शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर निवडणूक भरारी पथकाची कारवाई

18 Oct 2019 13:17:56




कणकवली : सिधुदुर्गात शिवसेना विरुद्ध राणे असे वातावरण ताबले असून शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांना पक्षाकडून पाठींबा मिळत आहे. खुद्द पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कणकवलीत सभा घेतली. कणकवलीत नितेश राणे यांच्या विरोधात सतीश सावंत हे बंडखोर उमेदवार उभे राहीले असून त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न शिवसेनेकडून केले जात आहेत. अशातच शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यावर निवडणूक आयोगाने बेहिशोबी रोकड बाळगल्या प्रकरणी कारवाई केल्याने सिंधुदुर्गातील राजकारण आणखी तापले आहे.

 

शिवसेनेचे कणकवली विधानसभा सहसंपर्कप्रमुख प्रदीप बोरकर यांच्याकडून २ लाख २९ हजार ५०० रुपयाची बेहिशोबी रोख रक्कम पोलीस व निवडणूक भरारी पथकाने छापा टाकून जप्त केली. कणकवलीतील हॉटेल त्रिफळा येथे हा छापा टाकण्यात आला आहे. ही रक्कम नेमकी कशासाठी आणण्यात येत होती याबद्दल चौकशी सुरू आहे.

 

एकूण ३९ हजार रुपयाची रोख रक्कम बोरकर यांच्या बॅगेत सापडली तर दोन लाख रुपयाची रक्कम त्यांच्या गाडीमध्ये आढळली. ही कारवाई पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली १७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री करण्यात आली. हे हॉटेल नाईक यांच्या मालकीचे आहे, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.

Powered By Sangraha 9.0