स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू पृथ्वीराज सावरकर यांचे निधन

    दिनांक  21-Oct-2019 20:30:43
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे ज्येष्ठ सदस्य आणि स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच वीराग्रणी नारायणराव सावरकर यांचे नातू पृथ्वीराज विक्रमराव सावरकर यांचे कोथरूड, पुणे येथे निधन झाले. ते साठ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई स्वामिनी, भाऊ रणजीत तसेच पत्नी, मुलगी असा परिवार आहे. गेले काही महिने कर्करोगाने आजारी होते.

 

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीचे महाराष्ट्र मिलिटरी स्कूल या दोन्ही संस्थांमधून त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार विविध प्रकल्प तसेच योजना कार्यान्वित करण्यासाठी सातत्याने सहभाग दिला. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीत तसेच जडणघडणीत त्यांचे मार्गदर्शन नेहमीच मोलाचे ठरले. स्मारकाचे कार्य अधिकाधिक लोकाभिमुख करण्याकडे त्यांचे भर होता आणि त्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत स्वातंत्र्यवीरांचे विचार पोहचावेत, ही त्यांची अखेरपर्यंत तळमळ होती. स्मारकाच्या अनेक कार्यामागे त्यांची प्रेरणा मिळत होते.

 

महाराष्ट्र मिलिटरी स्कूल या सैनिकी शाळेच्या उभारणीत मोलाचा वाटा होता. अनेक व्यवसायात अपयश आले पण खचून न जाता पुण्यात हर्षद खाद्यपदार्थ हा व्यवसाय खूप जोरात सुरू केला. त्या अनुभवातून अनेकांचे व्यवसाय उभे करून दिले, अनेकांना मोलाचे मार्गदर्शन केले. विक्रमराव सावरकर यांच्या हिंदुसंघटन तसेच राष्ट्रहिताच्या कृतीशील कार्यातदेखील त्यांचा सहभाग राहिला आहे. अदंमान विमानतळाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा त्यांच्या उपस्थितीत स्मारकाच्या वतीने प्रदान करण्यात त्यांचा सहभाग होता.

 

स्मारकाचे कार्य अधिकाधिक व्यापक करण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. त्यानुसार विविध संकल्पनादेखील मांडल्या. त्यांच्या निधनाने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने एक कृतीशील कार्यकर्ता, मार्गदर्शक तसेच आधारस्तंभ गमावला आहे, अशी प्रतिक्रिया स्मारकाच्या वतीने अध्यक्ष अरुण जोशी यांनी व्यक्त केली आहे. पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीत त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी देशप्रेमी नागरिक तसेच सावरकरांचे अनुयायी, मित्रपरिवार व नातलग मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.