एस.टी. कर्मचार्‍यांना दिवाळी भेट, १ लाख कर्मचार्‍यांना लाभ

    दिनांक  23-Oct-2019 19:41:35
|


मुंबई
: गेली ४ वर्षे एस.टी महामंडळातील सर्व कर्मचार्‍यांना दिवाळी भेट देण्यात येते. यापूर्वी कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त रु.१०००० अग्रिम देण्यात आला आहे. एस.टी. महामंडळात कार्यरत असणार्‍या सुमारे १ लाख १० हजार कर्मचारी व अधिकार्‍यांना दिवाळीनिमित्त अनुक्रमे रु.२५०० व रु.५००० इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात येणार आहे. आचारसंहिता अद्यापही असल्याने याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. निवडणूक आयोगाची परवानगी मिळताच कर्मचार्‍यांना दिवाळी भेट देण्यात येईल, अशी घोषणा परिवहनमंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे.


यासंदर्भात एस
.टी.च्या अमळनेर (जळगांव) आगाराचे वाहक मनोहर पाटील यांनी मंत्री महोदयांना दूरध्वनी करुन मागील चार वर्षाप्रमाणे यंदाही सर्व कर्मचार्‍यांना दिवाळी भेट देण्याविषयी विनंती केली होती. त्या विनंतीच्या अनुषंगाने मंत्री महोदयांनी सर्व कर्मचार्‍यांची दिवाळी गोड करण्याच्या दृष्टीने दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला.


केंद्र व राज्यशासनाप्रमाणे देय असलेला ३ टक्के महागाई भत्ता १ जानेवारी २०१९ पासून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यापैकी माहे ऑक्टोबरच्या वेतनामध्ये सदर ३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येत आहे
. जानेवारी ते सप्टेंबर २०१९ पर्यंतचा थकित महागाई भत्ता देण्याबाबतचा निर्णय यथावकाश घेण्यात येईल. त्यामुळे यंदाची दिवाळीही एस.टी कर्मचार्‍यांना आनंदाची होणार आहे.