गुडविन ज्वेलर्सचा वसईतील नागरिकांना कोट्यवधींचा गंडा

    दिनांक  30-Oct-2019 13:17:24
|
 


खानिवडे : पीएमसी बँकेच्या घोटाळ्यातून वसईची जनता बाहेर पडते न पडते तोच आता गुडविन ज्वेलर्सचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. याचा मोठा फटका वसईतील नागरिकांना बसला आहे. वसईतील हजारो लोकांनी यामध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली होती. या ज्वेलर्सने रातोरात दुकाने बंद केली आहेत. यासंबंधी माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये गुडविन ज्वेलर्सचे मालक संचालक सुनील कुमार व सुधीर कुमार या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसईतील दुकान माणिकपूर पोलिसांतर्फे बंद करण्यात आले आहे.

 

भारतीय जनता पक्षाचे वसईचे अध्यक्ष उत्तम कुमार यांनी याबाबतीत त्वरीत खासदार राजेंद्र गावित यांना संपर्क करून याबाबतीत लक्ष घालण्याची विनंती केली असता, गावित यांनी लगेचच वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांना संपर्क करून याबाबत कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार आज बीकेएस शाळेमध्ये हजारो संख्येने उपस्थित झालेल्या गुंतवणूकदारांना पोलीस निरीक्षक उमेश भागवत संबोधित करताना, संबंधित गुन्हा दाखल केला असून प्रत्येक गुंतवणूक दारास पोलीस संपर्क करतील व संपूर्ण नोंद करून गुन्हा दाखल करतील असे सांगितले.

 

याबद्दल उत्तम कुमार यांनी खासदार राजेंद्र गावित व पालघर पोलिसांचे आभार मानले असून संपूर्ण गुंतवणूकदारांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी उभी असून यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोत्तर प्रयत्न करणार असून याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असल्याचे त्यांनी सांगितले.