महामंडळाच्या १० हजार बसेस निवडणूक कामात

    दिनांक  22-Oct-2019 21:19:40
|मुंबई : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) तब्बल दहा हजार बसेस भाड्याने घेतल्या होत्या. निवडणूक साहित्याची (ईव्हीएम मशिन्स, कागदपत्रे इत्या.) ने आण करण्यासाठी म्हणजे मतदान केंद्रापर्यंत हे साहित्य पोहोचवण्यासाठी आई तेथून ते मतमोजणी केंद्रापर्यंत नेण्यासाठी या बसगाड्या प्रामुख्याने वापरण्यात आल्या. त्याचाबरोबर अंतर्गत आणि दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचार्‍यांची ने आण करण्यासाठीही या बसगाड्या वापरण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना मात्र भर दिवाळी सुट्टीच्या काळात दोन दिवस गैरसोय सहन करावी लागली आहे. राज्यभरातील तब्बल पाच हजार फेर्‍या या निवडणूक कामामुळे रद्द करण्यात आल्या असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.या बसेस एसटीच्या नेहमीच्या प्रासंगिक कराराच्या दरात भाड्याने घेण्यात आल्या असल्याने एसटी महामंडळाला चांगला महसूल यातून मिळणार आहे
. निवडणूक कामासाठी बसगाड्या देण्याच्या या निर्णयाचा प्रवाशांना फटका बसू नये म्हणून योग्य ती काळजी घेतली आहे असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. गर्दीच्या मार्गावरील तसेच अंतर्गत भागातील फेर्‍या रद्द करू नयेत अशा सूचना त्या त्या आगाराला देण्यात आल्या आहेत, जिथे पर्यायी फेर्‍या उपलब्ध आहेत तिथल्याच फेर्‍या कमी केल्या आहेत असे अधिकार्‍यांनी सांगितले.मुंबईत बेस्ट च्या बसेस निवडणूक कामासाठी वापरण्यात आल्या
. मात्र त्यांची निश्चित आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. दोन वेगवेगळ्या आगाराच्या अधिकार्‍यांनी ५५० आणि हजार बसेस असे वेगवेगळे आकडे सांगितले. मात्र बेस्टच्या जनसंपर्क विभागातर्फे कोणीहि या अकड्याना दुजोरा दिला नाही. मात्र निवडणूक कामासाठी मोठया संख्येने बेस्ट बसेस उपलब्ध करून दिल्याने रोजच्या प्रवासी फेर्‍यांवर त्याचा परिणाम झाला आहे असे बेस्ट प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.