अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

    दिनांक  29-Oct-2019 11:18:42
|राज्याच्या काही भागात अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले असून बाधित घटकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

राज्यातील जनतेच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असून राज्यात आलेल्या प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीत शासनाने तत्काळ मदत केली आहे. सध्या काही भागांत विविध पिकांच्या काढण्या सुरू आहेत. मात्र, राज्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकसानीचे पंचनामे त्वरित करणे गरजेचे असून तसे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.


यंदा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पावसाचा चांगलाच तडाखा बसला. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानाला तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी हे आदेश दिले. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना थोडासातरी दिलासा मिळाला आहे.