देशभर वसुबारस आणि धनत्रयोदशीचा जल्लोष

    दिनांक  25-Oct-2019 13:06:48
|


 

आज सकाळपासून दिव्यांचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या सणाला उत्साहात सुरुवात झाली. आज दिवाळीचा पहिलाच दिवस. आज साजऱ्या होणाऱ्या दिवाळीच्या सणाला वसुबारस आणि धनत्रयोदशी असे म्हणतात. सवत्स धेनू अर्थात गाय आणि गोऱ्ह्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा वसुबारस आणि आरोग्यदेवता धन्वंतरी पूजनाचा आजचा दिवस. आज सायंकाळी यमदीपदान करण्याचा प्रघात आहे. आदिवासी समाजात आजचा दिवस वाघबारस म्हणूनही साजरा केला जातो.

 

वर्षभरात केलेले नवस फेडण्यासाठी आदिवासी बांधव आजच्या दिवशी वेशीवरच्या वाघाच्या मंदिरात जमा होतात. जंगलातल्या हिंस्र प्राण्यांपासून पाळीव प्राण्यांचं गाई – गुरांचे रक्षण व्हावे यासाठी वाघाला तांदळाच्या खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्याच्या अतिदुर्गम भागात वाघबारस साजरी करण्याची अनोखी परंपरा आदिवासी बांधवांनी आजही जपली आहे.

 

पुढील काही दिवस आता दिव्यांची ही आरास सर्वांच्या घराला एक वेगळीच रोषणाई आणि प्रसन्नता देईल. दिवाळी हा भारतीय हिंदू प्रमापारेतील एक उत्साहवर्धक असा सण आहे. ज्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण एकत्र येतात आणि आनंदाने, उत्साहाने हा सण साजरा करतात.