मुंबई, पुण्यासह राज्यभर परतीच्या पावसाचा तडाखा

    दिनांक  22-Oct-2019 11:34:33
|मुंबई : मुंबई, पुण्यासह अनेक राज्यांमध्ये सोमवारी रात्रीपासून विजेच्या कडाक्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी भरल्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. नद्यांना पूर आल्यामुळे लातूर, उस्मानाबादमध्ये काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. मुंबई, पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी पावसाने दिवसभर विश्रांती घेतली होती. परंतु, संध्याकाळी विजेच्या कडाक्यासह पावला सुरुवात झाली.

 

मुंबईमध्ये विजेच्या गडगडतासह परतीच्या पावसाचे पुनरागमन

 

सोमवारी मतदानादिवशी दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्री मुंबईसह उपनगरांमध्ये पुन्हा एकदा हजेरी लावली. मुंबईसह उपनगरांत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्या तयार झाल्यामुळे हा पाऊस झाला असल्याचे हवामान खात्याने सांगितले.

 

पुण्यामध्ये पुन्हा घरामध्ये पाणी शिरले

 

मुंबईप्रमाणे पुण्यातही परतीच्या पावसाने थैमान घातले. पुणे शहर आणि परिसरात पुन्हा एकदा झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले तर अनेक घरात पाणी शिरले. यामुळे पुण्यातील जनजीवन काहीकाळ विस्कळीत झाले होते. मध्यरात्री १२ वाजल्यापासून पहाटे ३ वाजेपर्यंत पुण्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कात्रजजवळील ओढा भरून वाहू लागल्याने रस्त्यांवर पाणी साचून अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते.