अक्षय कुमारने शेअर केला 'लक्ष्मी बॉम्ब' चा फर्स्ट लूक

03 Oct 2019 11:53:01


'कांचना' या तामिळ चित्रपटाचा रिमेक असलेल्या 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटातील अक्षय कुमारच्या भूमिकेची झलक आज प्रेक्षकांसमोर आली आहे. अक्षय कुमार या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असून तो एका तृतीयपंथीची भूमिका साकारणार आहे. त्याच्या या फर्स्ट लूकमध्ये त्याने लाल रंगाची साडी परिधान केली आहे तर मागे दुर्गेचे रौद्र रूप असलेली मूर्ती आहे. त्या मूर्तीसमोर उभ्या असलेल्या अक्षय कुमारच्या डोळ्यातील तेज आणि त्याचवेळी झळकणारे उग्र भाव प्रेक्षकांना नक्कीच प्रभावित करतील.

'कांचना' या मूळ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि फिल्ममेकर राघव लॉरेन्स 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटाचे देखील दिग्दर्शन करणार आहेत. नवरात्रीच्या निमित्ताने अक्षय कुमारने त्याच्या भूमिकेची ही झलक आज सोशल मीडियावरून शेअर केली. त्यावेळी त्याने नवरात्री या सणाविषयी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.

'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटात अक्षय कुमार बरोबर किआरा अडवाणी देखील महत्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या कथेनुसार अक्षय कुमार हा एक असा माणूस आहे ज्याचा अद्भुत शक्तींवर विश्वास नाही. मात्र त्याच्या नशिबात काही वेगळेच लिहून ठेवलेले आहे. आता ते काय आहे हाच चित्रपटाचा गाभा आहे. त्यामुळे ही कथा कशी उलगडते ते पाहणे खूपच औत्सुक्याचे ठरेल. पुढील वर्षी २२ मे ला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Powered By Sangraha 9.0