मतदान केले नाही त्यांचा पगार कापा- रवी जाधव

    दिनांक  22-Oct-2019 12:40:48
|


रवी जाधव यांच्यासह सुमित राघवन यांनी देखील व्यक्त केली नाराजी

मतदान हा लोकशाहीचा उत्सव काल देशभर साजरा झाला. मात्र काल विधान सभेच्या २८८ जागांसाठी झालेल्या मतदानाला म्हणावा तितका चांगला प्रतिसाद मिळाला नाही. काल राज्यभरात ६० पूर्णांक ४६ टक्के मतदान झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील आणि स्तरांवरील लोकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत आणि नाराजी व्यक्त केली. 'मतदान न केलेल्या व्यक्तींचा आणि ३ दिवसांची पिकनिक करून आलेल्यांचा पगार कापावा', अशी कंपनींना विनंती केली. या शिवायही अनेक गोष्टी त्यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये नमूद केल्या.

दरम्यान रवी जाधव यांच्याबरोबरच चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी मतदान करा असे आवाहन केले होते. मतदान करून लोकशाहीचा हा उत्सव साजरा करा असे आवाहन करण्यात आले होते. मुंबईत तर कालच्या दिवसात फक्त ५०.५ टक्के मतदान झाले ही लाजिरवाणी गोष्ट असून कोल्हापूरमध्ये सर्वाधिक म्हणजे ८३.२ टक्के मतदान झाल्याचे सांगत प्रसिद्ध अभिनेता सुमित राघवन यांनी देखील याविषयी नाराजी व्यक्त केली.

काल २८८ जागांसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या "तीन हजार २३७" उमेदवारांचे राजकीय भवितव्य काल इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद झालं. मतमोजणी परवा गुरुवारी २४ तारखेला होणार आहे. किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.