भिमा

    दिनांक  05-Oct-2019 20:36:25उपजीविकेसाठी सभ्यतेत मोडणारे सर्व उद्योग करून झाले होते. तरी दोन वेळ खायची भ्रांत. शेवटी मग एक दिवस वेड्यासारखा रस्त्यावर फिरू लागला. मग काही मित्रांनी त्याला हॉस्पिटलला भरती करून नंतर औषधोपचार करून घेतले. हल्ली हल्ली तो माणसात आहे असं वाटायचं. त्याचविषयी मित्र सांगत असतानाच तो परत आला.


आमच्या वाडीचा जांबोटकरांचा बाकडा हा रिकामटेकड्यांचे तीर्थक्षेत्र. या तीर्थक्षेत्री मी अनेकदा बसलो. अजूनही अधूनमधून बसतो. काल दुपारी न थांबणाऱ्या पावसापुढे हात टेकून असाच बसलेलो असताना समोरून एक व्यक्ती जाताना दिसली. माझ्या शेजारी वाडीतलाच एक चाळीशीचा मित्र होता. माझे असे चाळीशीतले मित्र बरेच आहेत. ती आमच्या वाडीचीच देण आहे म्हणा. असो. मित्राने हाक मारली 'भीमाशेठ काय म्हणता!' भीमाशेठ, भीमा सांगळे. या भीमाला मी याआधी अनेकदा पाहिला होता. आमच्या वाडीबाहेरच्या एका दुकानात तो कामाला होता. वाडीतल्या गोडाऊनमधून माल दुकानात ठेवायचे त्याचे काम. हे काम एकसंधीपणाने तो दररोज करीत असे. मख्ख चेहऱ्याने चालणारा भीमा ओळखीचं कोणी दिसलं किंवा हाक मारली तर त्याचे तंबाखू खाऊन काळे पडलेले दात दाखवत वीतभर हसून हात करायचा. त्याच्या गोलसर चेहऱ्यावर सततची खुरटी दाढी असे आणि डोक्यावर टोपी. गळ्यात वारकरी लोकं घालतात तशी माळ त्याच्या लाडक्या पांडुरंगाची. टोपी घालायला मात्र भीमाला एखादा ऋतू वगैरे निमित्त म्हणून लागत नसे. आजही त्याने रेनकोटची टोपी घातलेली होती रिवाजाप्रमाणे. मित्राने हाक मारता तो आमच्यापाशी आला. हात मोकळे होते. मित्राने त्याच्या हातातलं नवं घड्याळ पाहून, ''भीमा घड्याळ सोलिड आहे तुझं. मला दे ना," असं म्हणता, "शेठ माझ्याकडे नाय न दुसरं घड्याळ नायतर दिलं असतं," असं केविलवाणा होत भीमा उत्तरला. "तुमाला खरंच आवडलं? बरं घ्या...," असं म्हणून त्याने हातातलं घड्याळ काढलं. "पण म दिधशे रुपये द्या. माझ्याकडे घड्याळ नाय ना" असं म्हणत मित्राच्या हातात घड्याळ देऊ लागला. भीमा असाच होता. मागे कधीतरी वेडाचे झटके आल्यापासून त्याला औषधं सुरू होती. मित्राने, "अरे नाय रे मस्करी केली. मागे मी तुला चांगलं घड्याळ दिलेलं ते कुठेय?" असं विचारता, "अवो ते एकाने या घड्याळाबदली घेतलं," असं म्हणाला. कोणीतरी भीमाला यातही फसवलं होतं, या कलियुगात."चला मंग येतो" असं म्हणत तो चालता झाला. भीमा माझ्या मित्राच्या वर्गातला.

 

उपजीविकेसाठी सभ्यतेत मोडणारे सर्व उद्योग करून झाले होते. तरी दोन वेळ खायची भ्रांत. शेवटी मग एक दिवस वेड्यासारखा रस्त्यावर फिरू लागला. मग काही मित्रांनी त्याला हॉस्पिटलला भरती करून नंतर औषधोपचार करून घेतले. हल्ली हल्ली तो माणसात आहे असं वाटायचं. त्याचविषयी मित्र सांगत असतानाच तो परत आला. 'शेठ जरा पैसा हवे होते.' त्यावर मित्र 'हा वाटलंच मला त्याशिवाय तू येणार नाही असा,' असं मस्करीत म्हणता, ''नाय ओ शेठ. वाटोळं झालं सगळं. पोरगी पळाली माझी. लग्नाच्या आदल्यादिवशी पळाली. गावातल्याच पोराबरोबर पळाली. मी इथे. मला काय माहीत बी नाय. तिच्या आईला माहीत होतं सगळं. आई खूप मारायची. मी कधी गावी गेलो, तर अगं नको मारु पोरीला असं सांगायचो. तेव्हा तिची आई मला गप्पं करायची आनी पुना मारायची. हल्ली तर पोरगी साफ झाली होती एकदम. हे सगळं छाती-पोट एकदम आत गेलं होतं. लग्नाअगोदरच्या दिवशी पळाली. वाटोळ झालं माझं. पोलीस स्टेशनला सांगून आलो. म्हणाले तक्रार करून एक फोटो द्या बघू मग. आता काय ओ शेट गोळ्या खाऊन जगायचं." हे सगळं बोलताना त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. रडला नाही हे विशेष. बोलताना सतत त्याचा हात गळ्यातल्या माळेवर जात होता. बहुदा त्याचा पांडुरंगच त्याला हे सगळं पचवायची संधी देत असेल. त्याच्या एकसंधी चालण्यासारखं बोलणंही तसंच होतं. त्यात दुःख तर होतंच, पण त्याहून जास्त त्याच्यात केविलवाणी हार होती. नशिबापुढे तो हरून निपचित पडला होता, तरीही एखाद्या क्रूर जनावरासारखं नशीब त्याच्यावर आघात करतच होतं. एखादा शाप घेऊन जगावं तसं त्याचं आयुष्य होतं. देव कसा अशी आयुष्यं घडवतो. या आयुष्यांना अर्थ तरी काय? पूर्वजन्मीचे भोग एखाद्याला इतके भोगायला लावावेत देवाने. आज समोर उभ्या असलेल्या या भीमासारखे अगणित लोक वावरत असतील आपल्यात. त्यांच्या अस्तित्वाची दखल इतर लोक सोडा, पण ते स्वतःतरी घेत असतील का हा प्रश्नच आहे. दररोज असं काहीच वेगळेपण नसलेलं नेहमीच दुय्यम दर्जाचं जिणं कसं काय जगत असतील हे लोक. या भीमाला आज काय तो मी इतक्या मोकळेपणाने बोलताना पाहत होतो. नाहीतर ऊन असो की पाऊस याच्या मालाची ने-आण करण्याच्या कामाव्यतिरिक्त हा आयुष्यात काही करत असेल कोणाशी बोलत असेल यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. किती रुपये हवे विचारता 'शंभर' असं म्हणून त्याने आपल्या हातातलं घड्याळ काढलं 'पण शेठ हे ठेवा. तुमाला आवडलं ना. ठेवा म.' असं निरागसपणे म्हणाला. त्याची नियतीसमोरची हतबल तापाहून आम्ही दोघेही भावूक झालो होतो. आमच्यासारख्यांमध्ये निर्माण केलेली भावुकता हेच काय ते त्याचे या जन्मीचे अवतारकार्य!

 

- डॉ. अमेय देसाई