लेखिका गिरीजा कीर यांचे निधन

    दिनांक  31-Oct-2019 21:25:35
|
मुंबई
: काही वेळापूर्वी सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती गिरिजा कीर यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले. त्या ८६ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि सून असा परिवार आहे.
अंत्ययात्रा आज रात्री १०च्या सुमारास झपूर्झा, साहित्य-सहवास, वांद्रे पूर्व येथून निघेल.गिरीजा कीर या कथाकथनकार
, बालसाहित्यकार म्हणून अनेक दशके लोकप्रिय होत्या. त्यांची कथा, कादंबरी, मुलाखती, व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णन, अनुभवकथन, समाजदर्शन अशा विविध प्रकारची ११५ पुस्तके प्रकाशित झाली होती. गिरीजाताईंनी प्राधान्याने समाजातील पीडीतांविषयीचा कळवळा, दुरितांचे तिमिर नष्ट व्हावे अशा तळमळीने मांगल्यावरची श्रद्धा जपणारे आणि आस्था वाढविणारे लेखन आग्रहाने केले. सामाजिक प्रश्नांसंबंधीच्या प्रेमापोटी कामगार वस्ती, कुष्ठरोग्यांची वस्ती, अनाथाश्रम आणि आदिवासी भागात जाऊन त्यांनी त्यांच्या जीवनाचा जवळून अभ्यास केला. त्यांनी त्यांचे पुष्कळसे लिखाण या अनुभवातूनच लिहिले आहे. साहित्याचे जाणकार डॉ. मो. दि. पराडकर यांना त्या गुरूस्थानी मानत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची त्यांनी अतिशय आस्थेने माहिती जाणून घेतली होती. संघाच्या कोकण प्रांताने काही वर्षांपूर्वी पनवेल येथे घोषशिबीर आयोजित केले होते. त्या शिबिराच्या निमित्ताने उभारलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी त्यांनी घोषशिबीराला आवर्जून भेट दिली होती आणि संघकार्याविषयी गौरवोद्गार काढले होते. समाजातील भारतीय जीवनमूल्यांच्या जोपासनेसाठी साहित्य अन्य सर्व कलांबरोबरच एक प्रधान घटक असतो आणि साहित्यिकाने ते आपले दायित्व मानून आपली अक्षरसाधना करायची असते अशा निष्ठेने लेखन करणाऱ्या गिरीजा कीर या श्रेष्ठ लेखिकेला विनम्र श्रद्धांजली !!