विधानसभा निवडणुकीनिमित्त सा.‘विवेक’तर्फे पुण्यात विशेष परिसंवाद

    दिनांक  04-Oct-2019 17:18:48
विशेष परिसंवादात आ. अनंत गाडगीळ
, केशव उपाध्ये यांचा सहभाग


पुणे : राज्याच्या विधानसभा निवडणुकीनिमित्त साप्ताहिक विवेकतर्फे शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी कोण तळ्यात, कोण मळ्यातया विशेष परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विविध राजकीय, विकासात्मक मुद्द्यांवर यावेळी चर्चा होणार असून यामध्ये कॉंग्रेस पक्षातर्फे बाजू मांडण्यासाठी विधानपरिषद आमदार अनंत गाडगीळ तर भारतीय जनता पक्षातर्फे प्रदेश सह-मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये सहभागी होणार आहेत.स्वा. सावरकर स्मारक
, कर्वे रस्ता, डेक्कन जिमखाना, पुणे येथील सभागृहात शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. राज्यातील सध्याचे राजकारण, सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांची भूमिका, विधानसभा निवडणूक, राज्यातील व पुण्यातील विविध विकासात्मक मुद्दे यांबाबत सहभागी वक्ते आपापली भूमिका यावेळी मांडणार आहेत. यानिमित्ताने उपस्थित श्रोत्यांना आपल्या मनातील प्रश्न विचारण्याचीही संधी मिळणार आहे. सा. विवेकतर्फे साप्ताहिक, नियतकालिक प्रकाशन, विविध पुस्तकांची निर्मिती याचसोबत वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मुद्द्यांवर चर्चा घडवून आणणारे कार्यक्रमही मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येतात. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानेही या परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, या कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्ह महाएमटीबी वेबपोर्टल व ऋतमतर्फे करण्यात येणार आहे. त्यामुळे राजकीय-सामाजिक मुद्द्यांवर जागरूक, संवेदनशील व सक्रिय असणार्‍या पुण्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन सा. विवेक व विवेक समूहातर्फे करण्यात आले आहे.