गुलालाईमुळे पाकची दांडी गुल

    दिनांक  03-Oct-2019 21:46:13   गुलालाई इस्माईल वयाच्या सोळाव्या वर्षापासून पाकिस्तानी महिलांच्या मानवी हक्कांसाठी लढत आली. परंतु, तिने पश्तूनी जनतेवरील जुलूमजबरदस्तीला विरोध केला, तशी ती पाकिस्तानी सरकारवर व लष्कराच्या नजरेत आली आणि त्यांनी तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला.


काश्मीरमधील मुस्लिमांच्या मानवाधिकार हननाच्या खोट्यानाट्या कहाण्या रंगवून रंगवून सांगणाऱ्या इमरान खान यांच्या पाकिस्तानातले वास्तव नेमके काय आहे? सीमेपलीकडच्यांसाठी कंठात दाटून आलेला कळवळा शब्दाशब्दांतून व्यक्त करणाऱ्या इमरान खान यांच्या देशातल्यांची अवस्था खरेच उत्कृष्ट आहे का? पाकिस्तानात सर्वत्र 'आनंदी आनंद गडे'चे वातावरण असल्यानेच ते आता भारतातल्या घडामोडींत नाक खुपसत आहेत का? तर वरील सर्वच प्रश्नांची उत्तरे नकारार्थी, काळीकुट्ट आणि अराजकीच असतील, यात कसलीही शंका नाही. नुकतीच इमरान खान यांनी ही मानवाधिकाराची व जम्मू-काश्मीरची पोपटपंची केली, ती संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये. तिथे त्यांनी "श्रीमंत देशांनी आमच्यासारख्या दरिद्री देशांना पैशाची मदत केली पाहिजे," असे म्हणत हातही पसरले. परंतु, त्याचवेळी ३२ वर्षांच्या गुलालाई इस्माईल या पाकिस्तानातून परागंदा झालेल्या महिलेने संयुक्त राष्ट्र मुख्यालयाच्या बाहेर रस्त्यावर उतरून पाकिस्तानचा व त्या देशाच्या लष्कराचा क्रूर, भेसूर चेहरा जगासमोर आणला. कोण आहे गुलालाई इस्माईल? तिला का रस्त्यावर उतरावे लागले? आणि तिच्याविरोधात आता पाकिस्तान सरकारने अटक वॉरंट का जारी केले?

 

तत्पूर्वी आपण फाळणीपासूनच्या व गेल्या काही वर्षांतल्या पाकिस्तानातील ठळक घडामोडींवरही प्रकाश टाकला पाहिजे. इस्लामच्या नावावर जन्माला आलेल्या पाकिस्तानात राजकारणात, प्रशासनात आणि लष्करातही कायमच पंजाबी मुस्लिमांचे वर्चस्व राहिले. पाकिस्तानातील अन्य प्रांतिक अल्पसंख्य समुदाय जसे की, सिंधी, बलुची, पश्तून आणि मुहाजिरांना सातत्याने अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्याचबरोबर या सर्वच समुदायांवर तिथल्या सत्ताकेंद्रांनी मिळेल तेव्हा, जमेल त्या प्रकारे अन्याय-अत्याचारही केले. त्यांच्या मागण्या, प्रश्न, समस्यांना केराची टोपली दाखवत केवळ शोषणच केले. इतकेच नव्हे तर वर उल्लेखलेल्या समुदायांतील विरोधी आवाज निर्दयतेने दडपले, चिरडले आणि मारूनही टाकले. कित्येकांचे रक्त सांडले, प्राण घेतले, आयुष्य उद्ध्वस्त केले. आजही पाकिस्तानातील सिंधी, बलुची, पश्तूनी व मुहाजिर समुदायातील मुस्लीम जनता मरणयातना भोगत असून त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. जिहादी दहशतवादाचा खात्मा करण्याच्या नावाखाली पाकिस्तानी सरकार पश्तूनांच्या सामूहिक कत्तली करत आहे, महिला-मुलींवर बलात्कार ही तर नित्याची बाब. पाकिस्तानी लष्कराने उभारलेल्या यातनागृहात आणि नजरकैद शिबिरात हजारो निष्पाप लोकांना डांबून ठेवलेले आहे. पश्तूनींची बहुसंख्या असलेल्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात जणू काही पाकिस्तानी लष्कराचीच हुकूमशाही असल्याचेही दिसते. पाकिस्तान सरकार व लष्कराच्या याच उत्पीडनाला विरोध करण्याचा विडा तिथल्या गुलालाई इस्माईल या महिला अधिकार व मानवाधिकार कार्यकर्तीने उचलला आणि थेट संयुक्त राष्ट्रांसमोर आपल्या समाजाची कैफियत मांडली.

 

गुलालाई इस्माईल वयाच्या सोळाव्या वर्षापासून पाकिस्तानी महिलांच्या मानवी हक्कांसाठी लढत आली. परंतु, तिने पश्तूनी जनतेवरील जुलूमजबरदस्तीला विरोध केला, तशी ती पाकिस्तानी सरकारवर व लष्कराच्या नजरेत आली आणि त्यांनी तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. तिच्या परिवारालाही धमकावले, आई-वडिलांवर खोटे खटलेही दाखल केले. पण, ती डगमगली नाही, उलट जीव वाचवून पाकिस्तानातून पळाली. लपत-छपत सीमा पार करून ती आधी श्रीलंकेला गेली आणि नंतर अमेरिकेला. सध्या गुलालाई आपल्या बहिणीसह ब्रुकलिनमध्ये राहत असून तिथूनच तिने पाकिस्तानचे बीभत्स रूप जगाला दाखविण्याचा चंग बांधला आहे. पाकिस्तानी लष्कराची करतूत आणि कथा ती अमेरिकेत रस्तोरस्ती भटकूनही सांगत आहे. अमेरिकेत पश्तूनींबद्दल अनेक गैरसमज आहेत, ते दूर करण्याचेही तिने ठरवले आहे. पाकिस्तानने मात्र तिच्याविरोधात देशातील संस्थांचा अपमान केल्यावरून अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आता तिच्यावर कारवाई होईल अथवा न होईल तो भाग वेगळा, पण काश्मीरवरून गळे काढणाऱ्या इमरान खान यांच्या देशातले वास्तव हेच आहे आणि मलालासारख्या फ्रॉडनेही काश्मिरातील मुलींची चिंता सोडून जरा आपल्याही देशात डोकावले तर उत्तम!