मतदान केले नाही तर हा फोटो नक्की पाहा !

    दिनांक  21-Oct-2019 16:41:01



नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, मतदारांना घराबाहेर पडून मतदान करण्यासाठी महाराष्ट्र निवडणूक आयोग, कलाकार, नेते मंडळी आणि विविध सामाजिक संस्थांनी घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. नाशिकमध्ये एका दिव्यांग शेतकऱ्याने मतदान केल्याचा फोटो आता व्हायरल झाला आहे. दोन्ही हात नसल्याने मतदान अधिकाऱ्यांनी त्यांच्या पायाला शाई लावली आहे. दरम्यान आता तरी मतदानाला बाहेर पडा, असे आवाहन या फोटोद्वारे अनेकांनी केले आहे.

 

आज सकाळी २८८ विधानसभा मतदारसंघातून मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडत असल्यामुळे मतदानात थोडासा खोळंबा निर्माण झाला होता. मात्र मतदारांनी आत्तापर्यंत चांगल्या संख्येने महाराष्ट्रात उभारण्यात आलेल्या ९६ हजार ६६१ मतदान केंद्रांवर हजेरी लावली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ३०.८९ टक्के एवढे मतदान झाले.

 

यामध्ये आरमोरी जिल्ह्यात सर्वात जास्त मतदानाची संख्या नोंदवण्यात आली असून तेथे ५२.८९ टक्के मतदान झाले तर सर्वात कमी मतदान उल्हासनगर येथे झाले असून तेथे १५.७० टक्के मतदान झाले आहे. आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत या आकड्यांमुळे अधिक स्पष्टता आणण्यास मदत होईल. दरम्यान हरियाणा राज्यात देखील मतदान झाले असून २८८ विधानसभा मतदारसंघातून ९० जागांसाठी तेथे आज मतदान घेण्यात आले. हरियाणा मध्ये देखील सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.