
नवी दिल्ली : लडाखमधील श्योक नदीवरील रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पुलाचे उद्घाटन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. तसेच, जगातील सर्वांत उंचावरील युदधभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशरचा भाग पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे, अशी घोषणादेखील राजनाथ सिंह यांनी अधिकृत घोषणा केली. सियाचीन बेस कॅम्प ते कुमार पोस्टपर्यंतचा सर्व भाग हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
"लडाखमध्ये पर्यटनासाठी प्रचंड वाव आहे. लडाखमधील उत्तम कनेक्टिव्हीटी पर्यटकांना नक्कीच मोठ्या संख्येने आकर्षित करेल. हा नवा पूल सर्व प्रकारच्या वातावरणातील बदलातही या भागाला जोडून ठेवणार आहे. तसेच, सीमाभागात एक मोक्याची जागा म्हणून तो नावारुपाला येणार आहे." असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
तसेच ते भारत - चीन संबंधाबद्दल पुढे म्हणाले, "भारताने चीनसोबत सहकार्याचे संबंध प्रस्थापित केले आहेत. येथे फक्त दोन्ही देशांच्या दृष्टीकोनात फरक आहे. दोन्ही देशांमध्ये सीमेवरुन वाद आहेत. मात्र, हे वाद योग्य समज आणि जबाबदारीने हाताळले जात आहेत." सियाचीन ग्लेशरचा भाग पर्यटनासाठी खुला केल्यामुळे येत्या काळात नक्कीच भारतातील पर्यटन व्यवसायासाठी तसेच लडाखच्या आर्थिक विकासासाठी महत्वपूर्ण निर्णय ठरेल अशी आशा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.