जय शारदे वागीश्वरी विधिकन्यके विद्याधरी

    दिनांक  05-Oct-2019 10:42:20
दुर्गा देवीच्या अनेक रूपांपैकी एक रूप म्हणजे शारदेचं. आज सरस्वतीची पूजा करून तिच्याकडे ज्ञानप्राप्तीसाठी प्रार्थना केली जाते. या ज्ञानदायिनीचा वरदहस्त लाभलेल्या आणि अनेकांना ज्ञानलाभ करून देणार्‍या मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू, केईएम रुग्णालयाच्या माजी अधिष्ठाता आणि टाटा रुग्णालयाच्या उच्च समितीमध्ये असणार्‍या डॉ. स्नेहलता देशमुख यांच्याविषयी...


आरुढा श्वेतहंसे भ्रमति च गगने दक्षिणे चाक्षसूत्रं

वामे हस्ते च दिव्याम्बरकनकमयं पुस्तकं ज्ञानगम्या।

सा वीणा वादयन्ती स्वकरकरजपै: शास्त्रविज्ञानशब्दै:

क्रीडन्ति दिव्यरूपा करकमलधरा भारती सुप्रसन्ना॥


ब्रह्माकृत सरस्वती स्तोत्रातील हा पहिला मंत्र जणू आधुनिक सरस्वती असणार्‍या डॉ. स्नेहलता देशमुखांना लागू ठरतो. साहित्य, शास्त्र, कला यांचा जणू संगम म्हणजे डॉ. स्नेहलता देशमुख. डॉ. स्नेहलता देशमुखांचे घराणे वैद्यकीय परंपरेतील. त्यांचे आजोबा हे उत्तम होमिओपॅथी डॉक्टर होते. वडील निष्णात शल्यविशारद. या परंपरेत वावरणार्‍या स्नेहलताबाईंना लहानपणापासून डॉक्टर होण्याची इच्छा होती. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या वचनानुसारच जणू त्यांचे लहानपण होते. बालपणी लहान मुले नुसतीच खेळताना दिसतात तर स्नेहलता देशमुख मात्र त्या वयातही खेळण्यातील बाहुल्यांवर शस्त्रक्रिया, उपचार करत. म्हणूनच त्यांचे बालपणीचे खेळ हे वैद्यकीय आवड दर्शवणारेच होते, असे वाटते. हीच आवड आणि इच्छा त्यांना डॉक्टर होण्याकडे घेऊन गेली.डॉ. स्नेहलता देशमुखांचे वैद्यकीय शिक्षण मुंबईतील केईएम रुग्णालयात झाले. स्नेहलता यांनी एमबीबीएस करून एम. एस. ही पदवी विशेष प्राविण्यासह संपादित केली. पुढील शिक्षणासाठी त्यांना टाटा रुग्णालय येथे प्रवेश हवा होता. परंतु, टाटा रुग्णालयाच्या तत्कालीन अधिष्ठात्यांनी ‘मुलींना राहण्यास जागा नाही’ हे कारण सांगून प्रवेश नाकारला. खिन्न झालेल्या स्नेहलताबाईंना तेव्हा आधार दिला, तो त्यांच्या आईने. आईने त्यांना बहिणाबाईंच्या कवितेच्या ओळी सांगितल्या, ज्या पुढे स्नेहलताबाईंना टाटा रुग्णालयाच्याच उच्चपदस्थ समितीपर्यंत घेऊन गेल्या. ‘जग जग रे माझ्या जीवा असंच जगणं तुलाच रं... उच्च गगनासारखं धरित्रीच्या गं मोलाचं...’, या त्या ओळी. दरम्यानच्या काळात स्नेहलता देशमुख यांनी केईएममध्ये शल्यविशारद ही पदवी मिळवून बाल शल्यविशारद विषयात प्रावीण्य मिळवलं. तेव्हापासून वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचा प्रवास ३५ वर्षे सुरूच आहे.


बाल शल्यविशारद म्हणून वैद्यकीय सेवा करताना लहान बाळांना मुळात रोग होणारच नाही, या दृष्टीने त्यांनी संशोधन करण्यास सुरुवात केली. व्यंगावर शस्त्रक्रिया करण्यापेक्षा व्यंग निर्माणच होऊ नये म्हणून गर्भसंस्कारावर त्यांनी अभ्यास सुरू केला. हा अभ्यास करताना त्यांच्या घरात असणार्‍या संगीत परंपरेचा त्यांना विशेष फायदा झाला. त्यांची आई उत्तम गायिका होती आणि त्यांचे वडील सुरेल दिलरुबा वाजवायचे. या संगीताच्या वातावरणात वाढलेल्या स्नेहलताबाईंची आणि संगीताची नाळ तितकीशी जुळली जय शारदे वागीश्वरी विधिकन्यके विद्याधरी नाही. परंतु, संगीताचा अभ्यास त्यांनी केला. हाच संगीताभ्यास त्यांना गर्भसंस्कारावर संशोधन करताना उपयुक्त ठरला. ‘राग यमन’ आणि ‘राग केदार’ हे दोन शांत राग असून हे राग सुरू असताना बाळांना जर दूध दिले तर तुलनेने त्यांचे वजन अधिक वेगाने वाढते. ही बालके सुदृढ होतात. तसेच गर्भवती अवस्थेत सहाव्या महिन्यापासून शास्त्रीय संगीत ऐकले, तर त्याचा बाळावर सकारात्मक परिणाम होतो. सोनॉलॉजीद्वारे बाळाच्या भावनांचा अभ्यासही करता येतो, हे स्नेहलता देशमुखांनी निरीक्षणातून नोंदवलं. व्यंगविरहित संततीकरिता त्या गर्भसंस्कार प्रकल्पाच्या माध्यमातून काम करत आहेत. ‘गरीब माता आणि बालिकांना परवडणारा पोषणमूल्य देणारा आहार’ या विषयात त्यांचे संशोधन सुरू आहे.वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबरोबर स्नेहलता देशमुख यांनी शैक्षणिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा कार्यभार १९९५ ते २००० या काळात सांभाळला. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू असताना त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. मनोहर जोशी मुख्यमंत्री असतानाच्या काळात रत्नागिरी येथे डॉ. स्नेहलता देशमुखांच्या प्रयत्नांतून मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात आले. स्वतंत्र कोकण विद्यापीठासाठी त्या प्रयत्नशील राहिल्या. देशाला उच्च व्यवस्थापकांसोबत मध्यम व्यवस्थापकांची अधिक गरज आहे. ही गरज ओळखून कुलगुरू असतानाच्या काळात त्यांनी ‘बीएमएम’ आणि ‘बीएमएस’ हे दोन अभ्यासक्रम सुरू केले. सूक्ष्म तंत्रज्ञान, अ‍ॅस्ट्रोफिजिक्स यांसारखे महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत त्या प्रयत्नशील होत्या. स्नेहलताबाईंनी घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक निर्णय म्हणजे ‘विद्यापीठाच्या गुणपत्रकावर, प्रमाणपत्रावर वडिलांसोबत आईचे नाव जोडणे.’ हा निर्णय घेण्यामागे एक घटना आहे. त्यांना ‘कोकणरत्न’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या एका वृद्ध गृहस्थाने स्नेहलताबाईंना विचारले, ”तू विमलची मुलगी ना?” या प्रसंगाबाबत स्नेहलताबाई सांगतात, ”हा प्रश्न ऐकून मी अतिशय भारावून गेले. आजवर मला सगळे डॉ. जोगळेकरांची मुलगी म्हणून ओळखायचे. आईच्या नावाने कोणीच ओळखत नव्हते. पण, आपल्या अस्तित्वात आईचं अस्तित्व हे वडिलांएवढंच महत्त्वपूर्ण आहे.” या प्रसंगानंतर विद्यापीठाच्या बैठकीत त्यांनी प्रमाणपत्रावर वडिलांच्या नावासोबत आईचेही नाव जोडण्याचा प्रस्ताव ठेवला आणि तो मंजूरही झाला. आज सर्व विद्यापीठांमध्ये वडिलांच्या नावासोबत आईचेही नाव प्रमाणपत्रावर लिहिण्यात येते.
डॉ. स्नेहलता देशमुख अनेक वर्षे शीव रुग्णालयाच्या अधिष्ठाता होत्या. या काळात त्यांचा अनेक रुग्णांशी आणि त्यांच्या वेदनांशी संबंध आला. मागील तीन वर्षांपासून त्या टाटा रुग्णालयाच्या उच्चपदस्थ समितीमध्ये आहेत. वैद्यकीय, शिक्षण आणि सामाजिक कार्यासाठी स्नेहलता देशमुख यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवेसाठीचा ‘धन्वंतरी पुरस्कार’ २००५ मध्ये मिळाला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावरील डॉ. बी. सी. रॉय पुरस्कारने त्यांना सन्मानित करण्यात आले. ‘गर्भवती आणि बाळाचा आहार’, ‘गर्भसंस्कार तंत्र व मंत्र’, ‘टेक केअर’, ‘तंत्रयुगातील उमलती मने’ आणि ‘अरे संस्कार संस्कार’ ही अभ्यासपूर्ण पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्याचप्रमाणे गर्भसंस्कार प्रकल्पाद्वारे सुप्रजा निर्मितीबाबतही स्नेहलताबाई समुपदेशन करतात. डॉ. स्नेहलता देशमुख यांना विविध कलांचीही आवड आहे. रांगोळी, एम्ब्रॉयडरी, चित्रकला, संगीत या कलांमध्ये त्यांना रस आहे. व्यक्तिगत आणि समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असणार्‍या वैद्यक आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत त्या मुशाफिर आहेत. आज स्नेहलता देशमुख यांचे वय ८० च्या घरात आहे. या वयातही त्या समाजाप्रति कार्य करत आहेत. या उर्जेमागील कारण विचारले असता त्या म्हणतात, ”आध्यात्मिक पाठबळ, रोज सकाळी केलेली देवपूजा मनाला प्रसन्नता देते. मनाची प्रसन्नता शरीरालाही प्रसन्न ठेवते. आपल्याला कार्य करायचे आहे हा विचार आणि त्यासाठी शरीराची व मनाची सकारात्मक साथ यामुळे लाभते. मन, बुद्धी आणि शरीर यांचा सुयोग्य समतोल कार्य घडवून आणतो.” ‘विद्या विनयेन शोभते’ याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. स्नेहलता देशमुख. विचारांचे अधिष्ठान असलेल्या, मातृस्वरूप, ज्ञानदायिनी असणार्‍या आधुनिक सरस्वतीला प्रणाम...!-वसुमती करंदीकर