नजरेपेक्षाही ध्येयदृष्टी आवश्यक

    दिनांक  21-Oct-2019 21:39:20   
जन्मजात दिव्यांगत्वावर मात करत आयुष्यात भव्यदिव्य कारकिर्द घडवणारे प्रा
. संजय जैन आज केवळ दिव्यांगांचीच नव्हे, तर सर्वच समाजाची प्रेरणा आहेत.


प्रा
. संजय जैन हे पुण्याच्या आयएलएस विधी महाविद्यालयाच्या कायदा विभागाचे असोसिएट प्रोफेसर, पीएच.डी रिसर्च सेंटरचे डायरेक्टर, ‘सेंटर फॉर पब्लिक लॉ’ आणि ‘सेंटर फॉर इक्वल अपॉर्च्युनिटी’चे ते प्रवर्तक. जगभर कायद्याविषयक परिसंवादांमध्ये त्यांना आग्रहाचे निमंत्रण असते. कायदेविषयक असंख्य पुस्तके लिहिणारे आणि शैक्षणिक, सामाजिक कार्याबद्दल असंख्य पुरस्कार मिळवणारे प्रा. संजय जैन. नागपूर विद्यापीठातून एलएलएममध्ये तृतीय येणार्‍या आणि कायदा या विषयात पीएच.डी करणार्‍या संजय यांचे आयुष्य चारचौघांसारखे मुळीच नाही. संजय हे जन्मजात दृष्टिहीन दिव्यांग.संजयचे मूळ गाव बुलढाण्याचे अंजन गाव सुरजी
. कामानिमित्त त्यांचे कुटुंब नागपूरला स्थायिक झाले आणि नागपूरकर झाले. त्यांचे पिता श्रीकांत हे वास्तुविशारद, तर आई श्रद्धा या त्याकाळच्या कला शाखेतल्या पदवीधर. संजय आणि त्यांच्या पाठी जन्मलेली मुलगीही अंध म्हणून जन्माला आली. जैन दाम्पत्याने मुलांना उच्च शिक्षण द्यायचे, स्वावलंबी करायचे आणि इतर साधारण मुलांसारखेच सक्षम जगायला शिकवायचे ठरवले. श्रद्धा यांनी मुलांना सर्वसाधारण मुलांच्या शाळेत टाकले. त्यावेळी समाजातल्या काही लोकांनी संजय यांच्या आईंनाच जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न केला. इतके की, दोन अंध मुलांना जन्म देणारी बाई अशुभच म्हणून त्यांना धार्मिक कार्यक्रमात न बोलावणे, कुठेही सहभागी करून न घेणे. पण, या परिस्थितीतही त्या खचल्या नाहीत. त्या कायम मुलांना हिंमत देत होत्या की, ‘तुम्ही मनात आणले तर काहीही करू शकाल.’पुढे संजय दिव्यांगांच्या शिक्षणाची चांगली सोय असलेल्या देहरादूनच्या वसतिगृहामध्ये गेले
. वसतिगृहामध्ये सगळ्या उत्तम सुविधा होत्या. मात्र, शिक्षणाचे माध्यम इंग्रजी. आजपयर्र्ंत मराठी माध्यमातून शिकलेल्या संजयना हे शिकणे अवघड जाऊ लागले. इतके की, जवळ जवळ दोन वर्षे ते ‘प्रमोट’ होऊनच वरच्या इयत्तेत गेले. सातवीला मात्र गणितामध्ये 13 आणि इंग्रजीमध्ये शून्य गुण मिळाले. देहरादूनच्या शाळेने संजयच्या घरी पत्र पाठवले की, “मुलाच्या भविष्याच्या दृष्टीने आम्ही त्याची परत परीक्षा घेऊ. त्यात तो उत्तीर्ण झाला, तरच त्याला पुढच्या वर्गात प्रवेश देऊ.” संजय उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी नागपूरला आले. वडिलांना मिळालेल्या पत्राने संजय यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. पत्र वाचल्यावर संजय यांचे वडील त्यांना केवळ इतकेच म्हणाले, “संजय, तू लक्ष देऊन अभ्यास कर.मला खात्री आहे की
, तू नक्की यशस्वी होशील.” वडिलांच्या या एका वाक्याने संजय यांना हुरूप आला. यावेळी त्यांच्या मदतीला आले नागपूरमधील रा. स्व. संघाचे ठोमरे गुरूजी. ठोमरे गुरूजींनी सेवाव्रत नव्हे, एक लक्ष्यच समजून 15 दिवसांमध्ये संजय यांची तयारी करून घेतली. संजयनी पुन्हा परीक्षा दिली. त्यामध्ये गणित आणि इंग्रजीमध्ये त्यांना प्रथम श्रेणी मिळाली. त्यानंतर मात्र संजय यांनी मागे वळून पाहिले नाही. दहावीलाही ते विदर्भातून गुणवत्ता यादीत पाचवे आले. पुढे मॉरास महाविद्यालयामध्ये शिक्षण सुरू केले. त्यावेळीही भिडे, ठोंबरे, सहस्रबद्धे, वाजपेयी, पितळे काकू ही सर्व रा. स्व. संघाशी संबंधित मंडळी संजय यांच्या घरी येत. संजयना नित्यनियमाने पाठ्यपुस्तकातले पाठ अर्थासहित वाचून दाखवत. त्यापैकी वाजपेयी हे तर सकाळी 5.55 वाजता संजय यांच्या दाराची कडी वाजवत. त्यांनी संजयला सांगून ठेवलेले की, “वेळेला किंमत आहे. 5.55 ला मी दाराची कडी वाजवीन. 6 पर्यंत अभ्यासाला सुरुवात करायची.” अकरावी ते एलएलएम शिकेपर्यंत हे सगळे जण आपुलकीने आणि संजय आयुष्यात यशस्वी व्हावे या ध्येयाने त्यांना पाठ्यपुस्तक वाचून दाखवायला येत. या सगळ्याचा परिणाम असा झाला की, बारावी, एलएलबी अगदी एलएलएमपर्यंत संजय विद्यापीठाच्या कायदा विभागातून गुणवत्ता यादीमध्ये उत्तीर्ण झाले. या काळात नागपूर विद्यापीठाच्या कायदा विभागाचे प्रमुख शिरीष देशपांडे यांनी त्यांना खूप धीर दिला. शिरीष जन्मत: अंध नव्हते.वयाच्या सोळाव्या वर्षी अपघाताने त्यांना अंधत्व आलेले
. तरीही त्यांनी पीएच.डी केलेली आणि विद्यापीठात उच्च पदावर विराजमान झालेले. त्यांच्या प्रेरणेनेच एलएलएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर संजय यांनी ‘नेट’ परीक्षा दिली आणि ते उत्तीर्णही झाले. शैक्षणिक यश मिळत होते. पण, मनात तरीही निराशा दाटून येई. कारण, कोणत्याही बाबतीत सक्षम असतानाही अनेक वेळा संजयना दिव्यांग असल्यामुळे नकोशा दयेचे, हेतुपुरस्सर नाकारलेपणाचे धनी व्हावे लागे. याच काळात त्यांनी ‘एक होता कार्व्हर’ पुस्तक वाचले. कार्व्हरलाही निग्रो म्हणून अपमान, नकारात्मक जगणे भाग पाडण्यास सांगितले गेले. त्याने काय करावे, हे त्याच्यावर लादण्याचा प्रयत्न केला गेला. तरीही कार्व्हरने सगळ्यांवर मात केली आणि तो कार्याने अजरामर झाला. कार्व्हरची प्रेरणा संजय यांच्या आयुष्यात मोलाची ठरली. त्यानंतर संजय यांनी कोणत्याही नकारात्मक गोष्टींना सकारात्मक गोष्टींची सुरुवात म्हणूनच पाहायचे ठरवले. औरंगाबाद, पुणे येथे अध्यापक म्हणून काम केल्यानंतर त्यांना आयएलएस महाविद्यालयात काम करण्याची संधी मिळाली. येथे प्राचार्या वैजयंती जोशी, त्यांचे सहकारी आणि मुख्यत: विद्यार्थ्यांच्या स्नेहसोबतीमुळे संजय यांच्या कर्तृत्वाला अनेक संधी मिळत गेल्या. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर दिव्यांगांच्या बदलत्या हक्कांबद्दल, कायद्याबद्दल संजय आवाज उठवत आहेत. भारतीय संविधानाचे मौलिकत्व जगभर मांडत आहेत. सर्वच नकारात्मक गोष्टींचा सामना करत आयुष्यात यशश्री खेचत आणणार्‍या संजय यांच्या सौभाग्यवती योगिता यांचाही उल्लेख करायला हवा. योगिता यांचेही शिक्षण एलएलएमपर्यंतचे. समाजमानानुसार दिव्यांग व्यक्तींशी दिव्यांगच विवाह करतात. पण, योगिता संजय या सिद्धांताचा अपवाद. त्यांची जोडी समाजात आणि परिसरातही आदर्शच. संजय आपल्या आयुष्याबद्दल म्हणतात की, “डोळे असणे चांगलेच, पण नजरेपेक्षा ध्येयदृष्टी हवी, तरच कोणताही माणूस आयुष्यात स्वत:चा आणि समाजाचाही उत्कर्ष साधू शकतो.” प्रा. संजय हे दिव्यांगासाठीच नाही तर सगळ्यांसमोरच एक आदर्श प्रस्थापित करत आहेत.