‘रुद्रनाद’ साकारणारे नाशिककर वास्तुविशारद

    दिनांक  18-Oct-2019 22:39:05   आपले घर असो वा कार्यालय, ते नेहमीच आखीवरेखीव आणि आकर्षक असावे, अशी आपली सर्वांचीच मनीषा असते. एखाद्या वास्तूला अत्याधुनिक किंवा पारंपरिक असे रूपडे प्रदान करण्यात नेहमीच मोलाची भूमिका बजावतात ते वास्तुविशारद. निर्माण केलेल्या स्थापत्याला खरा जिवंतपणा प्रदान करण्यात वास्तुविशारदांचा वाटा मोलाचा असतो. नाशिककर आर्किटेक्ट अभिजित चौधरी आणि ग्राफिक डिझायनर कमलेश पारख हेदेखील त्यातलेच एक.


नाशिककर आर्किटेक्ट अभिजित चौधरी आणि ग्राफिक डिझायनर कमलेश पारख या द्वयीच्या कार्याचा उल्लेख यासाठी महत्त्वाचा आहे, कारण यांनी नाशिक येथील स्कूल ऑफ आर्टिलरी येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले ‘रुद्रनाद’ हे संग्रहालय साकारले आहे. सैन्य दलाने आपणहून या द्वयीला आपले संग्रहालय साकारण्याची संधी देणे, यातच यांच्या कार्याचे मोठेपण आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या संग्रहालयाच्या माध्यमातून मागील १०० वर्षांचा नाशिक आणि देवळाली परिसराचा इतिहास दर्शविण्यात आला आहे. तसेच, ब्रिटिश काळात सुरू झालेला काकुल ते देवळालीपर्यंतचा प्रवासदेखील या संग्रहालयाच्या माध्यमातून साकारण्याचे दिव्य चौधरी व पारेख यांनी पार पाडले आहे. चौधरी यांना बालपणापासूनच वास्तुविशारद होण्यात रस असल्याने नाशिक येथील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून आपले शिक्षण पूर्ण केले. ते १९ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असून आजवर त्यांनी हिरो मोटोकॉर्प, एम. जी. कार्स अशा अनेकविध मान्यवर संस्थांसाठी कार्य करत आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली आहे. यापूर्वी त्यांनी आर्टिलरीच्या प्रांगणात असलेल्या आणि सुमारे १७५ वर्ष जुने बांधकाम असलेल्या व तत्कालीन संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या ‘हेरिटेज मेस’चे काम लीलया पार पाडल्याने त्यांना ‘रुद्रनाद : द सेनेटरी म्युझियम’चे आरेखन करण्याची संधी मिळाली, असे चौधरी आवर्जून नमूद करतात.

 

या संग्रहालयाचे वैशिष्ट्य म्हणजे ते ५००० चौरस फूट क्षेत्रात साकारण्यात आले आहे. तसेच, पूर्वीचे देवळाली ते आताचे देवळाली हा प्रवास, देवळाली नावामागील इतिहास, देवळाली येथील रेल्वेचा इतिहास, तसेच आर्टिलरीचा इतिहास यांची एकमेकांशी सांगड घालण्याचे दिव्य चौधरी व पारेख यांनी पार पाडले आहे. याशिवाय या संग्रहालयात शिवराय ते होळकर असा नाशिकचा इतिहास, स्वातंत्र्यलढ्यात नाशिकच्या सेनानींचा असणारा सहभाग, स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे हिंदुत्वविषयक असणारे विचार, कृष्णाजी गोपाल कर्वे, अनंत कान्हेरे, विनायक देशपांडे, रामचंद्र देशपांडे यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान साकारण्यात आले आहे. तसेच, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिरात केलेला सत्याग्रहदेखील या संग्रहालयात सचित्र स्वरूपात साकारण्यात आला आहे. ‘रुद्रनाद’ या संग्रहालयात भगवान शिव ज्या पद्धतीने रुद्रावतार धारण करत आपल्या क्रोधाने दुष्प्रवृतींचा नाश करत त्यांना भस्मसात करतात, त्याचप्रमाणे भारतीय तोफखाना आपल्या तोफेतून रुद्रावतार धारण करून शत्रूला भस्मसात करण्याची ताकद बाळगून आहे, असा संदेश देणारे, जिवंत वाटणारे आरेखन चौधरी व पारख यांनी येथे साकारले आहे. देवळाली कॅम्प परिसरात असलेल्या खंडोबा टेकडीच्या पायथ्याशी हे संग्रहालय साकारण्यात आले असून या म्युझियममध्ये संपूर्ण देवळालीचे मॉडेल, जेथे फायरिंग होते त्या रेंजचे मॉडेल, काही माऊंटन तोफा, कारगिल संघर्षप्रसंगी आर्टिलरीच्या जवानांनी ज्या प्रशिक्षणाच्या आधारे विजयश्री प्राप्त करण्यात मोलाचा सहभाग नोंदविला, त्या त्या प्रशिक्षणाची चलचित्रफीतदेखील या संग्रहालयात दाखविण्यात येत आहे. याशिवाय नाशिकच्या ऐतिहासिक स्थळांची माहिती, मुंबई ते नाशिक ब्रिटिशांचा असणारा प्रवास, देवळाली कॅम्प या नावामागची भूमिका, त्या काळात झालेला देवळालीचा विकास यांची संगतवार मांडणी या संग्रहालयात चौधरी व पारख यांनी अतिशय मार्मिक आणि आकर्षक पद्धतीने केली आहे.

 

या संग्रहालयाचे काम करत असताना नेमक्या कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले?, असे या दोघांना विचारले असता ते चटकन सांगतात की, "वेळ हे सर्वात मोठे आव्हान या कामात होते. वेळेची मर्यादा सांभाळत हे काम होणे अत्यंत आवश्यक असल्याने या कामात गती आणि सुबकता अशी दोहोंची मोट बांधण्याचे कसब पार पाडावे लागले आहे. हे काम मे ते सप्टेंबर 2019 या केवळ चार महिन्यांच्या कालावधीत साकारण्यात आले आहे, हे विशेष." "दुसरे आव्हान म्हणजे ज्या वास्तूत हे संग्रहालय साकारले गेले, ती वास्तू अतिशय जुनी अशी होती. त्याचा वापर स्टोअर रूम म्हणून होत असे. त्यामुळे त्या जागेची देखभाल होत नव्हती. तसेच विद्युत जोडणीदेखील खंडित करण्यात आलेली होती. त्यातच मूलत: या संग्रहालयाला दोनच प्रवेशद्वार असल्याने नैसर्गिक प्रकाशाचेदेखील आव्हान या कामात होतेच." या सर्वांवर मात करत चौधरी आणि पारख यांनी आकर्षक विद्युत रोषणाईचा वापर करत हे संग्रहालय नेत्रदीपक असे साकारले आहे. उत्तम रंग आणि त्याला साजेशी अशी विद्युत संगती यामुळे संग्रहालयातील माहिती वाचताना भेट देणारी व्यक्ती कंटाळत नसल्याचे चौधरी आणि पारख आवर्जून सांगतात. ग्राफिक डिझायनर पारख सांगतात की, १०० वर्षांची माहिती इतक्या कमी जागेत बसविणे हेदेखील एक मोठे आव्हान होते. त्यासाठी १०० जुने फोटो एनलार्ज करणे व त्यांचा वापर करणे, हे काम मोठे अवघड असल्याचे पारख यांनी विशेषत्वाने नमूद केले. विशेष म्हणजे ब्रिटिश काळ दाखविण्यासाठी ब्रिटिशांचे ड्रेस हे आयात करण्यात आले आहेत. एकाच जागी नाशिकच्या इतिहासापासून स्कूल ऑफ आर्टिलरीचा इतिहास पाहावयास मिळणे तसेच देवळाली परिसरात करण्यात आलेल्या विविध चित्रपटांच्या चित्रीकरणाचे फोटो पाहावयास मिळणे, हे या संग्रहालयाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

 

तसेच, वाचनात सुलभता यावी आणि नेमकेपणा यावा यासाठी १०० वर्षांचा इतिहास हा दर २० वर्ष याप्रमाणे या संग्रहालयात विभागण्यात आला आहे. "संग्रहालय साकारणे, हे काम कधीतरीच येत असते. वास्तुविशारदाच्या कारकिर्दीत हे काम गौरवाचे आणि तितकेच आव्हानांचे क्षण निर्माण करणारे असते." त्यामुळे हे काम मिळाल्याचा मनस्वी आनंद झाल्याचे चौधरी व पारख सांगतात. "यामुळे नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. प्रिंटिंग, लाईट यांच्याबाबत अधिक माहिती समजली. नाशिककर असल्याने नाशिकचा इतिहासदेखील माहीत झाला. भारतीय सैन्याबरोबर काम करायचे सौभाग्य मिळाले त्यामुळे उर भरून आला. तसेच, वेळेचे व्यवस्थापन आणि शिस्त यांची सवय झाली. भारतीय सैन्य सामूहिक जबाबदारीच्या तत्त्वाने कसे काम करते, हे जवळून पाहण्याची संधी या कामाच्या निमित्ताने प्राप्त झाली. त्यामुळे शिक्षणाचे सार्थक झाल्याचे समाधान या कामामुळे मिळाले," अशा शब्दांत चौधरी व पारख आपल्या भावना प्रकट करतात.