‘देवकारण’ ते ‘राजकारण’

    दिनांक  02-Oct-2019 19:15:01
समर्थवाङ्मयाचे अभ्यासक समर्थांचा राजकारणाशी संबंध नव्हता
, हे प्रथम गृहित धरतात व त्यानुसार पुरावे शोधण्याचा प्रयत्न करतात. प्रा. फाटक हे त्यापैकी एक नसले तरी समर्थांचा राजकारणाशी संबंध होता, हे मानायला ते तयार नाहीत. प्रा. फाटकांचा दासबोधाचा चांगला अभ्यास आहे. त्यांनी दासबोधातील ‘देवकारण’ व ‘राजकारण’ या दोन शब्दांचा उल्लेख केला आहे. समर्थवाङ्मय अभ्यासकांच्या मते
, दासबोधात ‘राजकारण’ हा शब्द २७ वेळा आला आहे. ‘राजकारण निरुपण’ या नावाचे ११.५ व १९.९ हे दोन समास दासबोधात आल्याचे आपण मागील एका लेखात पाहिले आहे. तसेच दासबोधाव्यतिरिक्त समर्थांच्या स्फूट कवितांतूनही ‘राजकारण’ हा शब्द १०-११ ठिकाणी आलेला आहे. तथापि समर्थांचा प्रत्यक्ष राजकारणाशी काही संबंध नव्हता, हे पटवून देण्यासाठी काही अभ्यासकांनी बौद्धिक युक्तिवाद केल्याचे आढळून येते. तर्कशास्त्राच्या एका पद्धतीत एखादे विधान खरे आहे, असे गृहित धरतात. त्यानंतर ते गृहिततत्त्व इतर विधानांना लावून त्यातील सत्यासत्यता पडताळून पाहतात किंवा भूमितीशास्त्रात एखादे प्रमेयाचे गृहितक सत्य मानून शेवटच्या उत्तरावरून गृहितक सत्य की असत्य हे ठरवता येते. त्याप्रमाणे समर्थवाङ्मयाचे अभ्यासक समर्थांचा राजकारणाशी संबंध नव्हता, हे प्रथम गृहित धरतात व त्यानुसार पुरावे शोधण्याचा प्रयत्न करतात. प्रा. फाटक हे त्यापैकी एक नसले तरी समर्थांचा राजकारणाशी संबंध होता, हे मानायला ते तयार नाहीत. प्रा. फाटकांचा दासबोधाचा चांगला अभ्यास आहे. त्यांनी दासबोधातील ‘देवकारण’ व ‘राजकारण’ या दोन शब्दांचा उल्लेख केला आहे. समर्थांनी ‘राजकारण’ या शब्दासारखाच ‘देवकारण’ हा शब्द वापरला आहे. त्याचा प्रथम उल्लेख दासबोधातील दशक २ समास ५ मध्ये आला आहे.देवकारणी लाजाळू ।

उदरालागी कष्टाळू ।

प्रपंची जो स्नेहाळू । तो रजोगुण ॥ (२.५.३०)

देवाचे कार्य करायला लाज वाटते, पण पोटासाठी खूप कष्ट करतो आणि प्रापंचिक मायेत गुंतून पडतो तो रजोगुण समजावा, असे वरील ओवीत सांगितले आहे. प्रा. फाटक ‘देवकारण’ व ‘राजकारण’ यात खूप अंतर आहे, असे म्हणतात. ‘देवकारण’ हे समर्थांचे ध्येय होते, यात वाद नाही. दासबोधातील दशक २ समास ९ या ‘विरक्तलक्षण’ समासात ‘सद्क्रिया प्रतिष्ठावी,’ ‘लावावे भजनी,’ ‘अध्यात्म वाढवावे,’ ‘परमार्थ उजळावा,’ ‘हरिकीर्तने करावी,’ ‘सगुण भजन करावे’ अशी अनेक उत्तम लक्षणे सांगितली आहेत. या स्वरूपाचे ‘देवकारण’ हे समर्थांचे ध्येय होते. पण, समर्थांनी राजकारण केले, हे मानायला प्रा. फाटक तयार नाहीत. त्यांच्या मते, ‘राजकारण’ हा शब्द राज्यविषयक उलाढाली सुचवणारा आहे. त्यामुळे समर्थांच्या दासबोधात आलेला ‘राजकारण’ हा शब्द ‘चातुर्य’ या अर्थाने घ्यायला हवा, असे प्रा. फाटकांचे मत आहे. याचा अर्थ दासबोधात आलेला ‘राजकारण’ शब्द खर्‍या राजकीय अर्थाने आला नसून तो लाक्षणिक अर्थाने आलेला आहे आणि त्याचा अर्थ ‘चातुर्य’ असा घ्यावा, हे प्रा. फाटकांचे मत शंकरराव देव, ल. रा. पांगारकर, शं. दा. पेंडसे आदी अनेक समर्थवाङ्मय अभ्यासकांना मान्य नाही. दासबोधातील ‘राजकारण’ या शब्दाचा अर्थ ‘राजकारण’ असाच घ्यायला हवा, असे देव आदी प्रभृतींचे मत आहे. तसे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन दाखवून दिले आहे. दासबोधात ज्या २७ ठिकाणी ‘राजकारण’ शब्द समर्थांनी योजला आहे, तेथे त्याचा अर्थ ‘चातुर्य’ असा न घेता ‘राजकारण’ या अर्थीच वापरला आहे. अर्थासाठी तेथे ‘चातुर्य’ या शब्दाची आवश्यकता भासत नाही. समर्थांना ‘राजकारण’ म्हणजे नेमके काय अपेक्षित होते, याची उकल प्रा. के. वि. बेलसरे यांनी पुढीलप्रमाणे केली आहे. ते म्हणतात, ‘समाजातील भिन्न प्रकृतीची भिन्न पातळीवरची आणि भिन्न आवाक्याची माणसे एकत्र गोळा करून प्रत्येकाकडून काहीतरी कार्य करून घेण्याच्या कलेला समर्थ ‘राजकारण’ असे नाव देतात.’ समर्थांनी ‘सावधानता’ नावाचे एक प्रकरण लिहिले आहे. त्यातील ओव्या ‘राजकारणा’च्या उपदेशाच्या आहेत हे स्पष्टपणे जाणवते.
पाहिलेचि पाहावे । केलेचि करावे ।

शोधलेचि शोधावे । राजकारण ॥

इशारतीचे बोलो नये ।

बोलायचे लिहो नये ।

लिहायचे सांगो नये । जबाबीने ॥

येथे ‘शुद्ध राजकारणा’साठीच उपदेश आहे. तत्कालीन राजकारणात गुप्तता बाळगण्याची किती आवश्यकता होती, हे सांगणारा राजकीय उपदेश आहे. दासबोधातही अशा स्वरुपाच्या ओव्या दाखवता येतात.


ही धूर्तपणाची कामे । राजकारण करावे नेमे ।

ढिलेपणाच्या संभ्रवे ।

जाऊ नये ॥ (१९.९.२७)

तेव्हा समर्थांना राजकारण माहीत नव्हते. त्यांना फक्त ‘देवकारण’ व ‘धर्मकारण’ करायचे होते, हे म्हणणे योग्य होणार नाही. असे असले तरी प्रा. फाटक हे समर्थांनी वापरलेल्या ‘राजकारण’ शब्दाचा अर्थ ‘चातुर्य’ असा करतात आणि त्यांचीच री पुढे अनेक अभ्यासकांनी ओढली आहे. समर्थांचे विचार केवळ आध्यात्मिक अथवा धार्मिक स्वरूपाचेच होते, हा विचार मनात घट्ट धरून त्यासाठी समर्थवाङ्मयात काही सापडते का, ते शोधायचे किंवा समर्थांनी राजकारणात भाग घेतला होता, यासंबंधी पुरावे समर्थचरित्रात सापडत नाहीत असे म्हणायचे, ही आजकाल समर्थांविषयी संशोधनाची दिशा झाली आहे. पण, असे केल्याने समर्थांचे खरे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राला समजणार नाही. धर्म, अध्यात्म, हिंदूसंस्कृती हे तर सांभाळले पाहिजेत. पण, परकीय जुलमी राजसत्तेत वावरताना त्यासाठी राजकारणाला महत्त्व दिले पाहिजे, हे समर्थांना पटले होते. म्हणून समर्थ हरिकथा निरूपणानंतर लगेच ‘राजकारणा’चा उल्लेख करतात. समर्थांनी क्षत्रियांना केलेले आवाहन यादृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यातील काही ओव्या पुढे दिल्या आहेत. त्या वाचल्यावर समर्थांना खरे ‘राजकारण’ अपेक्षित होते हे समजेल. तेथे प्रा. फाटक म्हणतात तसा ‘चातुर्य’ हा अर्थ लावता येत नाही.

जयास जीवाचे वाटे भय ।

त्याने क्षात्रधर्म करू नये ।

काहीतरी करून उपाय । पोट भरावे॥

... ऐसे अवघे उठता ।

परदळाची कोण चिंता ।

हरणे लोळती चित्ता । देखत जैसा ॥

... दोन्ही दळे एकवटे ।

मिसळताती लखलखाटे ।

युद्ध करावे खणखणाटे ।

सीमा सांडूनी॥अशा या समर्थवाङ्मयात राजकारण नव्हते, तर दुसरे काय होते? याच ‘क्षात्रधर्म’ कवितेत समर्थांची एक प्रसिद्ध ओवी आली आहे, ती अशी आहे.

मराठ तितुका मेळवावा ।

आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा ।ये विषयी करिता तकवा ।

पूर्वज हासती ॥

परकीय सत्तेविरुद्ध तयार झालेला मराठा वर्ग एकत्र आणून आपला महाराष्ट्रधर्म हिंदुस्थानभर नेण्याची मनिषा समर्थांच्या ठिकाणी होती व त्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले, हे सर्वविदित आहे. हिंदूसंस्कृती, देवधर्म रक्षणासाठी ‘राजकारण’ करणे आवश्यक असतानाही काही लोक भीतीपोटी, स्वार्थापोटी म्लेंच्छाच्या जातीत गेले. त्यांना पाहून समर्थ म्हणाले, ‘एक जाती दोन जाती पावला । तो कैसा म्हणावा भला ॥’ असे सांगून जे देवद्रोही, धर्मद्रोही आहेत, त्यांना समर्थांनी ‘व्यर्थ भुंकणारे कुत्रे’ म्हटले आहे. परधर्मात जाऊन ते स्वकियांवर भुंकत आहेत. अशा या देवद्रोहींना कशाला जीवंत ठेवायचे? त्यांना मारावे हे बरे. कारण, अखेरीस देवाचे दास आहेत त्यांचाच विजय होणार आहे.देवद्रोही तितुके कुत्ते ।

मारुनी घालावे परते ।

देवदास पावती फत्ते ।

यदर्थी संशय नाही ॥

असे ठामपणे सांगून समर्थांनी हिंदूंवर होणारे सांस्कृतिक आक्रमण रोखले होते. श्री. म. माटे यांनी त्यांच्या ‘श्री रामदासस्वामींचे प्रपंचविज्ञान’ या ग्रंथात समर्थांवरील आक्षेपकांचा चांगला समाचार घेतला आहे. उपरर्निर्दिष्ट ओव्या वाचकांसमोर सविस्तर मांडून श्री. म. माटे म्हणतात, “... हे सारे (राजकारण नसून) चातुर्यच समजायचे काय? हे जर राजकारण नसेल तर मग राजकारणात निराळे काय बोलावे लागते, हे आक्षेपक सांगतील काय? राजकारण म्हणजे हातात तलवारी घेऊन मारामारी करीत सुटणे असाच जर अर्थ असेल तर महात्माजींनी उभ्या जन्मात कधी राजकारण केले नाही, असे होईल.” (पृष्ठ १८२)

तेव्हा समर्थवाङ्मयातील ‘राजकारण’ नीट समजून घ्यावे.

- सुरेश जाखडी