पोनुंग डोमिंग : एक लढवय्यी दुर्गा...

    दिनांक  03-Oct-2019 22:27:25आजच्या स्त्री-पुरुष समानतेच्या युगात, असे एकही क्षेत्र नसेल जे महिलांनी पादाक्रांत केलेले नाही. युद्धभूमीवरही देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महिला भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पोनुंग डोमिंग. अभियंता, पुढे लष्करात 'मेजर' आणि आता अरुणाचल प्रदेशची 'लेफ्टनंट कर्नल'पदी नियुक्ती झालेली पहिला महिला. अशा या देवभूमी ते रणभूमी गाजवणाऱ्या लढवय्या दुर्गेच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा मागोवा...


स्वातंत्र्योत्तर काळापासून ईशान्येकडील राज्यांकडे सरकारचे दुर्लक्षच झाले. मात्र, पोनुंग डोमिंग यास अपवाद ठरल्या आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पोनुंग या मूळच्या अरुणाचल प्रदेशच्या. अरुणाचलमधील सियांग जिल्ह्यातील पासीघाटावर त्यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. डोमिंग कुटुंबातील ती थोरली कन्या असून तिला आणखी तीन भावंडे आहेत. पारंपरिक शेतीव्यवसायाशिवाय डोमिंग कुटुंबाकडे उत्पन्नाचे दुसरे साधनही नाही. तरीही सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेल्या या दुर्गेने मोठे होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि आपल्या जिद्दीच्या जोरावर ते पूर्णत्वासही आणले. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे पोनुंग यांनी वेळीच ओळखले आणि लहानपणापासूनच उच्च शिक्षणाचे ध्येय निश्चित केले. पण, त्यांच्या सियांग जिल्ह्यात मात्र दर्जेदार शिक्षण देणारी एकही खासगी शाळा नव्हती आणि असती तरी डोमिंग कुटुंबाच्या खिशाला ते परवडणारे नव्हतेच. त्यामुळे पोनुंग डोमिंग यांनी सरकारी शाळेतच शिक्षण पूर्ण केले. जिद्दीने अभ्यास केला. मुळातच शिक्षणाची आवड असल्याने एकामागून एक शिष्यवृत्त्या पदरात घेत पोनुंग डोमिंग अभियांत्रिकी शिक्षणाकडे वळल्या. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षणही सरकारी महाविद्यालयातच झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी मात्र शहराबाहेर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

 

२००५ साली त्यांनी अभियांत्रिकीची प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण केली. पुण्यातील प्रसिद्ध वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी प्रवेश मिळवला. सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. शिक्षणानंतर अनेक खासगी कंपन्यांमध्ये नोकरीची संधीही चालून आली. मात्र, पोनुंग डोमिंग यांनी भारतीय लष्करी सेवेत नोकरीसाठी अर्ज करत आव्हानात्मक काम करण्याचा निर्णय घेतला. २००८ साली त्यांची लष्करी सेवेत निवड झाली. अभियंता असल्याने भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांना तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. यासाठी मग त्यांनी चेन्नई गाठली. पुढे ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडल्याने त्यांना साडेचार वर्षांतच पदोन्नती मिळाली. त्या 'मेजर' पदावर विराजमान झाल्या. भारतीय लष्करी सेवेत 'मेजर' हे पद खूप महत्त्वाचे मानले जाते. 'मेजर'सारख्या महत्त्वाच्या पदावर एखाद्या स्त्रीची नियुक्ती होणे, ही अतिशय अभिमानास्पद बाब.

 

'मेजर' पदावर नियुक्ती झाल्यानंतरही त्यांच्या उत्तम कामगिरीचा धडाका असाच सुरू राहिला. २०१४ साली त्यांनी 'डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो' येथील 'नॅशनल पीस किपींग मिशन'साठीही काम केले. ईशान्येतील राज्यांत घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना रोखण्याच्या सैन्याच्या मोहिमेत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. अशा कारवायांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. त्यांच्या या कारवायांची दखल घेत, लष्कराने नुकतीच त्यांची 'लेफ्टनंट कर्नल'पदी नियुक्ती केली. 'लेफ्टनंट कर्नल'पदी निवड झालेल्या फारच कमी महिला लष्करी सेवेत आहेत. त्यापैकी पोनुंग डोमिंग या पदावर पोहोचणाऱ्या अरुणाचल प्रदेशच्या पहिला महिला ठरल्या असून, या नेत्रदीपक कामगिरीसाठी अरुणाचलचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू यांनीही त्यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. लष्करी सेवेतील या लढवय्यी दुर्गेची कामगिरी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी असून पोनुंग डोमिंग यांना 'दै. मुंबई तरुण भारत'चा सलाम!

- रामचंद्र नाईक