कारागृहातून निवडणूक लढवत उधळला गुलाल

24 Oct 2019 18:50:09





परभणी
: जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एखाद्या उमेदवाराने कारागृहातून निवडणूक लढविली आणि जिंकली.
गंगाखेड विधासभा मतदार संघातून रासपचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांनी महायुतीचा निर्णय झुगारत शिवसेनेचे उमेदवार विशाल कदम यांच्याविरोधात निवडणूक लढविली. तब्बल १४००० मतांची आघाडी घेत त्यांनी कदम यांचा पराभव केला.



हा मतदारसंघ महायुतीच्या वाटाघाटीत शिवसेनेच्या वाट्याला गेला होता
; परंतु २०१४ च्या निवडणुकीत भाजपने हा मतदार संघ रासपला देऊ केला होता. त्यानुसार रासपचे नेते तथा उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी ही निवडणूक लढवली. त्यांना अगदी थोड्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, त्यानंतर उमेद न हरता रत्नाकर गुट्टे यांनी पाच वर्ष जोरदार तयारी सुरू ठेवली. परंतु मध्यंतरीच्या काळात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि गंगाखेडचे आमदार मधुसूदन केंद्रे यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर शेतकऱ्यांचे परस्पर साडेपाच हजार कोटी रुपयांचे कर्ज उचलून त्याचा अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला. ईडीने त्यांची चौकशी लावली. त्यामुळे ते सध्या परभणीच्या कारागृहात आहेत.



विशेष म्हणजे गंगाखेड शुगरचे चेअरमन असलेल्या रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्यावर गंगाखेड विधानसभेतील शेतकऱ्यांचे मोठे अर्थकारण अवलंबून आहे. हजारो शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला जात असल्याने शेतकऱ्यांची त्यांच्या बाजूने सहानुभूती होती. हीच सहानुभूती त्यांना कारागृहात असतांना देखील विजयापर्यंत पोहोचू शकली.एकूणच परभणीच्या नव्हे तर मराठवाड्याच्या इतिहासात प्रथमत एखाद्या उमेदवाराने कारागृहात राहून विधानसभेचे युद्ध जिंकले. महाराष्ट्रातल्या सध्याच्या विधानसभा निवडणुकीत देखील रत्नाकर गुट्टे हे एकमेव उमेदवार आहेत
, जे कारागृहातून निवडणूक लढले. दरम्यान, रत्नाकर गुट्टे यांना ८० हजार ६०५ मते मिळाली असून, त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे विशाल कदम यांना ६१ हजार ७०९ मते मिळाली आहेत. गुट्टे यांचा १८४९६ मतांनी विजय झाला.

Powered By Sangraha 9.0