पुन्हा मोदी : एक राग

    दिनांक  20-Oct-2019 21:32:39   चांद्रयान-बिंद्रयान, ३७० कलमामुळे पण लोक मोदींवर खुश आहेत, असे ऐकले. ऐकले यासाठी की, गेले काही दिवस मी बाहेर होतो. आता आलो तर कळले की, मी तिकडे मनःशांतीसाठी की काय म्हणतात, त्यासाठी बाहेरगावी गेलो असता (माझ्या मनःशांतीच्या कल्पना वेगळ्या आहेत) इथे लोक पुन्हा ‘मोदी मोदी’ करत आहेत. लोकांना या मोदीकाकांनी वेड लावले आहे, लोक त्यांना का लाईक करत असतील बरे? याचे उत्तर कोण देईल? चिदंबूकाका नको त्या ठिकाणी आहेत. त्यांना विचारावे तरी कसे? बाकी सिंगअंकल तर मौनीबाबाच आहेत. ते उत्तर देणार नाहीत. ममाराजे म्हणजे आमच्या आईसाहेबांना आणि आमच्या राजदरबारातील पात्र-महापात्रांना हा प्रश्न विचारावा का? नक्कोच... असो, तर मी काय म्हणतो, चंद्रावर गेल्याने देशातील युवकांच्या पोटात अन्न जाणार आहे का? काय करायचे ते टप्प्याटप्प्याने करावं. भारतामध्ये अजूनही थोडी जमीन शिल्लक आहे. तिच्यावर अजून आमचे म्हणजे, आमच्या ताईबाईचे आणि तिच्या यजमानांचे हक्क सांगणे बाकी आहे. इथे भारतात झाले थोडे आणि तिथे चंद्रावर जायचा अट्टाहास.. छे, छे! कल्पनाच करवत नाही. आम्ही सत्तेत नाही आणि आमच्याशिवाय या देशाचे लोक चांद्रयान पाठविण्यात यशस्वी होतात. हा अपमान आहे. कुणाचा म्हणजे आमचा. तर आठवा ते दिवस, माझ्या आज्जीने काय केले होते? आता आज्जीचे नाव काढल्यावर, ‘आणीबाणी लादली,’ असे नकारात्मक नका बोलू, तर आज्जीच्या काळातच राकेश शर्मा चंद्रावर गेले होते. त्यानंतर काय झाले? चंद्रावर भारतीयाने पाऊल ठेवले म्हणून चंद्रावर लोक आलूची शेती करायला गेले का? लोक गरीबच राहिले, लोकांना अन्न मिळाले का? नाही ना? अहो, घरचा अनुभव आहे. याचि देही, याचि डोळा पाहिले आहे. त्यामुळे काल सभेमध्ये मी अनुभव सांगितला की, चंद्रावर गेल्याने देशातील युवकांच्या पोटात अन्न जाणार आहे का? देखो भैया, गरिबी, भूक आणि अन्न अन्न करत बकासुरासारखे देशाला ७० वर्षे लुटले तरी ना गरिबी गेली, ना भूक मिटली. कोणाची काय विचारता, आमची नव्हे अर्थात लोकांची. पण लोकांना कळतच नाही. काय म्हणता, म्हणूनच लोक पुन्हा मोदी मोदी करणार?

 

भूक भूक...

 

स्वप्न नेहमी मोठी पाहावीत. त्या स्वप्नांसाठी जागेपणी प्रयत्न करावेत. असा आदर्श देणारे आणि त्यानुसार आदर्शवत जीवन जगणारे अनेक रथी-महारथी या देशात जन्मले. त्यापैकी कित्येक जणांची स्वप्ने त्यांच्या मृत्यूपश्चात वास्तवात आली. स्वातंत्र्याचे स्वप्न पाहणारे वीर त्यापैकीच एक. त्यावेळीही असे म्हणणारे असतीलच की, अरे, स्वातंत्र्यासाठी आंदोलन करतोस, मोर्चे करतोस, सत्याग्रह करतोस, काळ्या पाण्याची शिक्षा भोगतोस, फासावर जातोस. याने काय देशातल्या युवकांच्या पोटात अन्न जाणार आहे? स्वातंत्र्य मिळाले का? मिळाले तरी त्यामुळे युवकांना अन्न मिळेल का? अर्थात काही महाभाग असेही असतील, जे असे म्हणाले असतील. त्यांच्या लेखी भाकरी मिळाली की, संपले जीवन. पोटार्थी किडे-मुंगीही केवळ भाकरीभुकेसाठी जगत नाही. प्रत्येकाला एक उद्देश, ध्येय असते. पोटाची भूक त्या स्वप्नांना अडवू शकत नाही. मात्र, जन्मजात सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मणारे जेव्हा या भाकरीच्या तुलनेत मानवी मूल्यांना समृद्ध करणार्‍या गोष्टींना तुच्छ लेखतात, तेव्हा त्यांचे ढोंग तत्काळ उघड होते. जसे राहुल गांधी यांचे ढोंग उघड होते. चंद्रावर गेलात तर युवकांच्या पोटात अन्न जाणार आहे का? असा फालतू प्रश्न विचारताना राहुल गांधी यांना देशाचा विकास, अस्मिता, नव्या संधी, विश्वाचे सध्याचे वर्तमान विज्ञान, अवकाश याबाबत काही काही प्रश्न पडले नाहीत. प्रत्येकाला आपल्या पोटाची चिंता असते. ते पोट कसे भरावे यासाठीच तर सगळे जग धावते, हे सत्य असले तरी त्या जगावर अस्मितादर्शक छाप उमटविण्यासाठी पोटापलीकडे जावेच लागते. माणूस जेव्हा पोटार्थी राहत नाही, तेव्हाच तो मानवार्थी बनू शकतो. मात्र, राहुल गांधींना युवकांना केवळ भूक भाकरीमध्ये गुंडाळून ठेवायचे आहे, असे दिसते. जग खूप मोठे आहे, त्याहूनही माणसाची आंतरिक आत्मशक्ती मोठी आहे. त्याने ठरवले तर काय होणार नाही? त्यामुळेच अन्न, गरिबी आणि भूक यांचा बाजार मांडण्यापेक्षा तरुणांना त्यातून बाहेर पडण्याची ऊर्जा द्यायला हवी, आम्ही शक्तिमान आहोत, ही प्रेरणा द्यायला हवी. नरेंद्र मोदी यांनी ३७० कलम हटवून आणि चांद्रयान यशस्वी करून ती प्रेरणा भारतीय युवकांना दिली आहे. भुकेपेक्षा भुकेवर मात करणारी प्रेरणा केव्हाही श्रेष्ठच आहे. बाकी काय भूक भूक करणारे आहेतच!