सर्जक संघटक : भास्करराव कळंबी

    दिनांक  05-Oct-2019 19:06:38वनवासी कल्याण आश्रमाचे माजी संघटनमंत्री रा. स्व. संघाचे प्रचारक भास्करराव कळंबी यांचे जन्मशताब्दी वर्ष ५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यानिमित्त वनवासी कल्याण आश्रम, नाशिक येथे प्रांत सचिव शरद शेळके यांच्या उपस्थितीमध्ये विशेष कार्यक्रम होत आहे. त्यानिमित्त...


देशभक्ती, त्याग, राष्ट्रासाठी समर्पण, नि:स्वार्थ जीवन असलेले भास्करराव कळंबी हे मुंबईत डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांचे बौद्धिक ऐकून त्यांचे उच्च आदर्श डोळ्यासमोर ठेवून संघ कार्यकर्ते झाले. मुंबईत येण्याच्या आधी ते ब्रह्मदेशात होते. त्यांचे वडील डॉ. शिवराम हे तेथे सर्जन म्हणून काम करत. दुर्दैवाने भास्करराव ११ वर्षांचे असताना त्यांच्या आईचे आणि नंतर वर्षभरातच वडिलांचे निधन झाले. त्यानंतर भास्करराव आणि त्यांची भावंडे आत्माराम आणि अनु हे मुंबईत आत्याकडे राहायला आले. मुंबईचे प्रथम संघ प्रचारक गोपाळराव येरकुंटवार यांच्या संपर्कात आल्यावर ते ऑपेरा हाऊसजवळील शाखेत जाऊ लागले. त्यांचे शिक्षण रॉबर्ट मनी हायस्कूल येथून झाले. त्यानंतर सेंट झेवियर्समधून बी.ए. आणि मुंबई विद्यापीठातून एलएलबी केले. याच सुमारास पूजनीय गोळवलकर गुरुजी यांच्या सांगण्यावरून भास्करराव संघप्रचारक झाले. त्याआधी ते संघ कार्यकर्ते म्हणून प्रशिक्षित झाले होतेच. १९४६ नंतर देशाचे विभाजन, हिंदू, मुस्लीम दंगे या गोष्टींमुळे देशातील वातावरण तापलेले होते. गुरुजींनी भास्कररावांना पत्र देऊन केरळमध्ये प्रचारक म्हणून पाठवले. केरळमध्ये शाळा-महाविद्यालयांमधून मुस्लीम विद्यार्थ्यांना नमाजसाठी एक तास सवलत होती. भास्करराव महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना झाडाखाली जमवून संघ प्रचाराचे काम करीत. १९५०-५१ मध्ये काही ख्रिश्चन लोकांनी १०५ मंदिरे तोडली तेव्हा हिंदू निद्रिस्त समाज जागा झाला. पण काही मुसलमानांचीही दहशत तिथे खूप होती. मलबार भागामध्ये १०-१२ हिंदू टपरीवर चहा पीत असले आणि तिथे एक मुस्लीम आला तर ते घाबरून उभे राहत. अशा ठिकाणी भास्कररावांनी १०-१५ स्वयंसेवक पाठवायला सुरुवात केली आणि हे प्रकार कमी झाले. तिथे गरीब हिंदू मच्छीमारांवर होणार्‍या अन्यायालाही वाचा फोडली. महिलांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी सक्षम बनावे, यासाठी राष्ट्र सेविका समितीच्या शाखेची स्थापना करून शाखा विस्तारासाठी प्रयत्न केले.

 

एका गावात मुसलमानांनी आक्रमण करून मूर्ती खंडित केली तेव्हा भास्कररावांनी हिंदूंची एकजूट करून नवी मूर्ती आणून तिची वाजत गाजत मिरवणूक काढून स्थापना केली. स्पृश्य-अस्पृश्य भेद नष्ट करण्यासाठी सगळ्या जाती-जमातींना पौरोहित्याचे शिक्षण देण्यासाठी पाठ्यक्रम सुरू केला. याउलट या भेदाला खतपाणी घालण्यासाठी कम्युनिस्टांनी तिथे गुरुवायूर मंदिरात हरिजनांना प्रवेश द्यावा म्हणून मोठा जमाव जमा केला. यामुळे सवर्ण आणि हरिजन यांच्यात मोठा संघर्ष होईल, असे त्यांना वाटले. पण भास्कररावांनी पुजारी व इतरांना समजावल्यामुळे स्वतः पुजार्यांनीच हरिजनांचे मंदिरात स्वागत केले. कम्युनिस्टांची सवर्ण-हरिजन संघर्ष घडवायची योजना सफल झाली नाही. समाजात एकजूट निर्माण करण्यासाठी भास्करराव यांनी नेहमीच प्रयत्न केले. अनेक ठिकाणी कामानिमित्त फिरल्यामुळे असेल त्यांना १४ भाषा चांगल्या बोलता येत. केरळमध्ये काम करत होते म्हणून ते वेशभूषा केरळीच करत आणि आहारही तिथल्यासारखाच घेत. वयोमान, सतत काम याचा ताण त्यांच्या हृदयावर येऊ लागला. डॉक्टरांनी प्रवास टाळायला सांगितले. हृदयशस्त्रक्रिया झाल्यावरही १९८४ मध्ये त्यांनी वनवासी कल्याण आश्रमाचे संघटनमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. 'कार्यकर्त्यांनी एकमेकांत सलोखा ठेवून भेदभाव नष्ट करावा. वनवासी आणि इतर जाती-जमातींमध्ये संपर्क ठेवून सलोखा वाढवण्याचा प्रयत्न करावा' असे ते नेहमी सांगत. १९९०ते ९५ या काळात अंदमान, निकोबार, सिक्कीममध्ये हिंदू एकजूट घडवण्याचे श्रेय भास्करराव यांनाच दिले जाते. 'श्रद्धा जागरण' हा स्वतंत्र आयमही त्यांनी सुरू केला. १९९६ मध्ये त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले तरी २००० सालापर्यंत त्यांनी वनवासी कल्याण आश्रमाचे अविश्रांत काम केले. त्यानंतर सगळ्या जबाबदारीतून मुक्त होऊन त्यांचे पहिले कार्यक्षेत्र कोचीला गेले आणि तिथे १२ जानेवारी, २००२ रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या नि:स्वार्थ कार्यामुळे ते कायमच स्मरणात राहतील.

 

- रवींद्र गोडबोले