्यायाला, जुलुमाला वाट करून दिली आहे. 'भावार्थ रामायणा'त वापरलेली सशस्त्र विरोधाची भाषा अप्रत्यक्षपणे तत्कालीन जुलमी राज्यसत्तेबद्दल आहे, हे सूज्ञांच्या लक्षात येते. एकनाथांचे यासंबंधी भाष्य पाहा-

 

देवद्रोही देवकंटक ।

भूतद्रोही जीव घातक ।

धर्मद्रोही दुःखदायक ।

यांसी अवश्य मारावे ॥

 

तथापि या जुलमी सत्तेबद्दल उघड उघड बोलण्याचा काळ अजून आला नव्हता. पण, तो काळ लवकरच येईल हे एकनाथांच्या मनात होते. एकनाथांच्या मनातील ही सुप्त इच्छा प्रत्यक्षात यायला एकनाथांच्या निधनानंतर ४७ वर्षे वाट पाहावी लागली. परकीय जुलमी सत्तेच्या विरोधात बंड पुकारण्याचा काळ शिवाजींच्या रुपाने अवतरला. शिवरायांनी इ. स. १६४६ साली स्वराज्याचे तोरण उभारून आदिलशाही राजवटीला पहिला तडाखा दिला. त्यानंतर पुढील २५-३० वर्षांत दक्षिणेकडील मुसलमानी सत्ता खिळखिळी करून उत्तरेकडून येणार्‍या मुघल आक्रमणाला थोपवले. त्यासाठी मराठ्यांचे स्वतंत्र हिंदवी राज्य स्थापन केले. इकडे रामदासांनी हिंदूसंस्कृती रक्षणार्थ राष्ट्रीय सशस्त्र विरोधाची भाषा पुरस्कारली. महाराष्ट्राला राम व हनुमान दैवतांची उपासना सांगून बलोपासनेची शिकवण दिली. संत एकनाथांचे वाङ्मयीन कर्तृत्व विस्तृतपणे सांगण्याचा उद्देश म्हणजे नाथांनी जुलमी परकीय राजवटीच्या विनाशार्थ या भूमीत सशस्त्र विरोधाची जी भाषा रुजवली, त्याला पुढे शिवाजी महाराज व समर्थ रामदास अशी फळे आली हे सांगण्यासाठी!

 

समर्थ रामदासांच्या जन्मानंतर लगेच त्यांच्या वडिलांनी त्यांना पैठणला नेऊन एकनाथांच्या पायावर ठेवून आणले, अशी एक कथा सांगितली जाते. पण, ती कालदृष्ट्या सदोष आहे. कारण, एकनाथ महाराज इ. स. १५९९ साली निजधामाला गेले आणि रामदासांचा जन्म इ. स. १६०८ साली झाला आहे. याचा अर्थ रामदासांचा जन्म झाला, त्यावेळी एकनाथ महाराज हयात नव्हते. कदाचित रामदासांना बालपणी पैठणला नेऊन त्यांच्या वडिलांनी नाथांच्या समाधीवर ठेवून आणले असावे. ते काहीही असले तरी 'भावार्थ रामायणा'तील एकनाथांनी दिलेली रामचरित्राची सशस्त्र प्रतिकाराची भाषा रामदासांना स्फूर्तिदायक ठरली असणार. रामदासांची प्रापंचिक दृष्टी ही बहिर्मुख आहे. आत्मनिष्ठ रचनेपेक्षा विषयनिष्ठ रचना हे रामदासी वाङ्मयाचे वैशिष्ट्य आहे. या वस्तुनिष्ठ दृष्टीमुळे रामदासांनी 'अस्मानी सुलतानी', 'परचक्र निरूपण' इत्यादी प्रकरणांतून देशस्थितीचे यथातथ्य शब्दचित्र उभे केले आहे. रामदासांनी रामायणाची 'सुंदरकांड' व 'युद्धकांड' ही दोन कांडे मराठीतून सविस्तर लिहिली आहेत. त्यात हनुमानाचा व रामाचा पराक्रम असल्याने ती वर्णने त्यांनी वीरश्रीयुक्त केली आहेत. रामदासांनी प्रारब्धवादाचे खंडन करून प्रयत्नवादाची महती जागोजाग सांगितली आहे. सुसंस्कृत, धाडसी, विवेकी, स्वामीनिष्ठ समाज घडवण्याच्या कामात रामदासांनी मोलाचे कार्य केले आहे. त्यामुळे शिवरायांच्या स्वराज्यास अनुकूल असा मराठी भाषिक समाज तयार होत गेला. क्षात्रवृत्तीने तो परकीय सत्तेच्या जुलमी कारभाराच्या विरोधात ठामपणे उभा राहिला. शिवरायांचे ध्येय राजकीय स्वातंत्र्य हे धर्म, देश व स्वराज्य रक्षणार्थ होते. 'गो-ब्राह्मण प्रतिपालक' म्हणजे निरुपद्रवी गरीब जनतेचे व सज्जनांचे संगोपन, पोषण करणे हे शिवरायांचे ब्रीद होते. रामदासांच्या मनातही धर्म व संस्कृती रक्षणाची प्रेरणा होती. त्यासाठी त्यांनाही हिंदवी स्वराज्य हवे होते. ते स्वराज्य शिवरायांच्या रुपाने उदय पावत होते. त्या स्वराज्य स्वप्नांसाठी दुष्टांचा नाश व जिकडे तिकडे धार्मिक स्वातंत्र्याचा आनंदीआनंद रामदासांना हवा होता. 'आनंदवनभुवनी' या काव्यात त्यांनी ते स्वप्न सांगितले आहे.

 

बुडाला औरंग्या पापी ।

म्लेंच्छ संहार जाहला ।

उदंड झाले पाणी ।

स्नानसंध्या करावया ॥

 

शिवछत्रपतींच्या कार्याला उपयोगी पडलेले अनेक गुण एकनाथांच्या 'भावार्थ रामायणा'तील विचारांमुळे प्रेरित झाले आणि ते गुणविशेष समर्थांच्या कार्यासही उपयुक्त ठरले. डॉ. तुळपुळे यांनी म्हटले आहे की, 'नाथांनी लावलेले प्रवृत्तिवादाचे रोपटे त्यास प्रयत्नवादाचे खतपाणी घालून रामदासांनी वाढवले व त्याचे प्रचंड वृक्षात रुपांतर केले.' स्वराज्यासाठी व रामराज्यासाठी सशस्त्र प्रतिकाराची प्रेरणा एकनाथ-रामदास-लोकमान्य टिळक-स्वातंत्र्यवीर सावरकर अशी सतत स्फुल्लिंगरुपाने तेवत राहिलेली आहे.

- सुरेश जाखडी