जो वादा किया वो निभाना पडेगा !

    दिनांक  25-Oct-2019 16:02:34
|
 


आरे आंदोलकांनी करून दिली आश्वासनांची आठवण 


मुंबई : महाराष्ट्राची रणधुमाळी संपली, आता सत्तास्थापनेसाठी हालचालीही सुरू झाल्या आहेत. मात्र, आरे आंदोलक आपल्या मागणीवर ठाम आहेत. आरे प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची वेळ आली असल्याची आठवण आदित्य यांना करून देण्यात आली आहे. आरे कारशेडमध्ये झालेल्या वृक्षतोडीनंतर आदित्य ठाकरे यांनी याविरोधात आवाज उठवला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही 'सत्ता आल्यावर पाहून घेऊ, आरे जंगल म्हणून घोषित करू', अशी घोषणाही त्यांनी केली होती. आता हेच आश्वासन उद्धव व आदित्य ठाकरे पाळणार का असा प्रश्न सोशल मीडियाद्वारे विचारला जात आहे.

 

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी याबद्दल कोणतिही प्रतिक्रीया दिलेली नाही. आरे आंदोलनाचा तितकासा परिणाम निवडणूक निकालांवर जाणवलेला नाही. प्रस्तावित आरे कारशेड ज्या भागात आहे तिथले शिवसेना-भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. यापूर्वी आंदोलकांनी मतपेटीतून त्यांचा राग व्यक्त करावा, असे आवाहन जनतेला केले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शिवसेनेला याबद्दल आपल्या भाषणांदरम्यान जाब विचारला होता. त्यामुळे आता सत्ता आल्यानंतर तरी आपले आश्वासन पाळा, असे आवाहन नेटकऱ्यांनी केले आहे.