टेनिस विश्वातील भारतीय मोहरा

    दिनांक  02-Oct-2019 15:27:20


अवघ्या २२व्या वर्षी अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावत भारताचे नाव सातासमुद्रापार उंचावणार्‍या टेनिसपटू सुमित नागलच्या जीवनप्रवासाची ही यशोगाथा...

 

जगभरातील लोकप्रिय खेळांपैकी एक म्हणजे ‘टेनिस’. भारतात या खेळाला क्रिकेटइतकी पसंती नसली तरी परदेशातील अनेक देशांमध्ये या खेळाला नागरिकांची मोठी पसंती असून या खेळातील खेळाडू जगप्रसिद्ध आहेत. भारतात हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जात नसला तरी काही भारतीय खेळाडूंनी मात्र टेनिसमध्येही उल्लेखनीय कामगिरी करत जगभरातील प्रसिद्ध टेनिसपटूंच्या यादीत आपले नाव कोरण्यात यश मिळवले आहे. दिल्लीस्थित २२ वर्षीय सुमित नागल हा टेनिसपटू त्यापैकीच एक म्हटले तर वावगे ठरणार नाही.

 

भारताच्या सुमित नागलने अर्जेंटिनायेथे नुकत्याच पार पडलेल्या ‘एटीपी चॅलेंजर टेनिस’ स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. अवघ्या २२व्या वर्षी सुमितने केलेली ही कामगिरी उल्लेखनीय असल्याचे मत टेनिस विश्वातील जाणकारांचे आहे. त्याच्या कारकिर्दीतील हे दुसरे विजेतेपद असून त्याच्या या यशाबद्दल टेनिस विश्वात त्याच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

टेनिस जगतात आजघडीला सुमित नागलवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असला तरी त्याच्या संघर्षाची कहाणीही तितकीच रंजक. टेनिस हा महागड्या खेळांपैकीच एक. या खेळासाठी लागणारे सर्व साहित्य विकत घेणे हे सर्वांच्याच खिशाला परवडणारे नसते. त्यामुळे श्रीमंतांच्याच चोचल्यांपैकी एक म्हणून टेनिसकडे पाहिले जाते. म्हणूनच अगदी सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती या खेळात पाहायला मिळणे दुर्मीळच. मात्र, सुमित नागलने या सगळ्यावर मात करत आपली आवड जोपासली आणि देशाचेही नाव उंचावले.

 

सुमितचा जन्म १६ ऑगस्ट, १९९७ साली हरियाणातील झज्जर या गावी झाला. सुमितचे वडील सुरेश नागल हे काही वर्षे भारतीय लष्करी सेवेत होते. लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी दिल्लीतील शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली. सुमितचे प्राथमिक शिक्षण त्याच्या मूळ गावी झज्जर येथेच झाले. मात्र, वडिलांच्या नोकरीमुळे नागल कुटुंबीयांनी दिल्लीमध्ये स्थलांतर केले. जवळपास आठ ते नऊ वर्षांचा असताना सुरेश यांनी सुमितला मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी यासाठी त्याला दिल्लीतील अनेक स्टेडियममध्ये नेले. क्रिकेट, हॉकी, फुटबॉल अशा विविध खेळांबाबत त्याला माहिती दिली. या खेळांमध्ये मात्र सुमितचे मन रमले नाही.

 

मात्र, टेनिस या खेळाबाबत माहिती देताच हा खेळ मात्र त्याच्या पसंतीस उतरला आणि घरी येताना टेनिसचे एक छोटेखानी रॅकेट त्याने वडिलांना खरेदी करण्यास भाग पाडले. लहानपणी हट्टापायी वडिलांनी त्याला रॅकेट घेऊन दिले. मात्र, त्याला टेनिस खेळवायचे कसे, हाच प्रश्न त्यांच्यासमोर होता. टेनिसच्या क्लबचे शुल्क ही नागल कुटुंबीयांच्या आवाक्याबाहेरचे. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी स्वतःच सुमितला टेनिसचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणादरम्यान सुमितला टेनिसच्या विशेष कौशल्यांची हळूहळू जाणीव झाली. त्यामुळे याबाबत टेनिस प्रशिक्षकांशी चर्चा करत त्यांनी टेनिस क्लबमध्ये त्याला पाठविण्याचा निर्णय घेतला. क्लबचे शुल्क परवडणारे नव्हते. मात्र, त्याच्या वडिलांनी नोकरीव्यतिरिक्त शिकवणी घेण्यास सुरुवात केली आणि सुमितला टेनिस क्लबमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवले.

 

वडील आपल्यासाठी करत असलेल्या कष्टांची जाण ठेवत सुमितनेही मन लावून टेनिसचे प्रशिक्षण घेतले आणि तो जिद्दीने खेळूलागला. जवळपास १६ वर्षांचा असताना सुमितच्या टेनिसमधील कौशल्याची दखल भारताचा माजी क्रिकेटपटू महेश भूपती याने घेतले. भूपतीने सुमितला प्रशिक्षण देऊन त्याला घडविण्याचा निश्चय केला. यासाठी योग्य प्रशिक्षणही दिले. भूपतीच्या सहकार्याने सुमितने बंगळुरू, कॅनडा, अमेरिका, जर्मनी, स्पेन आणि पुन्हा जर्मनी अशा विविध ठिकाणी उच्च दर्जाच्या टेनिसचे धडे गिरवले.

 

२०१५ साली आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची त्याला संधी मिळाली. यावेळी विम्बलडन टेनिस स्पर्धेतीलमुलांच्या गटातील दुहेरीचे विजेतेपद पटकावत त्याने सर्व भारतीयांच्या मनात घर केले. मात्र, २०१७ साली त्याला भारतातील डेव्हिस कप संघातून काही कारणात्सव डच्चू देण्यात आले. परंतु, निराश न होता सुमितने खेळावर लक्ष केंद्रित केले. टेनिस विश्वातील सर्वात मोठा खेळाडू म्हणून प्रसिद्ध असलेल्या फेडररच्या समोरही त्याने उत्तम खेळ केला. फेडररविरोधात त्याला जिंकता आले नाही. परंतु, उत्तम झुंज देत त्याने सर्वांची मने जिंकली. ‘सुमितचे भविष्य उज्ज्वल आहे,’ अशी शाबासकी खुद्द फेडररने सामन्यानंतर दिली. २२ वर्षीय सुमित आगामी काळात आणखी काही नेत्रदीपक विजय नोंदवेल, अशी अपेक्षा तमाम भारतीयांना असून पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा...!

 

- रामचंद्र नाईक