'क्यार'नंतर आता 'महा' वादळ धडकणार

    दिनांक  31-Oct-2019 16:56:22
|


४८ तासात रत्नागिरी-सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची शक्यता


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - 'क्यार' चक्रीवादळानंतर महाराष्ट्रात हवामान स्थिर झालेले असतानाच आता 'महा' नावाचे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टी क्षेत्रात दाखल होणार आहे. आज दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात सक्रीय झालेल्या या वादळामुळे येत्या ४८ तासांत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसासोबत प्रचंड वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेकरिता न जाण्याची सूचना मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे.

 
 
 
 

दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. यंदा अरबी समुद्रात तयार झालेले हे चौथे चक्रीवादळ आहे. लक्षव्दीप बेटांच्या क्षेत्रामध्ये आज सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास 'महा' हे चक्रीवादळ निर्माण झाले. त्यामुळे गेल्या २४ तासांत लक्षव्दीपमध्ये मुसळधार पाऊस पडला.येथील अमिनीदीव येथे तब्बल २०३ मिमी आणि मिनीकॉय येथे ११८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तसेच केरळमध्येही पावसाने हजेरी लावली. येत्या काही दिवसात 'महा' चक्रीवादळ वायव्य दिशेने वाटचाल करत मध्य-पूर्व अरबी समुद्रामध्ये कार्यरत राहणार आहे. परिणामी दक्षिण कोकण आणि गोवा येथे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या ४८ तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसासोबत ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस समुद्र खवळलेला असेल. ४ आॅक्टोबरपर्यत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याने मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छीमारांना खोल समुद्रात बोटी उतरविण्यासाठी मज्जाव केला आहे.

 

बंगालच्या उपसागरातून येणारे दमट वारे महाराष्ट्रातील अंतर्गत भागात आर्द्रता वाढविणार आहेत. तसेच विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाऱ्यांचे संगम क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात १ नोव्हेंबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडेल. पुणे शहरात देखील पुढील दोन दिवस गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. एका पाठोपाठ येणाऱ्या चक्रीवादळांमुळे महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये असामान्य पाऊस पडला आहे. या वादळांमुळे राज्यातील हवामान प्रभावित झाले असून कोकण आणि गोवा येथे सध्या १३३ टक्के आणि मध्य महाराष्ट्रात १७२ टक्के इतके पावसाचे आधिक्य आहे.

 
 

मुंबईतही पावसाची शक्यता

'महा' वादळाचा परिणाम मुंबईच्या हवामानावरही होणार असल्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईच्या तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. मात्र, शुक्रवारी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळेतापमान २ ते ४ अंश सेल्सिअसने कमी होण्याची अपेक्षा आहे.