वर्ष २०५० : जेव्हा मुंबई बुडेल

    दिनांक  30-Oct-2019 21:07:39   
|

मुंबई आणि जगभरातील अशी बरीच शहरे २०५० पर्यंत पाण्याखाली जातील
, असा अंदाज या  अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. समुद्राच्या जलस्तराची पातळी लक्षात घेता याचा मोठा  फटका दक्षिण मुंबईतील मोठ्या भूभागाला बसणार आहे, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.


मुंबईकरांसाठी ‘तुंबई’ काही नवी नाही. गेल्या आठवड्यापर्यंत मुंबईच्या काही भागात पावसाची रिपरिप सुरूच होती. २६ जुलै, २००५ रोजी आलेला महापूर मुंबईला अगदी गिळंकृत करू पाहत होता. त्यानंतर पालिका, प्रशासन आणि सार्‍यांवर खापर फोडून आपण मोकळेही झालो आणि या वृत्तीला ‘मुंबईकरांचे स्पिरीट’ असे नामकरण करत गोष्टी विसरूनही गेलो. मुंबईच्या पूरस्थितीवर ‘तुम मिले’ नावाचा एक चित्रपटही प्रदर्शित झाला. परंतु, हा चित्रपटही प्रेमकथा सोडल्यास मुंबईतील महापूर हा पार्श्वभूमीपुरताच मर्यादित राहिला होता. तेव्हा, पावसाची वेळ, भरती-ओहोटी या गोष्टी सोडल्या, तर एक धक्कादायक अहवाल नुकताच उघड झाला आहे.मुंबई आणि जगभरातील अशी बरीच शहरे २०५० पर्यंत पाण्याखाली जातील
, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. समुद्राच्या जलस्तराची पातळी लक्षात घेता याचा मोठा फटका दक्षिण मुंबईतील मोठ्या भूभागाला बसणार आहे, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतील जमीन आणि तेथील इमारतींतील घरे यांना सध्या सोन्याचा भाव आहे. मात्र, अहवालातील अंदाज खरे ठरल्यास मुंबईपुरती बुडत असल्याचे चित्र स्पष्ट दिसते. पावसाळ्यात तर सध्याही असाच अनुभव मुंबईकरांना आत्ताही येतच असतो. मुंबईकर या सार्‍याला पालिका प्रशासनाला जबाबदार धरत वेळ मारून नेतात. मात्र, या सार्‍याच्या मुळाशी आपण स्वतःही आहोत, याचा विचार क्षणभरही कुणी करत नाही.


जागतिक तापमान वाढ
, प्रदूषण, पर्यावरण र्‍हास आदी गोष्टींकडे सततची केली जाणारी डोळेझाक मनुष्याला त्याच्या शेवटाकडे नेत असल्याचे उदाहरण नुकतेच उघड झाले आहे. आर्क्टिक खंडात सातत्याने वितळणार्‍या हिमनगांमुळे रशियन नौदलाला पाच नव्या बेटांचा शोध लागला. आर्क्टिक खंडात हवामान बदलामुळे सातत्याने बर्फ वितळत आहे. हे प्रमाण गेल्या पाच वर्षांत वाढले असल्याची नोंद आहे. तापमानवाढीचा असाच प्रभाव संपूर्ण पृथ्वीलाही लागू होतो. न्यू जर्सी येथील वैज्ञानिक संघटनेच्या ‘क्लायमेट सेंट्रल’तर्फे हा अहवाल सादर करण्यात आला आहे. जगभरातील समुद्रालगतची शहरांच्या भूभागाचा २०५० पर्यंत नष्ट होईल, असा थेट इशाराच या अहवालाने दिला आहे. ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ मायग्रेशन’ या संस्थेच्या प्रमुख डीना लोनेस्को यांनी इथल्या कुटुंबांना दुसर्‍या ठिकाणी विस्थापित व्हावे लागेल, असेही त्यात म्हटले आहे. या अहवालातून लोकसंख्या वाढ आणि इतर वृद्धींबद्दल भाष्य करण्यात आलेले नाही.अहवाल तयार करण्यासाठी भूपृष्ठाच्या उंचीचे माप उपग्रहांच्या मदतीने मोजण्यात आले
. लाटा, भरती-ओहोटी, खाडी किनारी असलेल्या कांदळवनांवर होणारा परिणाम यामुळे होत असलेली जमिनीची झीज आदी गोष्टींना एकत्र आणत हा अंदाज तयार करण्यात आला आहे. म्हणजेच जर मुंबईचा विचार करायचा झाला तर हा भूभाग पूर्वीपेक्षा समुद्रसपाटीपासून दूर होता, त्यातील अंतर आता कमी होत चालले आहे. २०५० पर्यंत या महापुराच्या विळख्यात सुमारे अडीच लाख लोक येऊ शकतात. त्यानंतर हळूहळू संपूर्ण मुंबईच समुद्र गिळंकृत करेल, अशी भीतीही आहे. सात बेटांपासून बनलेले हे शहर हळूहळू समुद्र आपल्या पोटात घेत चालला असून दक्षिण मुंबईला याचा मोठा फटका बसू शकतो. व्हिएतनामसारख्या देशातील एकूण दोन कोटी लोकसंख्या यामुळे प्रभावित होईल, देशातील प्रमुख आर्थिक शहरांचाही त्यात सामावेश आहे. चीनमधील बँकॉक-शांघाय, इजिप्तमधील अलेक्झांड्रिया, भारतातील मुंबई, इराक-इराण देशांची किनारपट्टी आदी भूभाग संपूर्णपणे पाण्याखाली जाण्याची भीती यात व्यक्त करण्यात आली आहे.पर्यावरणाबद्दल जनमानसात अजूनही नसलेली संरक्षण
-संवर्धनाची भावना, तापमानवाढीसाठी परिणाम करणार्‍या रोजच्या सवयी, जंगलतोड, प्रदूषण आणि या सार्‍यामुळे होणारे हवामानबदल याचा एकत्रित परिणाम म्हणजे हा अहवाल. या सार्‍याचा अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास होणारा परिणाम धक्कादायक असेल. जगातील महत्त्वाची आर्थिक शहरांची अशी होणारी वाताहत त्या त्या देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा हादरा देणारी ठरेल. ’रायझिंग सी लेव्हल’ या पुस्तकात समुद्राच्या वाढत्या जलस्तराची विस्तृत माहिती आहे. या वाढत्या प्रलयरुपी महासागराला थोपवणे मानवाच्या हातात नसले तरीही ज्या चुकांमुळे ही वेळ ओढावली, या भविष्यात टाळता आल्या तरी पुरेसे होईल.