'हे' कारण देत शिवसेना आमदार राजभवनात !

    दिनांक  31-Oct-2019 15:47:46
|


 


मुंबई : मुख्यमंत्री 'महायुती'चाच होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला असला तरीही शिवसेना मात्र, आपल्या फॉर्म्युल्यावर ठाम आहे. पक्षातर्फे विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असले तरीही सत्तास्थापनेबद्दल उद्धव ठाकरे शर्थीचे प्रयत्न करून सर्वच समीकरणे पडताळून पाहत आहेत. भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह १७ मंत्रीपदे केंद्रात एक मंत्रीपद देण्याचा विचार केला जात असला तरीही मुख्यमंत्रीपदावरून जोरदार चढाओढ सध्या सुरू आहे.

 

मातोश्रीवर झालेल्या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी ठराव मांडत एकनाथ शिंदे यांच्याकडील विधीमंडळ गटनेतेपद कायम ठेवले. मुख्यमंत्रीपद किंवा सत्तास्थापनेबद्दल शिवसेना अजूनही ठाम असल्याचे दिसते. दरम्यान, यापार्श्वभूमीवर कॉंग्रेसनेही यात राजकारण खेळत सोनिया गांधींकडे सत्तास्थापनेबद्दल आपला प्रस्ताव पाठवल्याचे संकेत कॉंग्रेस नेत्यांनी दिले आहे. शिवसेना नेते आता राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनावर जाणार आहेत. मात्र, ही भेट ओला दुष्काळ आणि कोकणातील शेतमालाच्या नुकसानीच्या पंचनाम्याची मुदतवाढ करण्यासंदर्भात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यावेळी सत्तास्थापनेबद्दल चर्चा केली जाणार असल्याचीही शक्यता आहे.

 

शिवसेना भवनाबाहेर सकाळपासूनच जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे. आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी भूमीका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या विधीमंडळ गटनेत्यासाठी निवड झाल्याने आता आदित्य ठाकरे यांच्याकडे नेमकी कोणती जबाबदारी देणार याकडेही साऱ्यांचे लक्ष आहे.