टिळकांचा राजीनामा : भ्रम आणि वास्तव (भाग-४)

    दिनांक  05-Oct-2019 18:40:47टिळकांनी १८८७ साली सामाजिक वादात न्यायमूर्ती रानड्यांवर केलेल्या टीकेचे संदर्भ अनेकदा दिले जातात, पण १८८५ सालात आगरकरांनी रानड्यांवर टीका करणारे लेखन केले याकडे दुर्लक्ष होण्याचा संभव असतो. रानडे हे सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते असूनही त्यांच्या चार पावले पुढे आगरकरांची मते गेली आणि रानड्यांशी आगरकरांचे खटके उडाले. जिथे सुधारक रानड्यांसोबत आगरकरांचे खटके उडाले तिथे सोसायटीमधील धर्माभिमानी सहकारी आणि टिळक यांच्यासोबत सामाजिक प्रश्नावर आगरकरांचे वाद होणे स्वाभाविकच म्हणायला हवे, यात काहीच नवल नाही. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर आगरकरांचे नवे साप्ताहिक 'सुधारक' हे एका एका नव्या वाक्युद्धाच्या आरंभाचे निमित्त ठरले. 'केसरी' विरुद्ध 'सुधारक' असा हा तुल्यबळ 'सामना' होता.


संपादक म्हणून जरी आगरकरांचा 'केसरी'सोबतचा संबंध संपला असला तरी अजूनही डेक्कन सोसायटी आणि 'केसरी' व 'मराठा'सोबतचा त्यांचा संबंध कायम होता. 'केसरी'-'मराठा' आणि छापखाना यांची व्यवस्था लावताना त्यावरील कर्जे केळकरांनी त्यांच्या खांद्यावर घेतली. छापखान्याच्या व्यवस्थेसाठी मुंबईहून हरी नारायण गोखले यांना बोलावले आणि केळकरांच्या सोबतीने मालक म्हणून (Next Hypothecated Owner) टिळकांचे नाव घालण्यात आले. त्यामुळे सुमारे १९९१ पर्यंत 'केसरी'-'मराठा' तसेच, 'आर्यभूषण' छापखाना मिळून एक संयुक्त कारखाना मानला जात असे. वासुदेवराव केळकर, हरी नारायण गोखले आणि बळवंतराव टिळक असे तीन संयुक्त भागीदार त्यात होते, असा उल्लेख केळकरांच्या टिळक चरित्रात आढळतो. छापखाना व 'केसरी'-'मराठा' संबंधीच्या वादासंबंधाने टिळकांनी त्यांच्या राजीनाम्यात केलेले लेखन महत्त्वाचे आहे. ते म्हणतात, "आमच्यापैकी कित्येक लोक आपला सगळा वेळ एक पै न घेता छापखाना वर्तमानपत्राकडे देत व व्यक्तीविषयक मते बाजूस ठेवून संस्थेच्या सामुदायिक मतांना धरून चालत. यातच वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या विषयासंबंधी मतभेदाची भर पडल्यामुळे ज्याला मतांचा विटाळ होणार नाही, असा छापखाना मात्र सोसायटीकडे ठेवून वर्तमानपत्रे तेवढी वेगळी काढावी अशी सूचना पुढे आली. पण ती अव्यवहार्य ठरून छापखाना व पत्रे दोहोंचा संबंध सोसायटीने तोडावा असे ठरले." सोसायटीमध्ये सामुदायिक मतांना धरून चालणे महत्त्वाचे होते याची साक्ष आणखी काही उदाहरणांवरून पटवून देता येते. 'केसरी'मध्ये प्रसिद्ध होणारी मते बव्हंशी सर्वांनी एकत्रित निर्णय घेतल्यानंतर प्रसिद्ध केली जात, असे खुद्द टिळकांनी 'केसरी'ला २२ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लिहिले होते. टिळक लिहितात, "आगरकर हे या पत्राचे काही वर्ष प्रमुख चालकच होते. तथापि, 'केसरी'पत्राचे धोरण ठरविण्याचे कामी पहिल्यापासूनच इतर मंडळींची सल्लामसलत उपयोगी पडत असे व घ्यावी लागत असे." सोसायटीमध्ये सामाजिक प्रश्नावर आगरकरांची मते जुळता जुळत नसताना टिळक मात्र लोकांची मने दुखवू नयेत, हळूहळू जनतेच्या कलानुसार सुधारणा त्यांच्या गळी उतरवाव्यात, हळूहळू नवे विचार त्यांना शिकवावेत या धोरणाप्रमाणे वागत राहिले. या प्रकरणाबद्दल १९०२ साली लिहिलेल्या एका लेखात टिळक म्हणतात, "'केसरी'स सर्व जुन्या गोष्टी आहेत तशा चालाव्या, त्यात किमपीही व्यंग नाही असे कधीच वाटत नव्हते व वाटलेही नाही. परंतु, नवे विचार आणि नव्या गोष्टी लोकांस सांगताना त्यांस केवळ मूर्ख न मानता व त्यांचे जे काही म्हणणे असेल ते पूर्णपणे लक्षात घेऊन त्या धोरणाने नव्या-जुन्याचा मेळ घातला पाहिजे व त्याकरिता जितक्या स्पष्ट व निर्भीडपणे काही गोष्टी समाजापुढे मांडणे जरूर आहे तितक्या रीतीने त्या मांडल्या पाहिजेत," असे 'केसरी'कारांचे मत आहे. परंतु, सामाजिक प्रश्नावर एकमत काही केल्या झाले नाही.

 

टिळक 'केसरी'-'मराठा'चे संपादक असले तरी लेखक म्हणून आगरकरांना 'केसरी'त लिहिण्याचा अधिकार होता, किंबहुना तो नाकरण्याचा प्रश्नच नव्हता. टिळकांनी आगरकरांना 'केसरी'त लिहिणे थांबवू नका, 'केसरी' तुमचाच आहे, असेच सांगितल्याचे टिळकांच्या राजीनाम्यावरून दिसून येते. आगरकर संपादक नसताना उलट अधिक उघडपणे त्यांनी आपली मते मांडली, असे दिसून येते. पुढचे काही दिवस 'लिहून आलेला मजूकर' या सदरात आगरकर लिहीत असत. पूर्वी टिळकांनी लिहिलेल्या 'फिमेल हायस्कूलातील शिक्षणक्रम' या लेखमालेला आगरकरांनी संपादक नसतानाही 'केसरी'तूनच अतिशय कडक शब्दात उत्तर दिले, याचीही नोंद घ्यायलाच हवी. तरीही 'केसरी' आपल्या हातून गेला याचे दु:ख आगरकरांना वाटणे साहजिक होते. टिळकांच्या सोबतीने कोल्हापूर प्रकरण घडून गेल्यापासून आगरकरांनी 'केसरी' आपल्या पोटच्या पोराप्रमाणे वाढवला होता. आगरकरांच्या संपादकीय कारकिर्दीत 'केसरी'चा खपही चांगलाच वाढला होता. त्यामुळे 'केसरी'वरील आपले संपादकत्व नाहीसे झाल्याचे शल्य त्यांना अस्वस्थ करत होते, असे दिसते. अशातच मालक मनाप्रमाणे लिहू देत नाही, अशा आशयाचा आरोप आगरकरांनी टिळकांवर केला खरा; पण संपादक नसताना 'केसरी'त छापून आलेले आगरकरांचे लेख वाचले तर आगरकरांच्या या आरोपात तथ्य नाही असे आढळते. ज्या सामाजिक मुद्द्यांवरून सोसायटीच्या आजीव सभासदांमध्ये भांडणे झाली. त्यापैकी बहुतांश मुद्द्यांवर आगरकरांची मते एका बाजूला आणि इतर सर्व सदस्यांची मते एका बाजूला असे घडले हे मागे सांगितले आहेच, पण महत्त्वाची बाब अशी की, काही प्रसंगात आगरकरांची मते ही रावबहाद्दूर रानडे यांच्यापेक्षाही जहाल होती, असे दिसून येते. रानडे हे धर्मशिक्षण देऊन सुधारणा घडवता येईल या मताचे तर धर्माला फाटा देण्याकडे आगरकरांचा वाढता कल दिसून आला. 'केसरी'तून रानड्यांची टर उडवण्यापर्यंत आगरकरांची मजल गेली. यावरून त्यांच्या टोकदार मताची कल्पना येईल.

 

टिळक आणि त्यांच्या सोसायटीमधील इतर आजीव सभासदांची धर्माभिमानी, परंपरावादी मते सोसायटीसाठी फारशी चांगली नाहीत, असे आगरकर म्हणत. याबद्दल टिळकांनी तक्रारीच्या सुरात लिहिताना एक खुलासा केला आहे. टिळक लिहितात, "आगरकर म्हणत की 'केसरी'ची जुनी-पुराणी मते आपल्या संस्थेचा नाश करतात. कारण, सुधारकांची सहानुभूती आपल्याकडून जाते. पण केळकर सहसा कोणास न दुखावता लिहीत व सोसायटीतील बहुमत त्यांच्या बाजूला असे. तरीही आगरकर ही तक्रार करीत." टिळकांनी केळकरांच्या विषयी व्यक्त केलेल्या मतात तथ्य आहे. सोसायटीच्या कामकाजात किंवा 'केसरी'-'मराठ्या'त वासुदेवराव केळकर यांनी कधीही टोकाची भूमिका घेतल्याचे आढळत नाही. टिळक-आगरकर वादातसुद्धा त्यांनी समेट घडवण्याचे नि:स्पृह प्रयत्न केलेले आढळून येतात. हेच केळकर टिळकांच्या बरोबरीने आगरकर संपादक नसताना 'केसरी'-'मराठा'च्या व्यवस्थेमध्ये लक्ष घालत. टिळक संपादक असताना सुधारणेला थेट अनुकूलता दर्शवणारी किंवा हळूहळू सुधारणा घडवून आणूया, अशी मते 'केसरी'त प्रसिद्ध होत तेव्हा केळकरांवर किंवा टिळकांवर आगरकर आक्षेप घेत. टिळक लिहितात, "केळकर म्हणत की वर्तमानपत्रातील मते ही डेक्कन एज्युकेशन सोसायटीची मते नाहीत असे वाटेल तर मी जाहीर करतो." पण आगरकर म्हणत, "तसे नाही, 'केसरी'-'मराठ्या'तील मते तुमच्या एकट्याचीच आहेत, असे तुम्ही जाहीर करा." पण कोणता शहाणा संपादक असे जाहीर करील?वर्तमानपत्राला त्यात कमीपणाच आहे! टिळकांच्या या बोलण्यातले तथ्य जाणकारांना जाणवल्यावाचून राहणार नाही.

 

'केसरी'-'मराठा' पूर्णपणे टिळकांच्या हाती सोपवण्याची व्यवस्था लावण्यापूर्वी आगरकरांना विचारण्यात आले होते असे दिसते. टिळक लिहितात, "आगरकर 'केसरी'त लिहिणारे म्हणून त्यांना हे सर्व तुम्ही सांभाळता का म्हणून विचारण्यात आले. पण ते म्हणाले की, मला एडिटर व्हावयाचे नाही व असला कर्जबाजारी छापखाना व पत्रे मला नकोत." टिळकांच्या नेतृत्वात 'केसरी'मध्ये जी मते प्रकट होतात, त्यामुळे 'केसरी'ची प्रतिमा मलीन होते, 'केसरी'चा दर्जा खालावत चालला आहे, डेक्कन सोसायटीबद्दल समाजात गैरसमज निर्माण होत आहेत. परिणामी, टिळकांच्या टोकाच्या भूमिकेमुळे लोकांची संस्थेविषयी असलेली सहानुभूती कमी होईल आणि याचा परिणाम कॉलेजच्या वाढीवर होईल, अशा आशयाचे एक खाजगी पत्र आगरकरांनी त्यांच्या स्नेह्याला लिहिल्याचे आढळते. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आगरकरांच्या मनात नवे 'साप्ताहिक' सुरू करावे असे विचार मनात घोळत असावेत हे वेगळे सांगावयास नको. दरम्यानच्या काळात सात आजीव सदस्यांमध्ये तिघांची भर पडली याचा उल्लेख करायला हवा. १८८६ च्या जानेवारी महिन्यात परशुराम नारायण पाटणकर (१८६०-१९२९), त्याच वर्षीच्या जुलै महिन्यात गोपाळ कृष्ण गोखले (१८६६ ते १९१५ ) या दोघांना आजीव सभासदत्व देण्यात आले. चिंतामण गंगाधर भानू (१८५६-१९२९) यांना १८८७ साली सोसायटीचे आजीव सभासदसदत्व देण्यात आले. यापैकी गोपाळराव गोखले यांचे आगरकरांसोबत विशेष सुत जमत असे. कुणाच्याही दबावाखाली न येता आपल्याला पटतील, रुचतील तेच विचार मांडावेत यासाठी आगरकर मार्ग शोधत होते. समाजातील त्यांच्या परिचयाच्या काही लोकांसोबत सल्लामसलत करत होते. यासाठी गोखल्यांची त्यांना चांगली सोबत मिळाली. नवे साप्ताहिक काढण्याच्या आगरकरांच्या भूमिकेबद्दल सदानंद मोरे यांनी केलेली नोंद महत्त्वाची आहे. ते म्हणतात, "'केसरी'तून लिहून आलेल्या मजकुरात वा स्वतःच्या सहीनिशी आगरकरांनी टिळकांच्या मतांवर कितीही सरबत्ती केली असती तरी तो देखावा आहे. अंतरंगात दोघे एकच आहेत, असे म्हणण्यास वाव होता. हेच लेखन त्यांनी स्वतंत्र पत्राद्वारे केले तर ती खरी कुस्ती ठरली असती. मुद्दा फक्त अभिव्यक्तीच्या अवकाशाचा नव्हता तर मारा करण्याच्या बुरुजाचाही होता."

 

आगरकर गोखल्यांच्या मदतीने नवे साप्ताहिक सुरू करणार याची कुणकुण टिळकांना लागली असता टिळकांनी आगरकरांना धमकावले, असा आरोप केला जातो. या सगळ्यात टिळकांनी मला धमकावले, असे आगरकर सांगत तर आमच्यात असे कधीही घडले नाही, असा खुलासा टिळक वारंवार करत. अजूनही पूर्वीचे संबंध लक्षात घेऊन आगरकरांनी नवे साप्ताहिक काढू नये, असलेल्या दुहीला आणखी वाढवू नये, आपल्या सहीनिशी 'केसरी'त मजकूर लिहावा, असे टिळक-आगरकरांना सांगत, असे केळकरांच्या टिळक चरित्रावरून दिसून येते. टिळकांचे हे सांगणे आगरकरांना मात्र धमकावणे वाटले, आगरकर नवे पत्रे कसे काढता बघून घेऊ, त्यांना त्राही त्राही करावयास लागेल अशी धमकी टिळकांनी दिली, असे य. दि. फडक्यांच्या मांडणीवरून दिसून येते. प्रत्यक्षात मात्र या वादाच्या वेळी या दोघांच्या व्यतिरिक्त 'तिसरा' कुणीही तिथे उपस्थित नव्हता, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे टिळकांनी या वादावर पडदा टाकताना म्हटले, दोघांच्याच भाषणाची गोष्ट. एकाने 'होय' म्हणावे, दुसऱ्याने 'नाही' म्हणावे. अन्य पुरावा काही नाही. तेव्हा या संबंधाने वादविवाद वाढवण्याची आमची इच्छा नाही. सदानंद मोरे यांनी यावर मार्मिक भाष्य केले आहे. वरील वादाची मांडणी करून ते लिहितात, "आगरकरांनी नंतर कधी हा पडदा उघडण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. थोरांच्या चरित्रातसुद्धा पडदा उघडू नये असे प्रसंग असतात. पुढे प्रकरणातील सत्य पडद्याआड गेले ते कायमचेच !" टिळकांनी त्यांच्या राजीनाम्यात आगरकरांच्या या नव्या वर्तमानपत्राबद्दल लिहिले. टिळक म्हणतात, "फिरून फुट पडली व भांडणे झाली. आगरकर, गोखले यांना वाटे की वजनदार व सुधारक लोक आपल्या बाजूचे. म्हणून ते इतरांना दुर्धारक म्हणू लागले. शेवटी त्या दोघांनी मिळून ऑक्टोबर महिन्यात स्वतंत्र आपले म्हणून 'सुधारक' वर्तमानपत्र काढले." दि. १ ऑगस्ट, १८८८ रोजी 'सुधारक'ची जाहिरात 'इंदुप्रकाश' या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली. त्या जाहिरातीवर दोन्ही गोपाळांच्या म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर आणि गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सह्या होत्या. जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे दि. १५ ऑक्टोबर १८८८ रोजी 'सुधारक' वृत्तपत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. तो दिवस होता विजयादशमी! त्या दिवसापासून आगरकरांचे 'केसरी- मराठा' सोबतचे संबंध संपुष्टात आले. टिळकांच्या 'केसरी-मराठा'ला तुल्यबळ असा प्रतिस्पर्धी पुण्यात निर्माण झाला. विजयादशमीच्या दिवशी आगरकरांनी खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन साजरे केले.

 

- पार्थ बावस्कर