नौदलाची 'सागर'शक्ती : सावरकर स्मारकात नौदलाच्या 'सागर'शक्तीचे २५ ऑक्टोबरपासून प्रदर्शन

    दिनांक  23-Oct-2019 16:04:57
|
मुंबई : इंडो - पॅसिफिक क्षेत्रात एकात्मिक सामुद्रिक सुरक्षेच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 'सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल' म्हणजेच 'सागर’ या संकल्पनेबाबत चर्चा आणि जनजागृती करण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे स्ट्रॅटेजिक सेंटर आणि फोरम फॉर अवेरनेस ऑफ नॅशनल सेक्युरिटी यांच्या संयुक्त विद्यमाने वसुबारस या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमार स्थापना दिनाचे औचित्य साधून २५ ते २७ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत सागरी सुरक्षेवरील प्रदर्शन आणि एक चर्चासत्र स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आले आहे.

 

छत्रपतींचा आरमार स्थापना दिन

 

वसुबारसच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण येथे १६५७ साली आपल्या सागरी आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. त्याचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. २५ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ४ वाजता होणा-या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने एका विशेष चर्चासत्राचे आयोजन केले आहे. यात महाराष्ट्र पोलिस दलाचे माजी महासंचालक प्रविण दिक्षीत, माजी नौदल उपप्रमुख अभय कर्वे, सागरी तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे महानिरीक्षक कमांडर व्ही. डी. चाफेकर, राष्ट्रीय छात्र सेना, महाराष्ट्र चे संचालक सुनील बालकृष्ण तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर हे सहभागी होतील.

 

वैविध्यपूर्ण प्रतिकृतींचे प्रदर्शन

 

नौदलातील नौका, जहाजे, पाणबुड्या, क्षेपणास्त्रे तसेच अन्य सामरिक शक्तींच्या सामग्रींच्या प्रतिकृतींचे भव्य प्रदर्शन यानिमित्ताने जनतेसाठी दररोज सकाळी १० ते ८ या कालावधीत खुले राहणार आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने भारतीय नौदलाचा इतिहास, सामर्थ्य, शत्रूराष्ट्राला नमोहरण करण्याची क्षमता आदींबाबतची झलक अनुभवता येणार आहे.

 

रघुजीराजे आंग्रे यांची विशेष उपस्थिती

 

भारतीय पहिले नौदलप्रमुख म्हणून ज्यांची इतिहासात नोंद आहे, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांची २७ ऑक्‍टोबरला दुपारी दोन वाजता होणाऱ्या समारोपास उपस्थित राहणार आहे. छत्रपतीच्या आरमार स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमास त्यांची उपस्थिती हा एक दुग्धशर्करा योग असणार आहे.

 

सिक्युरिटी अँड ग्रोथ ऑफ ऑल (सागर)

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियातील जकार्ता येथील कार्यक्रमात सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल म्हणजेच सागर या संकल्पनेची घोषणा केली. इंडो- पॅसिफिक क्षेत्रातील सागरी सामर्थ्य तसेच त्यातून परस्पर विकास, अशी ही संकल्पना असून त्यानिमित्ताने यातील प्रत्येक राष्ट्राने त्या अनुषंगाने आपली सामरिक शक्ती वाढवून परस्पर सहकार्य आणि प्रगतीसाठी त्याचा अवलंब करावा, असा दृष्टीकोन आहे. या संकल्पनेला अधिक व्यापकतेने जनतेपुढे नेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमास अधिकाधिक नागरिकांनी, युवा वर्गाने तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे.