कोथरुडची जनता माझ्या पाठीशी : चंद्रकांतदादा पाटील

    दिनांक  03-Oct-2019 12:22:16पुणे : चंद्रकांतदादा पाटील यांनी भव्य शक्तीप्रदर्शन करत गुरुवारी सकाळी कोथरुड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. 'कोथरुडची जनता माझ्या पाठीशी आहे, त्यांची साथ मला कायम मिळेल,' असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 

 

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी निघालेल्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कोथरूड विधानसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा रॅलीत मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. अनेक महिला कार्यकर्त्या दुचाकीवरही सहभागी झाल्या होत्या.

 
 

तत्पूर्वी चंद्रकांतदादा यांनी कोथरुड येथील शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत रॅलीला सुरुवात केली. या रॅलीत पुणे भाजपच्या नेत्यांनीही सहभाग घेतला. खासदार गिरीश बापट, मेधा कुलकर्णी यांनीही चंद्रकांतदादा यांना शुभेच्छा दिल्या.

विकास कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न - चंद्रकांत दादा पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांमध्ये देश आणि महाराष्ट्रात मोठ्या जोमाने विकास पर्व सुरू करण्यात आले आहे. तेच सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्या प्रचार मोहिमेदरम्यान करणार आहे, असे प्रतिपादन कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना-आरपीआय महायुतीचे उमेदवार माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसमोर थोडे देखील आव्हान उभे करू शकेल, असा उमेदवार विरोधी पक्षांना कोणत्याच मतदारसंघांमध्ये मिळत नाही. त्यामुळेच चिथावणी देऊन अंतर्गत बंडाळी माजवण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात येत होते. मात्र, भारतीय जनता पार्टी हा केवळ एक पक्ष नसून तो परिवार आहे. त्यामुळेच विरोधकांच्या असल्या कोणत्याही चिथावणीखोर भूमिकांना भारतीय जनता पक्ष कोणताही कार्यकर्ता नेता कधीच बळी पडत नाही. परस्पर संवाद आणि विश्वास यांच्या जोरावरती भारतीय जनता पार्टी एक पक्ष आणि परिवार म्हणून दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे. जनतेने देखील भारतीय जनता पार्टी आणि विरोधकांमधील हा फरक ओळखला असून त्यामुळेच गल्ली ते दिल्ली पर्यंत भाजपाच्या उमेदवारांना भरघोस पाठींबा मिळत आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नागरिकही त्याला अपवाद ठरणार नाहीत, असा विश्वास मला आहे.

आगामी काळामधील माझी प्रचार मोहीम ही माझ्या व्यक्तिगत प्रचारासाठी नसून भारतीय जनता पक्षाने महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून देश आणि राज्यांमध्ये केलेल्या विकासकामांना जनतेपर्यंत पोहोचवण्याची ही संपर्क मोहीम असेल. अधिकाधिक नागरिकांपर्यंत या पुढील काळात देखील हे विकास पर्व कसे पोहोचवण्यात येईल, याची माहिती जनतेला देण्यात येईल. त्यामधूनच कोथरूड धील पुणेकर विक्रमी मताधिक्‍याने भारतीय जनता पार्टीला विजय करतील, असा विश्वास देखील चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. संस्था भेटी विख्यात व्यक्तीच्या भेटीगाठी आणि सर्व सोसायट्या, वाड्या-वस्त्या पिंजून काढत सर्वसामान्य नागरिकांच्या भेटीगाठी यावर आधारित ही प्रचार मोहीम असेल अशी माहिती देखील चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.