दुसर्‍यांदा शंभरपेक्षा जास्त आमदार निवडूनआणणं, हे फडणवीसांचे ऐतिहासिक यश!

    दिनांक  26-Oct-2019 22:26:17
|

 
ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांचे मत 


मुंबई, दि. 26 (प्रतिनिधी): “सलग दुसर्‍यांदा शंभरपेक्षा अधिक आमदार निवडून आणणे, हे देवेंद्र फडणवीसांचे ऐतिहासिक यश आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी शनिवारी विलेपार्ले येथे केले. ते लोकमान्य सेवा संघ आयोजित लोकमान्य शताब्दी व्याख्यानमालेत 2019 च्या महाराष्ट्राच्या वैधानिक निवडणुकांचा अन्वयार्थ या विषयावर बोलत होते.


“लोकशाहीतील जनतेच्या सामूहिक शहाणपणाचे विराट दर्शन या निवडणुकीत दिसले,” असे सांगून त्यांनी अनेक उदाहरणे दिली. “या निवडणुकीत ठिकठिकाणी नोटा पर्यायाला मिळालेली मते ही चुकीच्या उमेदवार निवडीचे निदर्शक आहेत,” असे ते म्हणाले. उदाहरण म्हणून त्यांनी लातूर ग्रामीणचे उदाहरण दिले. “तेथे 2014 मध्ये भाजपला 85 हजार मते मिळाली होती, तर शिवसेनेला अवघी दीड हजार मते होती. ती जागा शिवसेनेला सोडली गेली. तेथे आता नोटा ला 20 हजार मते मिळाली आहेत,” असे ते म्हणाले.
“या निवडणुकीत प्रत्येक पक्षाला एक संदेश दिला गेला आहे,” असे ते म्हणाले. भाजप-शिवसेनेला एकमेक विश्वासाने सोबत राहा, असा संदेश आहे, तर विरोधकांना भाजपला स्थानिक पातळीवर हरवू शकता, असा आत्मविश्वास दिला आहे,” असे डॉ.निरगुडकर यांनी सांगितले.
त्यांनी आपल्या व्याख्यानात एकूण निवडणूक प्रचाराचा आणि घटनांचा धावता आढावा घेतला. “या निवडणुकीत शरद पवार हे सर्वात जास्त लक्षवेधी ठरले, असे ते म्हणाले. त्याचे कारण त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाची ही लढाई होती आणि ते ती यशस्वीपणे लढले,” असे ते म्हणाले. “या वयात त्यांनी घेतलेली मेहनत लक्षवेधी होती,” असे त्यांनी सांगितले. “गेल्या 30 वर्षांत इतकी एकतर्फी निवडणूक आपण पाहिली नव्हती,” असे सांगून ते म्हणाले की, “दोन ठिकाणी शरद पवार यांनी वातावरण फिरवले. पहिला टर्निंग पॉईंट हा त्यांनी अमित शाह यांना दिलेले उत्तर की, मी कधी जेलमध्ये गेलो नाही हा होता, तर दुसरा टर्निंग पॉईंट ईडीच्या नोटिशीच्या वेळी त्यांनी महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणारी नाही, हे केलेले वक्तव्य हा होता,” असे त्यांनी सांगितले. “शरद पवार हे एकमेव वेगळे विजिगीषू नेते आहेत,” असे ते म्हणाले. “शरद पवारांनी अडचणीत असलेल्या राष्ट्रवादी पक्षाला नवसंजीवनी दिली मात्र ती विजिगीषू वृत्ती काँग्रेसमध्ये दिसली नाही,” असे ते म्हणाले. “राहुल गांधींसारखे केंद्रीय नेतृत्व केवळ तीन सभा घेऊन नंतर दिसलेच नाही याचे आश्चर्य वाटते. मात्र, तरी काँग्रेसला मिळालेले या निवडणुकीतले यश हे तळागाळातील कार्यकर्त्यांमुळे मिळाले आहे,” असे डॉ. निरगुडकर म्हणाले. आज या निकालानंतर इव्हीएमवर कोणीही बोलत नाही, हे या निवडणुकीचे आणखी एक यश असल्याचे त्यांनी नमूद केले.
“या निवडणूक निकालांचा भाजपला राज्यसभेत फटका बसणार आहे, ”असे डॉ. निरगुडकरांनी सांगितले. “या निवडणुकांत 10 टक्के मुस्लीम आमदार निवडून आले आहेत आणि 20 ठिकाणी मुस्लीम आमदार दुसर्‍या क्रमांकावर आहेत,” असे ते म्हणाले.
“देवेंद्र फडणवीस आपल्या सगळ्या 40 मिनिटांच्या भाषणात विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवूनच बोलत होते, मात्र त्यांचे तेल लावलेला पैलवान हे एक वाक्य आणि 370 कलमाविषयी एक वाक्य इतकेच माध्यमांनी जास्त प्रकाशझोतात आणले,” असे निरीक्षण डॉ. निरगुडकरांनी नोंदवले.
“भारताच्या इतिहासात ही पहिली वेळ आहे की, भाजप राष्ट्रीय राजकारणाची आणि राष्ट्रवादाची विषयपत्रिका (अजेंडा) ठरवत आहे आणि काँग्रेस केवळ प्रतिक्रिया देत आहे,” असेही निरीक्षण डॉ. निरगुडकरांनी नोंदवले. “या निवडणुकांनंतर देवेंद्र फडणवीस व्हर्जन 2 आणि उद्धव ठाकरे व्हर्जन 2 ही आव्हाने या दोघांनाही पेलायची आहेत,” असेही ते म्हणाले. “अजून शेतकर्‍यांना 12 तास वीज मिळण्याचा प्रश्न, अनेक अपुरे पायाभूत प्रकल्प वेगात पूर्ण करणे, ही आव्हाने फडणवीस सरकारसमोर असतील,” असे त्यांनी सांगितले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष दीपक घैसास हे होते, तर सूत्रसंचालन संगीता साने यांनी केले.