बगदादी ठार, ‘इसिस’ जिवंत!

    दिनांक  31-Oct-2019 19:39:51   
|
बगदादी ठार झाल्यामुळे ‘इसिस’ संपेल का? या प्रश्नाचे उत्तर असे की, ‘इसिस’ संपणार नाही. ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने पाकिस्तानात ठार मारले. ओसामा मेला, पण अल कायदा जिवंत राहिली. अबू बकर मेला, तरी ‘इसिस’ जिवंत राहणार आहे. ‘इसिस’ किंवा ‘अल कायदा’सारखे संघटन कोणत्याही एका व्यक्तीवर अवलंबून नसते. तिचे अस्तित्त्व तत्त्वज्ञानावर टिकून असते.‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड लेवांत’ (आयएसआयएल) चा प्रमुख अबू बकरअल बगदादी याला अमेरिकेच्या सैन्याने २६ ऑक्टोबर रोजी ठार केले. बगदादी हा जन्माने इराकी होता. २०१४ ला त्याने मोसूद येथे इस्लामी ‘खिलाफत’ची घोषणा केली. इराक आणि सीरियाचा ८८ हजार चौरस किलोमीटरचा भूप्रदेश त्याने आपल्या अमलाखाली आणला होता. त्याच्या परिभाषेत सांगायचे तर त्याने ‘इस्लामिक स्टेट’ म्हणजे ‘इस्लामच्या कायद्यावर चालणारे राज्य’ निर्माण केले. हे राज्य निर्माण करत असताना त्याने अत्यंत क्रूर अशा कत्तली केल्या. या कत्तलींचे व्हिडिओ त्याने इंटरनेटवरही प्रसारित केले. बळजबरीने ताब्यात घेतलेल्या स्त्रियांवर त्याने आणि त्याच्या साथीदारांनी निरंतर बलात्कार केले. बगदादीच्या विरोधात जे मुसलमान उभे राहिले, त्यांच्याशीही त्याने अत्यंत निर्दयी व्यवहार केला. सध्या मानवाधिकाराची चर्चा खूप चालते. हे सर्व मानवाधिकार त्याने सर्रास पायदळी तुडविले. अमेरिकेने त्याला ‘दहशतवादी’ म्हणून घोषित केले. त्याला पकडून देण्यास मदत करील, त्याला अडीच दशलक्ष अमेरिकन डॉलरचे (१७६ कोटी) इनाम घोषित केले. शेवटी त्याचा ठावठिकाणा अमेरिकेला लागला आणि २६ ऑक्टोबरला तो ठार झाला.पण
, बगदादी ठार झाल्यामुळे ‘इसिस’ संपेल का? या प्रश्नाचे उत्तर असे की, ‘इसिस’ संपणार नाही. ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने पाकिस्तानात ठार मारले. लादेनच्या संघटनेचे नाव होते, ‘अल कायदा.’ ओसामा मेला, पण अल कायदा जिवंत राहिली. अबू बकर मेला, तरी ‘इसिस’ जिवंत राहणार आहे. ‘इसिस’ किंवा ‘अल कायदा’सारखे संघटन कोणत्याही एका व्यक्तीवर अवलंबून नसते. तिचे अस्तित्त्व तत्त्वज्ञानावर टिकून असते. हे तत्त्वज्ञान आहे, जगभर इस्लामचा प्रचार करण्याचे, काफिरांची कत्तल करण्याचे आणि प्रेषित महंमद पैगंबरांच्या काळातील शुद्ध इस्लामच्या पुनर्स्थापनेचे. व्यक्ती तत्त्वज्ञानाचे प्रतिनिधीत्त्व करते आणि तत्त्वज्ञान मानणार्‍यांचे नेतृत्त्व करते आणि संघटनेची बांधणी करते. व्यक्ती मेली, याचा अर्थ तत्त्वज्ञान मेले असा होेत नाही. एक ओसामा गेला, तर त्याची जागा दुसरा घेतो. एक बगदादी गेला, तर त्याची जागा दुसरा कोणी घेईल. बगदादीची जागा कोण घेणार, यावर सध्या चर्चा चालू आहे. पहिले नाव घेतले जाते, ते अब्दुल्ला कार्दस याचे. हादेखील सद्दामच्या सैन्यातील मोठा अधिकारी होता. हा जिवंत आहे की मेला, हादेखील प्रश्न उपस्थित केला गेला. त्याच्याबरोबर अबू उस्मान अल तुमसी याचेही नाव घेतले जाते. त्याचे दुसरे नाव आहे, हाजी अब्दुल्ला. दहशतवादी संघटनांतील क्रमांक एकचे स्थान लोकशाही पद्धतीने निश्चित होत नाही. एकमेकांना कापूनच हे स्थान मिळवावे लागते. त्यामुळे उद्याचा ‘इसिस’चा प्रमुख कोण असेल, याची चर्चा अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या देशातील लोक फार गांभीर्याने करतात.अबू बकर बगदादी स्वतःला
‘खलिफा’ म्हणून घेत असे. इस्लामी जगतात ‘खलिफा’ या शब्दाला खूप मोठा अर्थ आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या मृत्यूनंतर इस्लामी जगताचे नेतृत्त्व चार खलिफांनी केले. प्रेषितांनी घराणेशाही आणली नाही. विचारविनिमय करून योग्य व्यक्तीची निवड ‘शुरा’ (प्रातिनिधीक मंडळ)ने करावी, असे ठरले. त्याप्रमाणे पहिले चार ‘खलिफा’ निवडले गेले. या चार खलिफांची कारकीर्द, इस्लामी इतिहासात अत्यंत श्रेष्ठ कारकीर्द समजली जाते. शेवटचे खलिफा अली यांच्या काळात मुस्लीमजगतात वाद सुरू झाले. या वादाची परिणीती नवीन ‘खिलाफती’ होण्यात झाली. त्यातील नाव घेणार्‍या खिलाफती आहेत, उमाय्यद, अब्बासीद, ऑटोमन. यातील ऑटोमन खिलाफत तुर्की होती. या खिलाफतीला अरबी मुसलमानांचा मनापासून पाठिंबा नव्हता. इस्लामी जगतात ‘खलिफा’ हा एकाच वेळी राजकीय नेता असतो आणि धर्मगुरूदेखील असतो. धर्म आणि राजकारण यांची फारकत येथे नाही. पहिल्या महायुद्धात ऑटोमन खलिफा उतरला. संपूर्ण अरबस्तान, इजिप्त आणि युरोपची काही भूमी यावर त्याचे राज्य होते. पहिले महायुद्ध ‘इंग्लंड विरुद्ध जर्मनी’ असे झाले. खलिफा जर्मनीच्या बाजूने होता. युद्धात जर्मनीचा पराभव झाला.ऑटोमन साम्राज्याचे करायचे काय
, असा प्रश्न इंग्लंड आणि फ्रान्सपुढे उभा राहिला. त्यांनी नकाशावर रेघा मारून सीरिया, इराक, जॉर्डन, लेबेनॉन, सौदी अरेबिया इत्यादी देश निर्माण केले. पहिल्या महायुद्धापूर्वी हे देश जगाच्या नकाशावर नव्हते. या नावाचे भूभाग होते आणि ते कोणत्या ना कोणत्या खिलाफतीच्या नियंत्रणात येत असत. तुर्कस्तानमध्ये नंतर राज्यक्रांती झाली. केमाल अतातुर्क याने ‘खिलाफत’ रद्द करून टाकली. ‘खलिफा’ ही संकल्पना अरबी आहे, ती तुर्कस्तानात नको, म्हणून त्याने खलिफाची गादी बरखास्त केली. अल बगदादीशी काही संबंध नसला तरी ऑटोमन खिलाफतीचा एक विषय येथे सांगण्यासारखा आहे. ही खिलाफत वाचविण्यासाठी जगभरच्या मुसलमानांनी आंदोलन सुरू केले. भारतात जरा जास्तच झाले. भारतात खिलाफतीचे आंदोलन उभे राहिले. महात्मा गांधी त्यात उतरले. भारतातील मुसलमानांचा आणि तुर्कस्तानातील खलिफाचा संबंध काय? आपण देशातील मुसलमानांना देशबाह्य निष्ठा शिकवित आहोत, हे गांधीजींच्या लक्षात आले नाही. त्यांचे खिलाफत आंदोलन ही राजकीय घोडचूक होती, असे आज सांगावे लागते आणि पाकिस्तानच्या निर्मितीची कोनशिला या आंदोलनाने घातली.बगदादीची
‘खिलाफत’ जास्त काळ टिकली नाही. तिला वाचविण्यासाठी आज देशात महात्मा गांधीदेखील नाहीत. त्यामुळे ती गेल्याचे आपल्यावर काही परिणाम होणार नाहीत. परंतु, इस्लामी जगतात काय घडामोडी घडतात, याकडे आपण फार जागरूकपणे लक्ष ठेवायला पाहिजे. आपण हे अजिबात विसरता कामा नये की, सातव्या-आठव्या शतकापासून सर्व इस्लामी खिलाफतींनी भारतावर आक्रमणे केली आहेत. अल बगदादीने ज्या क्रूरतेने कत्तली केल्या आहेत, तशा कत्तली इथल्या हिंदूंच्या झालेल्या आहेत. किती हजार स्त्रियांना ‘जोहार’ करावा लागला असेल, हे आपण सांगू शकत नाही. म्हणून ‘खिलाफती’ची लढाई इराक आणि सीरियात चालू आहे, आपल्याला त्याच्याशी काय घेणेदेणे असा विचार करू नये. असा विचार जर आपण केला तर आपल्याला ‘सेक्युलॅरिझम’चा रोग झाला, असे मानावे लागेल.

वर म्हटले आहे की, बगदादी गेल्यामुळे ‘इसिस’ संपत नाही. ‘इसिस’ तत्त्वज्ञानावर उभी आहे. प्रेषित महंमद यांनी सांगितले की, “कुठल्याही मुसलमानाने मुसलमानाविरुद्ध तलवार उगारू नये.” पण, ‘इसिस’ने बहुसंख्य माणसे इस्लाम मानणारीच मारली. माणूस इस्लामी असेल तरी त्याला मारले पाहिजे, असे सांगणारा फतवा (जिहादचा फतवा) इब्न तायमिय्या यांनी १३०३ साली जाहीर केला आहे. इब्न तायमिय्या यांना इस्लामी जगतात खूपच मानाचे स्थान दिले जाते. ते अत्यंत धार्मिक होते. तसेच ते कुराण आणि कुराणच्या शिकवणुकीबाबत कडवे आणि अत्यंत आग्रही होते. त्यांची सर्व कारकीर्द इस्लामी राजवटीत गेली. पवित्र कुराणाप्रमाणे न जगणार्‍या राज्यकर्त्यांवर त्यांनी घणाघाती टीका केली. त्यामुळे त्यांना अनेकवेळा तुरुंगात जावे लागले आणि तुरुंगातच त्यांचा अंत झाला. त्यांनी पवित्र कुराण, कुराणाची शिकवणूक यावर भरपूर लिखाण केले. जे या शिकवणुकीविरुद्ध वागतात, जगतात, ते ‘जहिलिय्यात’ जगतात, त्यांच्याविरुद्ध तलवार उपसण्यास काही हरकत नाही. त्यांचा हा फतवा सर्व मुस्लीम दहशतवादी संघटना प्रमाण मानतात. त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव प्रत्येक शतकामध्ये जाणवणारा आहे. सय्यद कुतुब (इजिप्त) ते अब्दुल वाहब (अरबस्तान) अशी त्याची मालिका आहे. सय्यद कुतुबच्या शिकवणुकीतून ‘मुस्लीम ब्रदरहूड’ संघटना उभी राहिली आणि अब्दुल वाहब याच्या शिकवणुकीतून ‘अल कायदा’ व ‘इसिस’चा जन्म झाला.अमेरिका आणि अन्य पाश्चात्त्य देश या दहशतवादाशी लढत आहेत
. जागतिक परिस्थितीचा विचार करता त्यांची लढाई आपल्यालादेखील फायद्याचीच आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे गुंते पाहता, या लढाईत भारत प्रत्यक्ष उतरू शकत नाही. त्याचे कारण असे की, तो संघर्ष आपण आपल्या भूमीवर आणू. हा संघर्ष आपल्या भूमीवर न आणतादेखील कट्टरतावादी दहशतवाद, त्यांच्या संघटना, या डोईजड होणार नाहीत, त्यांना जागतिक स्तरावर एकाकी कसे पाडता येईल, जागतिक मुसलमानांना या संघटनांपासून दूर कसे ठेवता येईल, याचा विचार मात्र आपल्या परराष्ट्र खात्याने करायलाच पाहिजे. बगदादीचा खात्मा झाला, ओसामा बिन लादेन मेला, हे चांगलेच झाले. परंतु, या दहशतवादाचे संकट नेते मारून संपत नाही, हे शासनकर्त्यांनीही लक्षात ठेवायला पाहिजे आणि प्रजातंत्रातील राजारूपी प्रजेनेदेखील ध्यानात ठेवायला पाहिजे.