बेपत्ता मुलीचा शोध न लागल्याने कुर्ला परिसरात तणाव

    दिनांक  22-Oct-2019 16:24:29
|


मुंबई : १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याच्या नैराश्यातून कुर्ला परिसरात ४८ वर्षीय पित्याने लोकलखाली येऊन आत्महत्या केली होती. काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या घटनेचे पडसात मंगळवारी उमटले. अपहरण झालेल्या मुलीचा तपास अद्याप न लागल्याने संतापलेल्या स्थानिकांनी सायन पनवेल महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. हे आंदोलन चिघळले असून पोलीसांनाही स्थानिकांनी मारहाण केली आहे. परिसरातील वाहनांचीही तोडफोड करण्यात आली आहे.

 

कुर्ला येथील ठक्कर बाप्पा कॉलीनीत राहणाऱ्या पंचाराम रिठाडीया यांना दोन मुले आणि एक मुलगी व पत्नी असा परिवार होता. पांचाराम यांची मुलगी महाविद्यालयात शिकत होती. घरातील इतर सदस्यांना तिच्या वागणुकीतील बदल काही दिवस जाणवत होता. फोनवरील तिचे संभाषण आणि उशीरापर्यंत घराबाहेर ती जात असल्याची तक्रार कुटूंबियांनी तिच्या वडिलांकडे केली होती. मात्र, वडिलांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून अचानक गायब झाल्याने वडिलांना त्याचा धक्का बसला. मुलीच्या जाण्याने ते नैराश्यात गेले होते. त्यांनी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. 

हा सर्व प्रकार घडल्यानंतरही मुलीचा तपास न लागल्याने स्थानिकांनी आता या प्रकरणी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. संतप्त आंदोलनकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला होता. परिस्थिती चिघळल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी गेलेल्या पोलीसांनाही मारहाण करण्यात आली आहे.