पैठणीच्या कंदिलांचा राजेशाही थाट !

    दिनांक  25-Oct-2019 20:16:23
|हर्षाभि क्रिएशन्स'ची कमाल 

 

मुंबई (प्रतिनिधी) - यंदाच्या दिवाळीत तुमच्या कंदिलांना पैठणीची साथ मिळाली तर ? ‘हर्षाभि क्रिएशन्सने तयार केलेले असेच काहीसे कंदील लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. पर्यावरणपूरक दिवाळीची कास धरत कागद आणि लाकडाला पैठणी साड्यांची जोड देत हे राजेशाही कंदील तयार करण्यात आले आहेत. अत्यंत आकर्षक आणि देखण्या दिसणाऱ्या या कंदिलांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
 
 

 
 

'मयुर', 'राजश्री', 'अरण्या', 'तेजोमय', 'नभोमणी', 'अन्यन्या' ही नावे आहेत, दिवाळीत दारी लागणाऱ्या कंदिलांची. यंदाची दिवाळी अधिक तेजोमय आणि कलात्मक करण्यासाठी हर्षाभि क्रिएशन्सने पैठणी कंदिलांची निर्मिती केली आहे. वन्यजीव संशोधन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अभिषेकने अंगी असलेल्या कलेची आवड जोपासून हर्षाभि क्रिएशन्ससुरूवात केली. पत्नी हर्षदा साटम हिच्यासमेवत यंदा त्याने पैैठणीचे कंदील तयार केले आहेत. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेकने कंदील बनविण्यास सुरूवात केली. सण-उत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजीही घ्यायला हवी. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक कंदील तयार करण्यावर भर देत असल्याचे अभिषेकने सांगितले. गेल्या वर्षी त्याने कंदिलांना जरीच्या साड्या, खण, लोकर यांची सजावट केली होती. मात्र, यंदा काही नावीन्यपूर्ण करण्याच्या निमित्ताने या साटम दाम्पत्याने कंदिलांना पैठणीचे स्वरूप दिले. हे कंदील दीर्घकाळ टिकणारे आहेत. त्यामुळे प्रत्येकवर्षी नवे कंदील घेण्याची गरज नाही. शिवाय कंदिलांकरिता कागदी पिशव्याही तयार केल्या आहेत. मुंबई, विरार, बोरिवली, पुणे, लालबाग आदी भागांमधून या कंदिलांना मोठी मागणी आहे.

 

 
 

कसे आहेत कंदील

'राजश्री', 'तेजोमय', 'मयुर', 'नभोमणी', 'अरण्या', 'अनन्या', 'गुलकंद' आणि 'नक्षत्र' कंदिलांमध्ये पैठणी साडीचा वापर केला आहे. पैठणी' म्हणजे आपल्या पारंपरिक वस्त्रांपैकी एक. म्हणूनच त्यांनी मुद्दाम आकाश कंदिलाच्या त्रिकोणांमध्ये पैठणी साडीच्या काठाचा वापर केला आहे. 'नक्षत्र' कंदील लहान स्वरूपातला असून त्यासाठी विविध रंगीबेरंगी कागदांचा वापर करण्यात आला आहे. या कंदिलांची किंमत दोन हजार रुपयांपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी अभिषेक साटम यांच्याशी 9870742598 या क्रमांकावर संपर्क साधावा.