विधानसभेची रणधुमाळी : राज्यात मतदानाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    दिनांक  21-Oct-2019 10:22:57नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत सर्व बजावत आहेत मतदानाचा हक्क

 

मुंबई : मुंबई, पुणेसह राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी सोमवारी मतदान होत आहे. तसेच, सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानालाही सुरुवात झाली आहे. राज्यात सर्वच पक्षांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज या सर्वांचे राजकीय भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. सकाळपासून चालू झालेल्या मतदानाला अनेक नेते, अभिनेत्यांनी मतदान करून आपला हक्क बजावला.

 

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी १ लाख ७९ हजार ८९५ मतदान यंत्र आणि १ लाख २६ हजार ५०५ नियंत्रण युनिट पुरविले आहेत. तसेच, सुमारे १ लाख ३५ हजार २१ व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली आहेत. तर सहा लाखांहून अधिक कर्मचारी आणि तीन लाख पोलीस मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी तैनात करण्यात आलेले आहेत.

 

अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. सध्या मुंबईसह इतर ठिकाणी पावसाने उघडीक घेतल्यामुळे नागरिक मतदानासाठी पुढे सरसावले आहेत. तसेच, नक्षलग्रस्त गडचिरोलीत मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेसाठी विशेष हेलिकॉप्टरची व्यवस्था देखील करण्यात आले आहे. याठिकाणी दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान चालणार आहे.