आपली शाळा, आपला महाराष्ट्र रिनोव्हेट इंडिया, मुंबई

    दिनांक  29-Oct-2019 22:32:30
|


 


सर्वसाधारणपणे कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली की त्यावेळी देशवासी मदतीसाठी तत्पर असतात. त्यावेळी मदतीचा ओघ येतच असतो. मात्र, काही दिवसांतच ती घटना विस्मृतीत जाते. त्यामुळे एखाद्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आल्यावर त्या परिसराची एकंदर परिस्थिती सगळ्यांनाच माहिती असते. त्या परिस्थितीसंदर्भात उपाययोजनाही आखल्या जातात. पण, ती नैसर्गिक आपत्ती ओसरल्यानंतर त्या ठिकाणची परिस्थिती पाहणेही गरजेचे असते. त्यामुळेच कोल्हापूरला आलेल्या पुराने जे थैमान घातले ते सगळ्यांनी पाहिले. मात्र, त्यानंतरची परिस्थिती पाहणेदेखील गरजेचे होते. कारण, पुरामुळे नेमकी काय हानी झाली याचे वरवर जरी यादी करणे सोपे असले तरी अंतर्गत आणि बाह्यरित्या पुराचा फटका सर्वत्रच बसला होता. त्यामुळे कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरामध्ये कोल्हापूरच्या बांधवांना मदत करताना कसली मदत करता येईल, याचा जेव्हा आम्ही विचार केला, तेव्हा अनेक अंगाने अनेक विकल्प समोर आले. मात्र, त्यातून 'रिनोव्हेट इंडिया' म्हणून आपण काय करू शकतो याचा विचार करता आम्ही ठरवले की आपण कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात काम करायचे,” 'रिनोव्हेट इंडिया'चे प्रथमेश रावराणे सांगत होते.

 

त्यांचे म्हणणेही बरोबरच होते. कारण, कोल्हापुरात नुकत्याच झालेल्या पुराने अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. पंचगंगेच्या तीरावरच्या समस्या एकात एक गुंतलेल्या. पूर आला असताना शासन-प्रशासन, स्थनिक आणि बाहेरच्याही अनेक सेवाभावी संस्थांनी या पूरपरिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी जीवाचे रान केले. संस्थाच नव्हे तर व्यक्तिगत स्वरूपातही अनेक जण या पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तन-मन-धनाने कार्यरत झाले होते. अन्न, कपडे, औषधे, शालेय साहित्याच्या वस्तूंचे तर गरजेपेक्षाही जास्त वाटप झाले, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कारण, पूर, भूकंप, वादळ, ढगफुटी वगैरे वगैरे नैसर्गिक आपत्ती ओढवल्यावर परिस्थिती गंभीरच असते. मात्र, ती आपत्ती ओसरल्यानंतरचे तिचे परिणामही भयंकरच असतात. खरेतर त्या आपत्तीच्या विनाशाचे माप मोजायचे असले, तर ती आपत्ती निर्माण झाल्यानंतर काही दिवसांनीच कळते की, खरे किती नुकसान झाले आहे. पुराने कोल्हापूरचे किती आणि काय नुकसान केले याची माहितीही काही दिवसांनी मिळाली.

 

प्रथमेश सांगतात, पुरामुळे विद्यार्थ्यांचे शालेय साहित्याचे नुकसान झालेच होते. प्रश्नच नव्हता. वह्या-पुस्तके, दप्तरे पुराच्या पाण्याने सगळ्याचाच चोथा करून टाकला होता. पुरानंतरच्या गाळ-कचर्‍यांमध्ये वह्या-पुस्तके, दप्तरे वगैरे रूतून खराब झाल्याचे दृश्य मनाला अत्यंत द्रवित करणारे प्रसार माध्यमांमध्ये वारंवार दाखविण्यात येत होते. तरीही जेव्हा आम्ही शैक्षणिक क्षेत्रात मदत करायचे ठरवले तेव्हा शाळांना मदत करण्याचे ठरवले. त्यातूनच मग 'आपली शाळा , आपला महाराष्ट्र' उपक्रम करायचे ठरवले.”

 

प्रथमेश रावराणे यांच्याशी बोलल्यानंतर 'आपली शाळा आपला महाराष्ट्र' संकल्पना समजली. ही संकल्पना 'पढेगा इंडिया बढेगा इंडियाचा' वारसा सांगणारी. शिक्षण महत्त्वाचे. जेव्हा 'रिनोव्हेट इंडिया'ने पूरपरिस्थितीमध्ये शैक्षणिक क्षेत्रात आपण काय मदत करू शकतो, याची चाचपणी केली. तेव्हा त्यांच्या लक्षात ही बाब आली की, शिक्षणाला पूरक असलेल्या सर्व भौतिक बाबी महत्त्वाच्या. शिकण्यासाठी विद्यार्थी किंवा शिकवण्यासाठी गुरुवर्य असणेच गरजेचे नसते. त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिकण्यासाठी जागा असणे आवश्यक. शिक्षणासाठी शाळारूपी वास्तू आवश्यक.

 

ज्या शाळेत विद्यार्थी चार घटका बसून शिकू शिकतील. त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था, शौचालय, पाण्याची व्यवस्था हे सगळे आवश्यक असते. कोल्हापूरमधल्या पुराने शाळांच्या वास्तूंना अक्षरश: उद्ध्वस्त केलेले. बैठ्या शाळा तर पूर्ण गाळ-चिखलात रूतल्या. त्यातील विद्यार्थ्यांच्या बसण्यासाठी असलेली लाकडी बाके, कुठे लोखंडी बाके, फळा, खुर्च्या, प्रयोगशाळा, प्रयोगशाळेतील सर्व साहित्य, वाचनालये, शौचालये सगळेच पुराच्या पाण्यात तुटून-फुटून, रचनेपलीकडे गेलेले. या सगळ्या व्यवस्था नव्याने करणे गरजेचे होते. ज्या सरकारी शाळा होत्या, त्या शासन-प्रशासन यंत्रणेकडून आज ना उद्या पुन्हा बांधण्यात येणार. शाळेची वास्तू नव्याने पुनर्जीवित करण्यात येणार. बाक, खुर्च्या, प्रयोगशाळा वाचनालये, पाण्याची व्यवस्था, शौचालयेही पुन्हा बांधण्यात येतील. पुन्हा वापरण्याजोगे करण्यात येतील. मात्र, ज्या शाळा खाजगी आहेत आणि ज्यामध्ये सरकार केवळ शिक्षकांच्या वेतनापुरतेच अनुदान देते, त्या शाळांचे काय?

 

कारण, शाळेतल्या शिक्षकांचे वेतन जरी सरकार देत असले तरी, शाळेच्या इतर सर्व खर्चिक बाबी त्या त्या शाळा चालविणारे स्वत: करतात. आता अचानक आलेल्या पुराने शाळाच उद्ध्वस्त झाल्यावर एकाएकी पुन्हा सर्वांगाने शाळा उभारणीचा खर्च सगळ्यांनाच परवडणारा नव्हता. त्यातही कोल्हापूरच्या कित्येक शाळासंस्था या खरोखर सचोटीने, त्यातही विद्यादानाचा पवित्र भाव मनात ठेवून सुरू होत्या. शाळा चालवताना 'ना नफा ना तोटा' हा त्यांचा उद्देश. पुरामुळे या शाळांचे खरे नुकसान झाले. तसेच या शाळाही वस्तीपातळीवरच्याच. या शाळांमध्ये गरजू गरीब विद्यार्थी शिक्षण घेत. शाळाच कोलमडल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. 'रिनोव्हेट इंडिया'ने या शाळांच्या सर्वतोपरी पुनर्स्थापनेचे काम करण्याचे ठरवले. मदत करायला अनेक हात तयार होते आणि पुढेही मदत मिळू शकणार होतेच. मात्र, मदत करताना कोल्हापूरमधील कोणत्या तालुक्यात कोणत्या शाळेत काय नुकसान झाले आणि त्यांना नेमकी काय मदत हवी, याची माहिती असणे गरजेचे होते. ती माहिती कागदोपत्रीही मिळू शकत होती. पण 'रिनोव्हेट इंडिया'ने ठरवले की ही माहिती मिळवण्यासाठी एक मोबाईल अ‍ॅप तयार करायचे, त्या अ‍ॅपमध्ये शाळेच्या माहितीसह, नुकसानीसंदर्भातले वास्तव नोंद करायचे. मोबाईल अ‍ॅप शेवटी एक यंत्रणा जरी असली तरी तिचे नियंत्रण मानवी मेंदूकडेच आणि तितकेच मानवी भावनांकडे.

 

कारण, या अ‍ॅपवरच्या प्रश्नांच्या माहितीची नोंद तर शेवटी माणूसच करणार होता. त्यामुळे या अ‍ॅपमध्ये कोणती माहिती असावी, कोणते प्रश्न असावे, याबद्दलही बरेच चिंतन आणि सर्वेक्षण याचा अगदी अभ्यासच केला गेला. कोणतेही सामाजिक काम करायचे असल्यास ते सामुदायिक आणि पारदर्शक असावे, असे 'रेनोव्हेट इंडिया'चे सहसंस्थापक आलोक कदम यांचा आग्रह होता. त्यानुसार 'रिनोव्हेट इंडिया'ने अत्यंत कष्टाने आणि प्रयत्नाने एक सर्वेक्षण केले. सुरुवातीपासूनच पारदर्शकतेचा आग्रह असल्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी 'सिनेर्जीक नेट' या संस्थेची मोलाची साथ लाभली. या अ‍ॅपमध्ये शाळाचे 'जीपीएस लोकेशन', झालेल्या नुकसानीचे फोटो आणि शाळा उभारणीसाठी लागणारा खर्च इ. माहिती भरण्याची सोय होती.

 

अ‍ॅप तर बनवून झाले. या अ‍ॅपद्वारे सर्वेक्षण कुठे करायचे ते कोल्हापूरमधील तालुकेही निवडण्यात आले. हातकणंगले, भुदरगड, करवीर, चांदगड, शाहूवाडी,पन्हाळा, आजरा, शिरोळ, गडहिंग्लज या तालुक्यांना पुराचा जास्त फटका बसला होता. या तालुक्यांमध्ये शाळा नुकसानीच्यासंदर्भात सर्वेक्षण करण्याचे ठरले. हे सर्वेक्षण कोण करणार, यावरही 'रिनोव्हेट इंडिया'चे ठाम मत होते. 'रिनोव्हेट'चे मत होते हे सर्वेक्षण समाजसहभागातून त्यातही समाजाची तळमळ असणार्‍यांनी करावे. 'रिनोव्हेट इंडिया'चा कामाच्या माध्यमातून अशा अनेक सेवाभावी संस्थांशी परिचय होता, ज्या संस्था मुंबईतही आहेत, पण कुठेही गरज असली की मदतीसाठी तप्तर असतात. शाळांच्या पुनर्वसनाच्या कामासाठी दहा सेवाभावी संस्थांची निवड करण्यात आली. अर्थात, त्या संस्था स्वेच्छेने आणि स्वयंप्रेरणेने काम करण्यास तयार झाल्या. त्यात कोल्हापूरस्थित तसेच मुंबईस्थित परंतु कोल्हापुरात सामाजिक कामाचा अनुभव असलेल्या संस्थांचा समावेश होता. या संस्थांच्या प्रतिनिधींना या अ‍ॅपचे प्रशिक्षण देण्यात आले. सर्वेक्षणासाठी सुरुवातीला एक संस्था, एक तालुका आणि सात शाळा असे प्रमाण ठरविण्यात आले. या प्रकल्पाच्या उत्तम व्यस्थापनासाठी सामाजिक कार्याची उत्तम जाण असलेल्या स्नेहल कुलकर्णी यांची प्रकल्प समन्वयक म्हणून निवड करण्यात आली. संस्थांनी १५ दिवसात पुरामुळे प्रभावित शाळांचा सर्व्हे केला. साधारणत: ७० शाळांचा सर्व्हे करण्यात आला. त्यातील ५० अत्यंत गरजू शाळांची निवड करण्यात आली आहे.
 

या सर्वेक्षणात सहभागी असलेल्या संस्थांपैकी एक सेवाभावी संस्था म्हणजे 'संकल्प फाऊंडेशन.' मुंबईच्या या संस्थेचे संस्थापक आणि सर्वेसर्वा विनोद हिवाळे हेसुद्धा वासुदेव पाटील, रेश्मा निकाळजे, संध्या भंडारे, वंदना कांबळे या आपल्या सहयोगींसोबत सर्वेक्षणात सामील झाले. विनोद सांगतात की, ”कोल्हापूरमध्ये पूर आला त्यावेळी 'संकल्प संस्थे'नेही 'फुल ना फुलाची पाकळी' तरी मदत करायला हवी, असे ठरवले. नेहमीप्रमाणे वस्तू वाटप किंवा स्वच्छता मोहीम हे पर्याय होतेच. प्रथमेश रावराणे यांच्याशी कामानिमित्त आधीपासून संपर्क होता. त्यांनी आम्हाला 'आमची शाळा आमचा महाराष्ट्र' उपक्रमासंदर्भात सांगितले. हा उपक्रम खरेच गरजेचा होता. तसेच 'संकल्प संस्था' अनेक सेवाभावी उपक्रम करत असते. पण अशा प्रकारे तंत्रज्ञानावर आधारित आणि प्रत्यक्ष नुकसान झालेल्या स्थानावर जाऊन काम करणे हा अनुभव महत्त्वाचा होता. त्यातही मी नागरी सेवा दलाचा गेले २५ वर्षे मानवसेवा अधिकारी आहे. आपत्ती व्यवस्थापन हा माझा विषय. त्यात काम करण्याची मला मनापासून इच्छा. त्यामुळे कोल्हापूरमधील आपत्तीग्रस्त भागात प्रत्यक्ष सहभागी होऊन काम करण्याचे ठरवले. संस्थेतील पदाधिकारीही सोबत होतेच. आमच्या संस्थेने कोल्हापूरचा शिरोळा तालुका निवडला. कारण, या तालुक्यात सगळ्यात जास्त पुराचा फटका बसलेला.”

 

विनोद हिवाळे आणि सहकार्‍यांनी कसे सर्वेक्षण केले, हे सांगणे गरजेचे आहे. थोड्याबहुत फरकाने याच प्रकारे सर्वच सहभागी संस्थांनी काम केलेले. विनोद यांनी शिरोळे तालुक्यातील ग्रामस्थांशी संपर्क साधला. तोही याचा पाहुणा, त्याचा नातेवाईक या ओळखीतून. शिरोळ्यातील नेमक्या कोणत्या शाळांचे जास्त नुकसान झाले हे कोण सांगणार? याचा शोध घेण्यात आला. याने त्याचा त्याने याचा संपर्क क्रमांक देत शेवटी मोजून दहाव्या संपर्क क्रमाकांवर महिपते सरांचा क्रमांक मिळाला. त्यांच्याकडे शिरोळ्यातील सर्वात जास्त नुकसान झालेल्या शाळांचा तपशील होता. 'संकल्प संस्थे'ने महिपतेसरांकडून तो तपशील मागविला. त्यानुसार शाळांशी संपर्क साधला गेला. १५ शाळांच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून त्यांना कोल्हापूरला भेटण्याचे ठरवले. त्यानुसार 'संकल्प'चा गट कोल्हापूरला गेला. तिथे राहिला. शाळांना भेट दिली. मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी वर्ग यांच्याशी चर्चा केली. पंचनाम्याची कागदपत्र पाहिली, शाळेची इतरही कागदपत्रे पाहण्यात आली. त्यानुसार अ‍ॅपमध्ये माहिती भरण्यात आली. प्रत्यक्ष पाहिल्यामुळे आणि संवाद साधल्यामुळे अ‍ॅपमध्ये नोंदणी केलेली माहिती शतप्रतिशत सत्य होती.
 

तर अशा प्रकारे कोल्हापूरमधील पूरग्रस्त शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार आता 'रिनोव्हेट इंडिया'कडे माहिती आली की कोणत्या शाळांना कोणती मदत हवी आहे. शाळेत झालेल्या एकूण नुकसानीपैकी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक बाबींना प्राधान्य देण्यात आले. त्यात मुलामुलींचे स्वच्छतागृह, वर्गखोल्या, प्रयोगशाळा, संगणकवर्ग, वाचनालये, फळा, बेंच, पाणी शुद्धीकरणयंत्र आणि खेळाचे साहित्य यांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे साधारणपणे ५० शाळांमधील १२ हजार, ५०० विद्यार्थ्यांचा फायदा अपेक्षित आहे. सर्वेक्षणाचा पहिला तसेच महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. आता निधी संकलनासाठी विविध कॉर्पोरेट कंपन्यांना भेटणे सुरू आहे. समाजातील विविध कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घेऊन या प्रकल्पाला मदत करण्याचे आवाहन प्रकल्प समन्वयक स्नेहल यांनी केले आहे. दिवाळीनंतर या मदतकार्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या पूरग्रस्त शाळांना पुन्हा नवतेज नवजीवन प्राप्त होणार आहे.

९५९४९६९६३८

(संपर्क ः प्रथमेश रावराणे - ९८६७१०५६५०)

सहभागी संस्था:

. आदर्श फाऊंडेशन

. संकल्प

. स्पंदन युवा प्रतिष्ठान

. गर्जनाप्रतिष्ठान

. विश्वशांती महिला विकास मंडळ

. साद फाऊंडेशन

. युवा म्हल्हार फाऊंडेशन

. हिवाळे फाऊंडेशन

. सावित्री महिला मंडळ

१०. सेवा सहयोग फाऊंडेशन