दिवाळीच्या आनंदावर पावसाचे विरजण

    दिनांक  26-Oct-2019 21:22:56
|

मुंबई
: मुंबईसह राज्यभरात दिवाळीचे वातावरण रंगात येत असतानाच गेले अनेक दिवस सातत्याने कोसळणार्‍या अवकाळी पावसाने रंगाचा बेरंग केला. मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने मुंबईसह राज्यभरात धुडगूस घातला आहे. अशावेळी लोक दिवाळी सणासाठी खरेदीकरिता बाहेर पडणे टाळत आहेत. दिवाळी सण म्हणजे आनंदाची पर्वणी असते. रंगीबेरंगी कपडे परिधान करून मिरवणारी तरुणाई, घरोघरी आणि अंगणी रांगोळी काढण्यात मश्गुल असणार्‍या तरुणी, रस्तोरस्ती मोठमोठ्या आकाराच्या रांगोळ्या काढणार्‍या संस्था-संघटनेचे कार्यकर्ते, किल्लेबांधणीत रममाण झालेली बच्चेकंपनी आणि अमाप उत्साहात सुरू असलेली खरेदी असे चित्र असते, पण परतीच्या पावसाने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. कधी जोरात, तर कधी रिपरिप करणार्‍या पावसामुळे खरेदी करण्यासाठी बाहेर पडणे लोक टाळत आहेत. पाऊस कमी असल्याचा अंदाज घेत कोणी बाहेर पडले तर डबक्यात साचलेल्या चिखलामुळे त्यांचे कपडे रंगतदार होत आहेत. पाऊस नेहमीच रिपरिप करत असल्याने आकाशकंदील आणि दिवे लावायचे कसे, याची चिंता सगळ्यांनाच भेडसावते आहे.धनत्रयोदशी काहीशी तेजीत

धनत्रयोदशीने दिवाळी सणाला सुरुवात होते. या दिवशी धनाची पूजा म्हणून सोने खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. मात्र, रिपरिप करणार्‍या पावसाने शुक्रवारी काहीशी विश्रांती घेतल्याने लोक खरेदीसाठी बाहेर पडले. मात्र, त्यात दागिने खरेदी करणार्‍यांचे प्रमाण अधिक होते.तरीही रस्त्याला गर्दी

मुंबईचे रस्ते नेहमीच गर्दीने तुडुंब वाहत असतात. त्यात सण म्हटला की थोडीशी गर्दी वाढली तरी ढकलाढकलीचे, चेंगराचेंगरीचे प्रकार घडतात. यात मोठी खरेदी करता नाही आली तरी फुलांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होते. मुंबईत पाऊस असला तरीही फुलमार्केटकडील रस्ते गर्दीने ओसंडून वाहत आहेत.दुकानदार आशावादी

दिवाळीच्या आठ दिवस आधीपासूनच बाजार फुललेले दिसतात. मात्र, पावसामुळे म्हणावी तशी गर्दी बाजारात दिसत नाही. रस्त्यावरील विक्रेत्यांना याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे आधीच मंदी आणि त्यात पाऊस अशा कोंडीत दुकानदार व व्यापारी सापडले आहेत.