आशाताईंच्या आवाजातील 'आईची आरती' गाणे प्रदर्शित

    दिनांक  22-Oct-2019 16:14:50
|


 

तिच्या डोळ्यातला चंद्र मावळात नाही...खरेच हिरकणीचे वर्णन करणारे अतिशय समर्पक शब्द आणि भावना असलेल्या 'हिरकणी' या चित्रपटातील बहुप्रतीक्षित गाणे आज प्रदर्शित झाले. 'आईची आरती' हे चित्रपटातील नवीन गाणे सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांनी गायले आहे. त्यांच्या आवाजातील आर्त भाव मनाला चटका लावून जातोच पण हलकेच एक मायेची फुंकर देखील घालून जातो. भावनांनी ओतप्रोत भरलेले असे हे गाणे आज प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

'आईची आरती' या गाण्याचे शब्द प्रसिद्ध गीतकार संदीप खरे यांनी लिहिले आहेत तर अमितराज यांनी गाण्याला संगीत दिले आहे. अशा भोसले यांचा आवाज या गाण्याला लाभल्यामुळे गाण्याला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. 'हिरकणी' च्या चित्रपटकर्त्यांनी 'खूप खूप धन्यवाद आशाताई ! हिरकणी टीम साठी हा अत्यंत अभिमानाचा, कृतज्ञतेचा क्षण आहे' असे म्हणत हे नवीन गाणे सोशल मीडियावर शेअर केले आहे तर आशाताईंनी देखील 'आई आणि मुलाचे नाते उलगडणारी हिरकणीची कथा ही माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे' असे ट्विट करून हे गाणे शेअर केले आहे.

प्रसाद ओक यांनी दिग्दर्शित केलेला 'हिरकणी' हा दुसरा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सोनाली कुलकर्णी या चित्रपटात हिरकणीची भूमिका साकारणार आहे.