द्वंद्वयुद्धाचे आव्हान!

    दिनांक  30-Oct-2019 20:36:11
|युधिष्ठिराचे आणि दुर्योधनाचे संभाषण श्रीकृष्ण शांतपणे बघत होता. युधिष्ठिराने दुर्योधनालादिलेले आव्हान त्याला समजले. तो युधिष्ठिराकडे गेला आणि म्हणाला, "तू दुर्योधनाला कोणाशीही लढ असे कसे सांगिलेस? हा शुद्ध वेडेपणा आहे. मला तर असं वाटतं आहे की, माझ्या आयुष्यात मला भेटलेला सर्वात मूर्ख माणूस तूच आहेस. तू त्याला कुणाशीही द्वंद्वयुद्ध करायची परवानगी कशी दिलीस? तुझी ही उदारता, दया, धर्म, तुझ्या द्युताच्या खेळाची पुनरावृत्तीच वाटते. भीम जरी दुर्योधनापेक्षा अधिक बलदंड असला, तरी त्याला दुर्योधनाइतका सराव व कौशल्य नाही. मी त्याला भीमाच्या लोखंडी पुतळ्याशी युद्धाचा सराव करताना खूप वेळा पाहिले आहे. तू हे असे द्वंद्वयुद्धाचे आव्हान देऊन फसला आहेस. कदाचित दुर्योधन भीमालासुद्धा द्वंद्वयुद्धात हरवू शकेल. मग दुर्योधन या जगाचा सम्राट होईल."

 

ते ऐकून भीम म्हणाला,"कृष्णा, तू अजिबात काळजी करू नकोस. मी दुर्योधनाशी लढीन आणि मीच जिंकेन. याची मला खात्री आहे. माझी गदा अधिक शक्तिमान आहे आणि आम्हा दोघांमध्ये मीच वरचढ ठरेन." भीमाचे हे बोलणे ऐकून श्रीकृष्णाला आनंदच झाला. तो भीमाला म्हणाला, "भीमा माझी सारी भिस्त तुझ्यावरच आहे. तूच युधिष्ठिराला राजा होण्यास मदत करशील. या आधी पण धृतराष्ट्राच्या कितीतरी पुत्रांना तूच यमसदनी धाडले आहेस. आता हा दुर्योधनच उरला आहे. त्याचाही वध तूच करशील, अशी मला खात्री आहे. भीमा, हे द्वंद्वयुद्ध जिंकून तू युधिष्ठिराच्या पायाशी या पृथ्वीचे राज्यपद आणून ठेव. परंतु, त्या दुर्योधनाशी सामना तुला खूप काळजीपूर्वक केला पाहिजे. तो गदायुद्धात निष्णात आहे, त्याचे पाय खूप चपळ आहेत."

 

मग भीमाने दुर्योधनाला आव्हान दिले. तो म्हणाला,"दुर्योधना, तू माझ्याशीच द्वंद्वयुद्ध खेळावे, अशी माझी विनंती आहे. तू आजवर आमच्याशी खूप दुष्टपणे वागलास. वारणावताच्या लक्षागृहात तू आम्हाला जिवंत जाळण्याचा कट रचला. मी ते अपमानास्पद प्रसंग विसरलो नाही. त्या दु:शासनाने द्रौपदीला तिचे केस धरून खेचत तुझ्या दरबारात आणले. तो कपटी शकुनी आणि द्युताचा खोटा खेळही मी विसरलो नाही. आज तुझ्या त्या सर्व पापांची फळं मी तुला भोगायला लावीन. दुर्योधना, तुझ्यामुळे या रणभूमीचे स्मशान झाले आहे. ती अनेक थोर माणसांच्या मृतदेहांनी सजली. त्या तीक्ष्ण व अणकुचीदार बाणांच्या शय्येवरती पूज्य पितामह भीष्म हे तुझ्यामुळेच मरणाची वाट पाहत पडले आहेत. आपल्या सर्वांचे प्रिय गुरू द्रोण तुझ्यामुळेच मरण पावले. या पृथ्वीला प्रकाश देणारा दुसरा सूर्य असे ज्यास म्हणतात, तो तुझा प्रिय सखा राधेय तुझ्यामुळेच मृत्युमुखी पडला. आमचा मामा शल्यपण तुझ्यापायीच मृत झाला. या सर्वांच्या मृत्यूचे प्रायश्चित आज मीच तुला देईन."

 

दुर्योधनाने भीमाकडे तुच्छतेने पाहिले व तो म्हणाला, "भीमा उगीच भलत्या भ्रमात राहू नकोस आणि खोट्या वल्गनाही करू नकोस. तू नेहमीच खूप वटवट करत आला आहेस. कृतीच्या नावाने तू शून्य आहेस. अरे, तुझ्याशी द्वंद्वयुद्ध करून तुला ठार करण्याची माझी कैक वर्षांची मनीषा आहे. मला द्वंद्वयुद्धाचे आव्हान देण्याचा पुरुषार्थ तुझ्यामध्ये आहे हे बघून मला आनंद झाला आहे. आजपर्यंत कुणीही या दुर्योधनाला गदायुद्धात हरवू शकलेले नाही. या पृथ्वीवरच काय स्वर्गातल्या कुणीही माझ्याशी लढायची हिंमत दाखवली नाही. प्रत्यक्ष इंद्र जरी माझ्याशी लढला तरी तो जिंकू शकणार नाही. तू कसा लढतोस ते मला बघायचेच आहे. मला युधिष्ठिर म्हणाला होता, ‘आम्हा पाचांपैकी तू कोणाचीही निवड कर. पण, तू सोडून बाकीचे चार पांडव माझे प्रतिस्पर्धी म्हणवून घ्यायच्याही लायकीचे नाहीत. मी तुझीच निवड करतो. खरे तर माझ्यानंतर गदायुद्दात दुसरा श्रेष्ठ तो शल्य होता. परंतु, तोही मृत्युमुखी पडला. त्याच्यानंतर तू आहेस. अर्थात, आपण सगळे गुरू बलराम यांच्यानंतर आहोत. गुरू बलराम हेच गदायुद्धात एकमेव श्रेष्ठ आहेत. तुम्ही सगळे जरी एक झालात तरी त्यांच्याहून श्रेष्ठ मीच आहे, असे गुरू बलरामांचे मत आहे. चल, मी लढायला तयार आहे. भीमा, चल तुझी गदा घेऊन तयार हो!"

 

युधिष्ठिराने दुर्योधनाकडे प्रेमाने पाहिले व त्याला म्हणाला, "दुर्योधना, स्वत:ला आधी सावर. केस बांध, चिलखत परिधान कर व मग गदायुद्धाला सुरुवात कर!" दुर्योधनानेही युधिष्ठराकडे प्रेमाने पाहिले. दुर्योधन फक्त भीमाचाच आत्यंतिक द्वेष करत होता. दुर्योधनाने सोनेरी चिलखत घातले. आपला मुकुट मस्तकी ठेवला. संध्याकाळच्या प्रकाशात तो तेज:पुंज भासत होता. आता द्वंद्वयुद्ध सुरू होणारच होते. इतक्यात, त्या स्थळी गुरू बलराम आले. फार महान गदायुद्ध आपल्या दोन शिष्यांमध्ये होणार आहे. अशी बातमी बलरामांना नारदमुनींकडून मिळाली. होती. दुर्योधन तर बलरामांचा सर्वात आवडता शिष्य म्हणून आवर्जून हे युद्ध बघायला बलराम आले. भीम व दुर्योधन या दोघांनी आपले गुरू बलराम यांना प्रणिपात केला. बलरामांसाठी उच्चासन आणले गेले. बलराम म्हणाले, "मला असे कळले आहे की, इथून जवळच ‘सामंतपंचक’ हे अत्यंत पवित्र असे तीर्थक्षेत्र आहे. जिथे मृत्यू आल्यास निश्चित स्वर्गप्राप्ती होते. म्हणून हे गदायुद्ध ‘सामंतपंचक’ या स्थळी व्हावे, असे मला वाटते." युधिष्ठिर म्हणाला, "आपली इच्छा शिरोधार्य!" मग ते सगळे ‘सामंतपंचक’ तीर्थस्थळाकडे मार्गस्थ झाले. (क्रमशः)


                                                                              - सुरेश कुळकर्णी 

[email protected]

9821964014