मांसाकरिता घोरपडीला दगडाने ठेचून मारणारा अटकेत

    दिनांक  31-Oct-2019 19:38:19
|


ठाणे वन विभागातील अधिकाऱ्यांची कारवाई 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मांसाकरिता घोरपडीची शिकार करणाऱ्या एका इसमास वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी नवी मुंबईतून ताब्यात घेतले. हा इसम घोरपडीला कापत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यांमवर प्रसिद्ध झाला होता. त्याव्दारे ठाणे वन विभागातील अधिकाऱ्यांनी शोध घेऊन या इसमाच्या मुसक्या आवळल्या. आरोपीला दोन दिवासांची वनकोठडी सुनाविण्यात आली आहे.


 
 

घोरपडीची शिकार करुन तिचे मांस काढणाऱ्या सुभाष राठोड या इसमाला गुरुवारी वनाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत संरक्षित असलेल्या वन्यजीवांची शिकार करणे कायदेशीर गुन्हा आहे. घोरपड या प्राण्याला 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत प्रथम श्रेणीत संरक्षण देण्यात आले आहे. असे असूनही आजही समाजाच्या काही घटकांमध्ये घोरपडीचे मांस खाल्ले जाते. शिवाय त्या मांसापासून काढण्यात आलेल्या तेलाचाही औषधोपचारासाठी वापर केला जातो. ठाण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र मुठे यांना एक इसम चाकूच्या सहाय्याने घोरपडीला कापत असल्याचा व्हिडीओ मोबाईलवर प्राप्त झाला होता. शोध घेतल्यावर ही व्हिडीओ बेलापूर येथील सेक्टर-८ मधील दुर्गामाता नगरमधील असल्याचे उघड झाले.

 
 

वन अधिकारी मुठे, मनोज परदेशी आणि अर्जुन निचोते यांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिक चौकशी केली. त्यावेळी 'पुर्नवसु फाऊंडेशन'च्या सदस्यांनी कापलेली मृत घोरपड दाखवून आरोपी सुभाष राठोड विषयी माहिती दिली. अधिकाऱ्यांनी राठोडला ताब्यात घेतल्यानंतर ही घोरपड घराजवळील जंगलामधून पकडल्याची कबुली त्याने दिली. अन्य दोन साथीदारांच्या मदतीने दगडाने ठेचून घोरपडीला मारल्याचे ओरापीने सांगितले. तसेच घोरपडीचे मटण खाण्यासाठी तिची शिकार केल्याचे स्पष्टीकरण त्याने दिले. वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपीवर गु्न्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला २ नोव्हेंबरपर्यत वन विभागाची कोठडी सुनावली आहे. ओरोपीचे अन्य दोन साथीदार फरार असून त्यांचा शोध घेत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मुठे यांनी दिली.

 

ठाण्याचे उपवनसंरक्षक डाॅ. जितेंद्र रामगावकर, सहाय्यक वनसंरक्षक गिरजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी मुठे, वनपाल परदेशी, शहाबाज, निचाते, वनरक्षक सचिन सुर्वे, तांबे, बोडेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. वन्यजीव विषयक कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुठे यांनी केले आहे.