काबिल है वही राजा बनेगा!

    दिनांक  27-Oct-2019 20:38:52   
|
 


'मिसाईल मॅन' अब्दुल कलाम म्हणाले होते की, "छोटी स्वप्ने पाहणे गुन्हा आहे." हे वाक्य नुकतेच आमदार झालेल्यांनी इतकं मनावर घेतलं आहे की, विचारता सोय नाही. आमचे कर्तृत्व काही नसले तरी आम्हीच सार्वभौम असायला हवे, हा अट्टाहास. तर कष्टाने, जिद्दीने पहिला क्रमांक मिळवलेला आपली शालीनता सांभाळत आहे. बाकीचे 'कॉप्या' करून काठावर पास झालेले, प्रमोट झालेले किंवा गेल्या वर्षापेक्षा एक-दोन गुण जास्त मिळवलेल्यांना मात्र काय करू न् काय नको झाले आहे. समाजशास्त्रामध्ये वडिलोपार्जित नेतृत्वगुणाचे चांगलेच वर्णन येते. आजचे राजकारण यानुसारच चालले आहे, यात शंका नाही. 'सुपर ३०' सिनेमा हल्लीच प्रसिद्ध झाला. त्यातला नायक गरीब घरच्या होतकरू, कष्टकरू, नीतीमान मुलांना आयुष्यात यश मिळावे म्हणून अविरत परिश्रम घेतो. प्रस्थापित, अतिश्रीमंत, तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मणार्‍या मुलांसमोर आपली काय पत्रास, असा न्यूनगंड असणारी ती गरीबाघरची हुशार मुलं. त्यांच्या ताकदीची जाणीव त्यांना करून देण्यासाठी नायक म्हणतो, "अब राजा का बेटाही राजा नही बनेगा, तो जो काबिल है वही राजा बनेगा." हे 'राजत्व' देशाने नरेंद्र मोदींच्या रूपात पाहिले तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या रूपात. ते राजाचे पुत्र नव्हते की कोण्या प्रस्थापित सत्ताधिशाचे वारस नव्हते. पण, त्यांनी सिद्ध केले होते की, 'अब राजा का बेटाही राजा नही बनेगा, काबिल है वही राजा बनेगा.' तर असे हे 'स्वयंमेव मृगेंद्रता' असलेले 'राजत्व' राजकारणामध्ये जागृत असणे हे सत्तेसाठी, समाजासाठी आणि खुद्द राजा बनू इच्छिणार्‍यांच्या समर्थकांसाठीही गरजेचे आहे. कारण, वंशानुसार जाती आणि जातीनुसार ठरलेले काम करायचे दिवस गेले. पिताश्री, काकाश्री आणि मातोश्रींची पुण्याई असतेच असते, पण स्वकर्तृत्वाने प्रकाशमान होणार्‍या तेजाचेच कालपरत्वे स्वागत होते, हे नक्की. सत्ता काय, येते-जाते, पण सत्ताप्राप्तीसाठी अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले की त्याचे हसेच होते. महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या घडामोडीत असे अर्ध्या नव्हे, तर इंचभर हळकुंडाने पिवळे झालेले अनेक आहेत. असे जरी असले तरी पुरोगामी महाराष्ट्रात आज जो काबिल आहे, तोच राजा बनेल हे नक्की!


भानावर या
, भानावर या...!

पुरोगामी, सेक्युलर वगैरे असलेल्या शरद पवारांच्या नातू रोहित पवारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नातू आदित्य यांच्याशी समन्वय साधून काम करणार, असे म्हटले आहे. रोहित पवार असू देत की आणखी कुणी लोकप्रतिनिधी असू देत, जनतेने त्यांना कुणाशी समन्वय किंवा संघर्ष करण्यासाठी नव्हे, तर आपल्या समस्या मांडण्यासाठी, सोडवण्यासाठी आमदार बनवले आहे. बरे, रोहित यांना कुणी विचारलेही नाही की, तुम्ही अमक्या-अमक्याशी समन्वय साधणार का? म्हणून. पण, सध्याचे सत्तास्थापनेचे वातावरण. निवडणूक संपली. पण निवडणुकीचे 'खरे रंग अपनो के संग' और 'गैर को संग' वगैरेची रंगीत तालीम सुरू झाली आहे, तर नातोबांनी समीकरण काय करावं? तर 'कौन बनेगा मुख्यमंत्री' ची रंगीत तालीम सुरू असताना, यांनी आजोबांसारखा आडआडून नथीतून तीर मारण्याचा प्रयत्न केला. अर्थात, व्यक्तिस्वातंत्र्य आहे म्हणा. करा काहीही. शहर बसा नही की आ गये लुटेरे... एक सुप्रसिद्ध वाक्य. त्या वाक्याची आठवण झाली. अजून सत्तास्थापनेचे ढोल वाजायला नुकतीच सुरुवात झाली आहे. या सत्तेेच्या यज्ञकुंडात आपले पूर्वज प्रस्थापित म्हणून अग्रपूजा आम्हीच करणार, ही मानसिकता. देशाचे, महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की, ही प्रस्थापितांच्या घराणेशाहीचा लादलेला अंकुश आजही इथे हतबलतने मिरवावा लागतो. असो, आर्किमिडीजही 'युरेका युरेका' म्हणताना जितका आनंदी झाला नसेल, तितका आनंदसाहेबांना आणि साहेबांच्या कोंडाळ्याला झाला आहे. कारण काय, तर यांच्या पोटापुरत्याही नाहीत, उगीच मोजण्यापुरत्या तरी सिटा विधानसभेमध्ये आल्या. लोक म्हणतात, "थोरल्या साहेबांनी पावसात भिजण्याचे बेमालूम कॅरेक्टर निभावले. महाराष्ट्र दगडाचा, पत्थराचा देश असेल, पण लोक मात्र दयाळू, मायाळू, साधेभोळे. कुणी रडायचे नाटक केले तरी रूमाल सोडा, आपले कातडी सोलून डोळे पुसायला तयार. याचा थांग थोरल्या साहेबांना लागलेला. त्या बळावर पक्षाला जिवंत आहोत, असा व्यक्त करण्याची थोडी संधी मिळाली. पण, या संधीबद्दल त्यांनी स्वतःचीच किती पाठ थोपटून घ्यावी? 'परत या, परत या,' सारखे यांना म्हणावेसे वाटते, "तुम्हाला जनतेने फक्त पोटापुरत्या जागा निवडून दिल्या आहेत. भानावर या. भानावर या...!"