दसऱ्याच्या मुहूर्तावर 'राफेल'ची शस्त्रपूजा

06 Oct 2019 19:17:21





नवी दिल्ली
: हिंदू संस्कृतीनुसार दसऱ्याला शस्त्रपूजा करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. याच मुहूर्तावर भारताच्या हवाई ताफ्यात राफेल विमान दाखल होणार आहेत. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग दसऱ्याच्या दिवशी राफेल विमाने ताब्यात घेणार आहेत. फ्रान्सचे संरक्षण मंत्री पहिले राफेल विमान भारताकडे सुपूर्त करतील. शस्त्र पूजन विधी करून हि विमाने व्हताब्यात घेण्यात येतील. लढाऊ विमान राफेलवर चंदनाचा टिळा लावून या भारतीय सैन्यातील लढाऊ विमानाची पूजा केली जाईल. या दरम्यान मोठ्या सोहळ्यात शस्त्र पूजन व वाहन पूजन केले जाईल. पूजेच्या पठणात पारंगत असलेले कुशल ब्राह्मणसुद्धा पूजा संपन्न करण्यासाठी या कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यासाठी पॅरिसमधील फ्रेंच दूतावासाला पंडितजींशी बोलून सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


वाहन आणि शस्त्र पूजेची पद्धत पूर्ण केल्यानंतर नारळ देखील फोडले जाईल. नारळ फोडण्याचा अर्थ शस्त्रे आणि वाहने वापरण्याचा श्रीगणेशा करणे असा होतो. शस्त्र पूजेचा हा कार्यक्रम सुमारे १० ते २० मिनिटांचा असेल. यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पायलटच्या गणवेशात राफेल मधून उड्डाण करतील . संरक्षण मंत्री सुमारे अर्धा तास ते विमानातून उड्डाण करणार आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग पॅरिसहून दीड तास अंतरावर असलेल्या बॉर्डो मॅरेग्नाक विमानतळावर जाऊन हे विमान भारतात आणतील. सुरक्षा रक्षकांनी सांगितले कि
," राजनाथ सिंग हे दरवर्षी दसऱ्याला शस्त्रपूजा करतात. यंदा ते परदेश दौऱ्यावर असल्याकारणाने तेथेदेखील ते आपल्या परंपरेत खंड न पाडता शस्त्रपूजा करत राफेल विमान ताब्यात घेतील."


८ ऑक्टोबर हा दिवस भारतीय वायुसेनेच्या स्थापना दिवस देखील आहे. भारतीय वायुसेना प्रमुखही यावेळी फ्रान्समध्ये उपस्थित असतील. फ्रान्समधील या कार्यक्रमात दोन्ही देशांचे संरक्षणमंत्री आणि संरक्षण विभागाचे उच्च अधिकारी उपस्थित असतील. दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युल मॅक्रोन आणि राजनाथ सिंग यांची भेट होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. पहिल्या राफेल विमानाच्या चाचणीला
'आरबी-०१' नाव देण्यात आले आहे. भारतीय वायुसेनेत महत्वपूर्ण भूमिका वाजविणाऱ्या नव्या वायुसेनाप्रमुख भदोरिया यांचे नाव देण्यात आले आहे. २०२२ पर्यंत आणखी ३६ राफेल विमाने भारताच्या हवाई ताफ्यात दाखल होतील.

Powered By Sangraha 9.0